Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

वेटलिफ्टर मीराबाई चानूला सुवर्णपदक
ऐक्य समूह
Friday, April 06, 2018 AT 10:58 AM (IST)
Tags: sp1
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे खाते उघडले
5गोल्ड कोस्ट, दि. 5 (वृत्तसंस्था) : राष्ट्रकुल स्पर्धेच्या दिमाखदार उद्घाटन सोहळ्यानंतर पहिल्याच दिवशी गुरुवारी वेटलिफ्टर सैखोम मीराबाई चानूने सहा विक्रमांसह सुवर्णपदक पटकावून भारताचे पदकांचे खाते उघडले. पुरुषांच्या वेटलिफ्टिंगमध्ये पी. गुरुराजाने रौप्यपदकाची कमाई केली. चानूने सहा मिनिटांत सहा वेळा वजने उचलत सहा विक्रमांची नोंद करत आजचा दिवस गाजवला.
ग्लासगो येथे चार वर्षांपूर्वी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत चानूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. तेथे भंगलेले सुवर्णपदकाचे स्वप्न तिने ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड राज्यातील गोल्ड कोस्ट येथील स्पर्धेत साकारले. चानून स्नॅचमध्ये अनुक्रमे 80 किलो, 84 किलो आणि शेवटी 86 किलो वजन उचलले. क्लीन अँड जर्कमध्ये तर चानूने स्वत:च्या वजनाच्या दुप्पट वजन उचलून प्रेक्षकांना थक्क केले. पहिल्या प्रयत्नात तिने 103 किलो वजन सहज उचलले. दुसर्‍या प्रयत्नात 107 किलो तर तिसर्‍या प्रयत्नात 110 किलो वजन उचलून सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. 23 वर्षीय चानूने जागतिक स्पर्धेत क्लीन अँड जर्कमध्ये 109 किलो वजन उचलले होते. या कामगिरीत तिने आज सुधारणा केली. तिने एकूण 196 किलो वजन उचलून स्पर्धा विक्रम साजरा केला. त्याचबरोबर तिने नवा राष्ट्रीय विक्रमही रचला.
चानूची नजीकची प्रतिस्पर्धी मानली जाणारी कॅनडाची अमांडा ब्रॅडॉक हिची कामगिरी अत्यंत सुमार झाली. अमांडाने स्नॅचमध्ये 76 किलो वजन उचलले. मात्र, क्लीन अँड  जर्कमध्ये तिला एकदाही वजन उचलता आले नाही. मॉरिशसच्या मारी रेनेवोसोवाने (76+94 किलो) रौप्य तर श्रीलंकेच्या दिनुशा गोम्सने (70+85 किलो) कांस्यपदक पटकावले.
भारताला पी. गुरुराजाने वेटलिफ्टिंगमध्येच आजच्या दिवशी दुसरे पदक मिळवून दिले. त्याने 56 किलो वजनी गटात एकूण 249 किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले. त्याने स्नॅचमध्ये 111 आणि क्लीन अँड जर्कमध्ये 138 किलो वजन उचलले. विशेष म्हणजे चानू आणि पी. गुरुराजा यांना वैयक्तिक फिजिओंना या स्पर्धेत आपल्यासमवेत आणता आलेले नाही. भारतीय पथकात एकूण खेळाडूंच्या संख्येच्या 33 टक्क्यांपेक्षा अधिक अधिकारी नकोत, असा फतवा क्रीडा मंत्रालयाने काढला होता. त्याचा फटका अनेक खेळाडूंना बसला असून त्यांचे वैयक्तिक फिजिओ या स्पर्धेसाठी त्यांच्यासोबत जाऊ शकले नाहीत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: