Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

शोषितांचा कैवारी
vasudeo kulkarni
Wednesday, April 04, 2018 AT 11:13 AM (IST)
Tags: ag1
काही वर्षांपूर्वी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका लढवणार्‍या सर्वपक्षीय उमेदवारांच्या मागे ‘झुंजार’ नेता अशी बिरुदावली लावली जात असे. पण, त्यातल्या अनेक उमेदवारांचा सामाजिक, राजकीय लढ्याशी चळवळीशी काहीही संबंध नसे. पक्षाच्या बड्या नेत्याच्या वशिल्याने उमेदवारी मिळवलेल्या या उमेदवारांना लोकशाही-समाजवाद-लोकशाही मूल्ये, जनतेच्या हिताशी काहीही देणे घेणे नसे. अलीकडच्या 40 वर्षात तर राजकारण हे सत्तेसाठीच आणि सत्ता हेच सर्वस्व, अशी भारतीय राजकारणाची दारुण स्थिती झाली. घराणेशाही, भ्रष्टाचार, वशिलेबाजी आणि गैरव्यवहाराने भारतीय लोकशाहीला ग्रहण लागले. मुक्त आणि उदारमतवादी अर्थव्यवस्थेच्या धडाकेबाज अंमलबजावणीनंतर समाजवादी विचारसरणीलाही ग्रहण लागले. ‘सारेच दीप मंदावले, विझू विझू आले’ अशी स्थिती निर्माण झालेली असतानाही भाई वैद्य नावाची पेटती धगधगती मशाल मात्र समाजवादी विचारांचा अखेरच्या क्षणापर्यंत जागर करीत, शोषित, वंचित आणि उपेक्षितांना सामाजिक न्याय आणि हक्क मिळवून द्यायच्या संगरात, रस्त्यावर उतरून सामान्य, गरीब जनतेच्या लढ्यांचे नेतृत्व करीत होती. सर्वार्थाने हा नेता झुंजार, निस्वार्थी, नीतिमूल्यांच्या राजकारणावर-समाजवादी विचारांवर अपार विश्‍वास असलेला आणि त्यासाठीच आपले सारे जीवन समर्पित करणारा सज्जन राजकारणी होता. भालचंद्र सदाशिव उर्फ भाई वैद्य यांच्या निधनाने महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळींचा, उपेक्षितांचा, समाजवादी विचारासाठीच अखेरपर्यंत झुंजणारा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. समाजवादी चळवळ आणि लोकशाहीचा आधारवड कोसळला आहे. वयाच्या 89 व्या वर्षी भाई गेले आणि राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, मधू लिमये, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे अशा थोर समाजवादी नेत्यांच्या परंपरेतला समाजवादी चळवळीचा पाईक हरपला आहे. भाई म्हणजे चळवळ आणि आंदोलन. हे समीकरण अखेरपर्यंत कायम राहिले. 1942 ‘चलेजाव’च्या स्वातंत्र्यलढ्यात शालेय जीवनात सत्याग्रह करणार्‍या भाईंनी पुढच्या 75 वर्षात सातत्याने सामाजिक आणि राजकीय चळवळींचे नेतृत्व केले. संयुक्त महाराष्ट्र, गोवा मुक्ती संग्राम, आणीबाणीच्या लढ्यात कृतिशीलपणे सहभागी असलेल्या भाईंनी जीवनात 25 वेळा तुरुंगवास भोगला. लोकशाहीचा मुडदा पाडून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली, तेव्हा भाईंंनी 18 महिने तुरुंगवास सोसला. जनसामान्य आणि शोषितांसाठी सातत्याने सत्याग्रह, मोर्चे, चळवळींचे नेतृत्व करणार्‍या भाईंनी वयाच्या 88 व्या, म्हणजे गेल्या वर्षी  शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणी-साठी झालेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते. सामान्य जनता आणि समाजवादी विचारांसाठीच आपले सारे जीवन समर्पित केलेल्या भाईंनी, या विचारांशी कधीही तडजोडी केल्या नाहीत. सत्तेचा मोह त्यांना कधीच नव्हता. त्यामुळेच सामान्य जनता आणि तिचे, गोरगरिबांचे, शेतकर्‍यांचे सुख हेच त्यांच्या राजकारणाचे ध्येय होते. नीतिमूल्यांचे राजकारण त्यांनी केले आणि लोकशाही समाजवादाची विचारधाराही अखेरपर्यंत जपली. समाजवादी विचारावर अपार निष्ठा आणि श्रद्धा असलेल्या भाईंनी जनतेला या विचारांचे उपदेशाचे डोस न पाजता आपल्या कौटुंबिक जीवनातही हे विचार कृतिशीलपणे अंमलात आणले होते.

अजातशत्रू नेता
  भाईंनी मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या चळवळीसह शेतकरी, शेतमजूर, शोषित, वंचितांसाठीच्या लढ्यात सरकारच्या विरोधात सातत्याने आंदोलने केली. सरकारवर आणि राजकारण्यांवर कडाडून टीकाही केली. समाजवादी विचारांच्या विरोधात सरकारने अंमलात आणलेल्या धोरणांच्या निषेधार्थ ते सातत्याने रस्त्यावर उतरीत. ते स्वत:   समाजवादी विचारांचे निष्ठावान वारकरी होते. पण, त्यांनी अन्य  विचारांच्या संघटना आणि पक्षांचा, त्या संघटना, पक्षाच्या नेत्यांशी  व्यक्तिगत शत्रुत्व मात्र कधीच केले नाही. लोकशाहीत दुसर्‍यालाही आपले विचार निर्भयपणे व्यक्त करायचे स्वातंत्र्य आहे आणि त्याचा आदर करायलाच हवा, असे सांगणार्‍या भाईंनी हे व्रत निष्ठेने जपल्यानेच सर्व पक्षातल्या नेत्यांशी त्यांचे व्यक्तिगत संबंध घनिष्ठ आणि मैत्रीचे होते. स्वच्छ-निष्कलंक आणि चारित्र्यसंपन्न नेता असा त्यांचा लौकिक होता. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. राजकारणाच्या प्रवाहात आणीबाणीनंतर महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली  सत्तेवर आलेल्या पुरोगामी लोकशाही दलाच्या सरकारमध्ये भाई गृहखात्याचे राज्यमंत्री होते. या पदावर असतानाच त्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचे पहिले विधेयक विधिमंडळात मांडले. स्मगलरचे सात साथीदार त्यांना तीन लाख रुपयांची लाच द्यायसाठी आले असताना, गृह राज्यमंत्री असलेल्या भाईंनी या गुंडांना पोलिसांच्या हवाली करून तुरुंगात पाठवले. राज्यातल्या पोलिसांना फूल पँट द्यायचा निर्णय त्यांच्याच कारकिर्दीत घेतला गेला. महाराष्ट्रातल्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना  किमान सेवानिवृत्ती वेतन आणि त्याची महागाईशी जोडणी करून घेतली. सत्ता आली आणि गेली. पण, भाईंच्या मूल्याधिष्ठित राजकारण आणि चळवळीवर काहीही परिणाम झाला नाही. जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली 1983 मध्ये निघालेल्या कन्याकुमारी तेे दिल्ली या चार हजार किलो मीटर अंतराच्या भारत यात्रेत ते सहभागी होते. जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. समाजवादी जन परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अशा विविध जबाबदार्‍याही त्यांनी पार पाडल्या होत्या. राजकारणात अशा पदांवर असतानाही त्यांचा सामाजिक चळवळीतला कृतिशील सहभाग कायम राहिला. सामान्य जनता हेच दैवत असलेले भाई पुण्याचे महापौरही होते आणि पुणेकरांचे श्रद्धास्थानही होते. पुणेकरांना त्यांच्या नेतृत्वाचा सदैव अभिमान असल्यानेच ‘पुण्यभूषण’ पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला होता. त्यांच्या सामाजिक कार्यातल्या योगदानाबद्दल महात्मा फुले, राष्ट्रीय  बंधुता, महर्षी नारायण सुर्वे जीवनगौरव यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते. जनतेचा त्यांच्यावर असलेला अपार विश्‍वास आणि त्यांच्याबद्दल असलेला आदर, हाच त्यांच्या राजकीय आणि सामाजिक चळवळीतल्या योगदानाचा खरा सन्मान होता. त्यांच्या निधनाने शोषित आणि वंचितांच्या लढ्यातला बिनीचा शिलेदार काळाच्या पडद्याआड गेला आहे आणि या चळवळीचा मार्गदर्शक, जनसामान्यांचा कैवारी हरपला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: