Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

सलमानला पुन्हा शिक्षा
vasudeo kulkarni
Friday, April 06, 2018 AT 11:10 AM (IST)
Tags: ag1
वीस वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ हैं’ या हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी राजस्थानमध्ये बेकायदेशीरपणे हरणांची शिकार केल्याच्या प्रकरणी चौथ्या खटल्यातही हिंदी चित्रपटसृष्टीतला मस्तवाल आणि उर्मट अभिनेता सलमान खान याला जोधपूरचे ग्रामीण मुख्य न्यायदंडाधिकारी देवकुमार खत्री यांनी वनसंरक्षक कायद्यान्वये दोषी ठरवून पाच वर्षांच्या तुरुंगवासाची आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे तर या चौथ्या खटल्यात शिकारीच्या वेळी त्याला चिथावणी-मदत केल्याच्या आरोपातून अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री तब्बू, सोनाली बेंद्रे आणि अभिनेत्री नीलम यांना संशयाचा फायदा देत न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. या आधीच्या दोनही खटल्यात, सलमानला राजस्थानातल्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्याला दोषी ठरवून त्याला शिक्षा सुनावली होती. पण राजस्थान उच्च न्यायालयाने त्याची निर्दोष सुटका केली होती. उच्च न्यायालयाच्या त्या निकालाच्या विरोधात राजस्थान सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या आव्हान याचिकांची सुनावणी अद्यापही झालेली नाही. पण या आधीच्या तीन खटल्यात न्यायालयाने शिक्षा सुनावल्याने सलमानला उच्च न्यायालयात याचिका दाखल होईपर्यंत राजस्थानातल्या तुरुंगात प्रत्येकी सहा दिवस या प्रमाणे अठरा दिवस तुरुंगात काढावे लागले होते. ‘हम साथ साथ है’, या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान राजस्थानात असताना, 1 ऑक्टोबर 1998 च्या रात्री तो सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, नीलम आणि तब्बू यांच्यासह जोधपूरजवळच्या कांकाणी गावाजवळच्या जंगलात जीपने गेला होता. त्या रात्री त्याने दोन काळविटांची बेकायदा शिकार केल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. या चौथ्या खटल्यात त्याच्याबरोबरच्या सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, नीलम आणि तब्बू यांनाही सहआरोपी करण्यात आले होते. बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज ऐकून आपण घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा सलमानने दोन काळविटांची शिकार केल्याचे दिसले. या वेळी तो जीपमध्ये होता आणि अन्य सहआरोपीही त्याच्याबरोबरच होते. ग्रामस्थांचा जमाव पाहताच, सलमान दोन काळविटांची केलेली शिकार घटनास्थळीच टाकून पळून गेल्याच्या साक्षी, घटनास्थळी तेव्हा उपस्थित असलेल्या साक्षीदारांनी दिल्या होत्या. काळविटांची शिकार सलमाननेच बेकायदेशीरपणे आणि परवान्याची मुदत संपलेल्या बंदुकीने केल्याचा गुन्हा त्याच्यावर जोधपूर पोलिसांनी नोंदवून, न्यायालयात हा खटला दाखल केला होता. सप्टेंंबर आणि ऑक्टोबर 1998 मध्ये कांकाणी गाव, घोडा फार्महाऊस आणि भवार गाव या परिसरात त्याने दोन चिंकारा हरणे आणि दोन काळविटांची शिकार केल्या प्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर वेगवेगळे तीन खटले दाखल केले होते. त्यातल्या घोडा फार्महाऊस परिसरात केलेल्या हरणांच्या बेकायदा शिकार प्रकरणी त्याला 10 मे 2006 रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. भवार गाव खटल्यातही हरणांच्या शिकार प्रकरणी दोषी ठरवून न्यायालयाने त्याला 17 फेब्रुवारी 2008 रोजी 1 वर्षाची शिक्षा सुनावली होती. या दोन्ही निकालांच्या विरोधात त्याने राजस्थान उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत त्याची शिक्षा रद्द होऊन त्याची सुटका झाली होती. पण या दोन्ही निकालांच्या विरोधात राजस्थान सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या आहेत.     

पैशाचा माज
  राजस्थानातल्या हरणे आणि काळविटांची शिकार केल्याच्या गुन्ह्यात यापूर्वी दोन वेळा दोषी ठरलेल्या सलमानची शस्त्रास्त्र नियमन कायदा खटल्यात मात्र 18 जानेवारी 2017 रोजी सत्र न्यायालयाने सुटका केली होती. त्या विरोधातही राजस्थान सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. काळवीट आणि हरणांची शिकार त्याने केल्याच्या घटनेनंतर त्याच्या विरोधात शिकार झालेल्या परिसरातल्या ग्रामस्थांनी फिर्यादी दाखल केल्यावर, वनखाते आणि पोलिसांनी केलेल्या तपासात तो तेव्हा राहिलेल्या हॉटेलच्या खोलीतून पिस्तूल आणि रायफल अशी शस्त्रे जप्त केली होती. या शस्त्रांच्या वापराची कायदेशीर मुदतही संपलेली होती. राजस्थानातील मुक्या प्राण्यांच्या शिकारीच्या गुन्ह्याने बदनाम झालेला आणि खटल्यांच्या चक्रव्यूहात सापडलेल्या सलमानची जनमानसातील प्रतिमा ‘दबंग’, माजुरी आणि उद्धट उर्मट अशीच आहे. एक काळ त्याचे नाव अभिनेत्री ऐश्‍वर्या रॉय हिच्याशी जोडले गेले होते. 2001 मध्ये तो ऐश्‍वर्याच्या मुंबईतल्या निवासस्थानी गेल्याचे आणि तिच्या दारासमोर दंगा केल्याचे प्रकरणही तेव्हा गाजले होते. ‘सुलतान’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीकरणाच्यावेळी या बेलगाम अभिनेत्याने, आपल्याला आता बलात्कारित महिलेसारखे वाटते, असे बेशरमपणाचे वक्तव्य केले होते. राजस्थानातल्या हरणांची बेकायदा शिकार केल्या प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यावरही त्याच्या बेलगाम आणि उर्मटपणाच्या वागणुकीत काही फरक झाला नाही. 28 सप्टेंबर 2002 रोजी मुंबईतल्या एका बेकरीसमोर फुटपाथवर झोपलेल्या माणसांच्या अंगावर त्याने मोटार घातल्याने, झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार आणि तीन जण जखमी झाले होते. त्या खटल्यात सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी 6 मे 2015 रोजी त्याला दोषी ठरवून पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा सुनावली गेल्यावर त्याच दिवशी त्याच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत, त्याच्या अटकेविरुद्ध मनाई मिळवून त्याची जामिनावर सुटका करून घेतली होती. या शिक्षेच्या विरोधात त्याने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची अंतिम सुनावणीही अद्याप झालेली नाही. मुंबईतल्या त्या खटल्यात प्रमुख आरोपी असलेल्या सलमानने हा अपघात केला, तेव्हा त्याच्या गाडीत पोलीस रवींद्र पाटील, हा त्याचा अंगरक्षक होता आणि त्याने न्यायालयात त्याच्या विरोधात साक्षही दिली होती. पुढे त्याला पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले आणि क्षयरोगाने त्याचा 2007 मध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्याच खटल्यात त्याने आपण ‘बिईंग ह्यूमन’ ही जनसेवेची संस्था चालवतो आणि गरिबांना, दुर्धर रुग्णांना भरीव अर्थसहाय्य करतो, असे सांगत न्यायालयाकडे दयेची याचना केली होती. हिंदी चित्रपटसृष्टीत गाजणारा हा अभिनेता याकूब मेमनबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानेही टीकेच्या भडिमारात सापडला होता. प्रचंड पैसा आणि लोकप्रियता, प्रसिद्धी यामुळे सतत प्रकाशझोतात असलेल्या सलमानला कायद्याचे हात दूरवर पोहोचलेले असतात, याची प्रचिती काळविटांची बेकायदा शिकार केल्याच्या खटल्यात शिक्षा झाल्याने आली असेलच. चित्रपटसृष्टीतल्या या भंपक, मग्रूर ‘टायगर’ला शिक्षा झाली आणि या निरपराध दोन नाहक बळी गेेलेल्या ‘काळविटां’ना उशिरा का होईना न्याय मिळाला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: