Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

हिंगोली पोलीस ठाण्यात गोशाळा
vasudeo kulkarni
Friday, April 06, 2018 AT 11:14 AM (IST)
Tags: lolak1
कायदा आणि सुव्यवस्था ठेवायची जबाबदारी असलेल्या पोलिसांवर, तणावाच्या घटनांच्या प्रसंगी उपाशी-तापाशी राहून रस्त्यावर उतरून चोवीस तास बंदोबस्त करावा लागतो. पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादींची नोंद घेऊन त्या गुन्ह्यांचा तपासही करावा लागतो. पोलीस ठाण्याच्या परिसरात गस्तही घालावी लागते. बंद, मोर्चाच्या वेळी तर पोलीसच तणावग्रस्त असतात. विविध गुन्ह्यांच्या प्रकरणांचा तपास सुरू असताना अटक केलेल्या संशयित आरोपींची चौकशी करून त्यांचे जबाबही नोंदवून घ्यावे लागतात. न्यायदंडाधिकार्‍यांकडून संशयित आरोपींची पोलीस कोठडी मागून घेतली असल्यास त्या आरोपीच्या जीविताची-सुरक्षिततेची जबाबदारीही पोलिसांचीच असते. न्यायालयात सुनावणी सुरू असलेल्या खटल्यातील साक्षीदारांना साक्षी समन्स बजावण्याचे कामही पोलिसांनाच करावे लागते. पोलीस हे जनतेचे रक्षक आणि गुंड -गुन्हेगारांचे कर्दनकाळ आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य तर ‘खलनिग्रहणाय, सदरक्षणाय’ असे असल्याने, सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षिततेची कायदेशीर जबाबदारी पोलिसांचीच आहे. बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध, खून, मारामार्‍या आणि अन्य गुन्ह्यांच्या तपासात गर्क असलेल्या पोलिसांना काही वेळा मात्र, कायदेशीर जबाबदारी नसतानाही, आलेल्या प्रसंगांना तोंड देताना, धावपळ करावी लागते, ज्यांचा गुन्ह्याशी काहीही संबंध नाही, त्यांचाही सांभाळ करावा लागतो, याची प्रचिती हिंगोली पोलीस ठाण्याच्या समोरच सुरू झालेल्या ‘गोशाळे’मुळे आली आहे.
केंद्र सरकारने अंमलात आणलेल्या गोहत्या बंदी कायद्यान्वये, गायी, बैल, वासरांची बेकायदेशीरपणे कत्तलीसाठी वाहतूक करणे हा दखलपात्र गुन्हा असल्याने अशी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाल्यास, तस्करी होणार्‍या गायी, बैलांची सुटका पोलिसांना करावी लागते. 31 मार्च रोजी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एका मालमोटारीतून बैलांची बेकायदा वाहतूक होत असल्याची तक्रार हिंगोली पोलीस ठाण्यात दिली. पोलीस ठाण्याचे निरिक्षक आणि त्यांच्या सहाय्यक पोलिसांनी बैलांची बेकायदा वाहतूक करणारी ही मालमोटार (ट्रक) पकडली. मालमोटारीचा चालक एकसारवा गफूर खाँ आणि त्याचा सहाय्यक मोहन पुरी यांना अटक केली. बैलांची वाहतूक करणारी मालमोटार जप्त केली. या मालमोटारीतून भोपाळहून हैद्राबादकडे वाहतूक केली जात असलेल्या, चाळीस बैलांची आणि वासरांची सुटकाही पोलिसांनी केली. या मुक्या प्राण्यांची सुटका केल्याचे श्रेय लाटणार्‍या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांनी या बैलांना ताब्यात घेताच पोबारा केला. मालमोटारीतील चाळीस बैलांना पोलिसांनी-पोलीस ठाण्यासमोरच्या आवारातच झाडांच्या सावलीत सोडले. या मुक्या प्राण्यांना मालमोटारीत कोंबून आणल्याने, काही बैलांना जखमाही झाल्या असल्याने, त्यांच्यावर पशू वैद्यकाकडून उपचारही करून घेतले. या जप्त केलेल्या बैलांना न्यायालयाच्या आदेशानुसार कुणाच्या ताब्यात द्यायचे, याचा निर्णय होत नाही, तोपर्यंत त्यांना सांभाळायची जबाबदारी पोलिसांचीच आहे. परिणामी गेले सहा दिवस हिंगोली पोलीस ठाण्यातले पोलीस आणि अधिकारी आपल्या नेहमीच्या कामाबरोबरच बैलांसाठी वैरण आणणे, त्यांना घालणे, पाणी पाजणे, त्यांचे शेण काढणे, जखमांना मलम लावणे, अशी कामेही करीत आहेत. हिंगोली पोलीस ठाण्याच्या समोरच बैलांचा हा कळप असल्याने, या पोलीस ठाण्याची गोशाळा झाली, ती अशी!
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: