Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

काश्मीर खोरे पुन्हा अशांत
vasudeo kulkarni
Wednesday, April 04, 2018 AT 11:23 AM (IST)
Tags: vi1
भारतीय लष्कराच्या ‘राजपुतांना रायफल्स’ मधील लेफ्टनंट उमर फयाझ यांचे अपहरण करून त्यांची हत्या करणार्‍या धर्मांध इस्लामी दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने चकमकीत ठार केल्यावर, आता काश्मीर खोर्‍यात पुन्हा अशांतता आणि दहशतीचे वातावरण निर्माण करायचे कारस्थान फुटीरतावाद्यांनी रचल्याचे उघड झाले आहे. काश्मीर खोर्‍यातल्या शोपियाँ आणि अनंतनागमध्ये रविवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने 13 दहशतवाद्यांचा खात्मा केला. हिजबूल मुजाहिद्दीन आणि लष्कर ए तोयबा या संघटनेच्या दहशतवादी लपून बसलेल्या घरांना सुरक्षा दलाच्या तुकड्या आणि पोलिसांनी गराडा घातल्यावर दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार सुरू केला. या दहशतवाद्यांना ठार मारायच्या निर्धाराने सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर दिल्यावर, दहशतवाद्यांना सुरक्षितपणे पळून जाता यावे, यासाठी परिसरातल्या नागरिकांनी घराबाहेर पडून सुरक्षा दलाच्या तुकड्यांवर तुफानी दगडफेकही केली. ही दगडफेक सुरू असतानाही सुरक्षा दलांनी माघार न घेता, दगडफेक करणार्‍या जमावाला पांगवत कारवाई सुरूच ठेवली. दहशतवाद्यांबरोबर सुरू असलेल्या चकमकीच्या दरम्यान कचदुरा गावात जोरदार गोळीबारामुळे काही घरांनी पेट घेतला आणि ती जळून भस्मसात झाली. सुरक्षा दलांवर दगडफेक करणार्‍या जमावावर पोलिसांनी आधी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून त्यांना पांगवायचा प्रयत्न केला. पण तरीही जमाव हटला नाही. तेव्हा पॅलेटगन्सचा वापर करावा लागला. या चकमकीच्या दरम्यान तीन जवानांसह चार नागरिकांचाही मृत्यू झाला. जनतेने घराबाहेर पडू नये, असे आवाहन सुरक्षा दलांनी केलेले असतानाही रस्त्यावर मोठा जमाव जमल्याने सुरक्षा दलाची कोंडी झाली होती. या चकमकीत 25 स्थानिक लोकही जखमी झाले आहेत. ही कारवाई सुरू असताना पोलिसांनी संपूर्ण काश्मीर खोर्‍यातील मोबाईलवरील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद केली होती. ही चकमक सुरू असताना फुटिरता-वाद्यांच्या चिथावणीने राजधानी श्रीनगरसह अनंतनाग, बारामुल्लासह अन्यत्र सुरक्षा दलांच्या तुकड्यांवर तुफानी दगडफेकीच्या घटनाही घडल्या. फुटिरतावादी हुर्रियत परिषदेने या घटनेच्या निषेधार्थ दोन दिवस काश्मीर खोर्‍यात हरताळ पाळायच्या आदेशाला प्रतिसादही मिळाला.
गेल्या वर्षभरात  काश्मीर खोर्‍यात देश विदेशातील पर्यटकांची संख्या वाढत असताना, आता मात्र पर्यटकांसाठी राजधानी श्रीनगरसह हा परिसर असुरक्षित करायचे कारस्थान दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांनी रचल्याचे उघड झाले आहे. सोमवारी इंडोनेशिया आणि परराष्ट्रातून आलेल्या पर्यटकांच्या गाड्यांवर तुफानी दगडफेकीच्या घटना घडल्या. पोलिसांनी पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवले आणि नंतर विमानतळावर पोहोचवले. सध्या काश्मीर खोर्‍यात पर्यटनाचा हंगाम सुरू असताना दल सरोवरातील शिकारे आणि अन्य पर्यटकात दहशत निर्माण करणार्‍या घटनाही घडल्या असल्याने हे खोरे पुन्हा अशांत होण्याची आणि पर्यटकांची संख्या घटायची भीती व्यक्त होत आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: