Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

सीमाभागातील लढाऊ संपादक
vasudeo kulkarni
Friday, April 06, 2018 AT 11:13 AM (IST)
Tags: vi1
स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्याच्या चळवळीचा प्रसार करायसाठी 1921 मध्ये सीमा भागातल्या बेळगाव शहरात  स्थापन झालेल्या ‘राष्ट्रवीर’ या साप्ताहिकाचे गेली 33 वर्षे संपादक असलेल्या अ‍ॅड. रमेश विठ्ठलराव उर्फ राजाभाऊ पाटील यांना वाईच्या रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानचा यावर्षीचा विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार जाहीर झाला आहे. महर्षी शिंदे यांच्या सामाजिक समतावादी विचारांच्या प्रसारासाठी ध्येयवादीपणे पत्रकारिता करणार्‍या पाटील यांचा होणारा हा सन्मान, म्हणजे मराठी पत्रकारितेत सत्यनिष्ठ पत्रकारिता करणार्‍या व्रती पत्रकाराचा गौरव होय!
बेळगावमध्ये जन्मलेल्या पाटील यांचे शालेय शिक्षण बेळगावमध्ये आणि महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरच्या गोखले महाविद्यालयात झाले. बेळगावच्या लॉ कॉलेजमधून एलएलबी झाल्यावर त्यांनी गेली 47 वर्षे बेळगाव-कोल्हापूर भागात वकिली केली आहे. छ. राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने गुरुवर्य शामराव देसाई यांनी राष्ट्रवीर या साप्ताहिकाची स्थापना केली. देसाई यांच्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई दाजीबा देसाई यांनी या साप्ताहिकाच्या संपादनाची धुरा सांभाळली. सामाजिक समता आणि उपेक्षित वंचितांना न्याय मिळावा यासाठी परखड आणि निर्भीडपणे पत्रकारिता करणार्‍या या वृत्तपत्राचा वारसा राजाभाऊंनी धडाडीने सांभाळला आहे. राजसत्ता, धर्मसत्ता आणि अर्थसत्ता यांची गुलामगिरी, दमन आणि शोषण यांच्या विरोधात राजाभाऊ निर्भयपणे लेखन करतात. सीमा लढ्याचे अभ्यासू नेते आणि सीमा लढ्याचे नियोजक असाही त्यांचा लौकिक आहे. कर्नाटकात सक्तीने डांबल्या गेलेल्या 25 लाख मराठी भाषकांचा प्रदेश महाराष्ट्रात विलीन व्हावा, यासाठी झालेल्या आंदोलनात राजाभाऊंनी रस्त्यावरच्या लढाईचे नेतृत्वही केले आहेत. शेतकरी कामगार पक्ष, शेतकरी सभा, महाराष्ट्र एकीकरण समिती, पुरोगामी सेवादल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती या सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या चळवळींचे नेतृत्वही त्यांनी केले आहे. सीमा प्रश्‍नावर महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेसाठी, सीमा भागातल्या मराठी भाषकांची न्याय्य बाजू आणि सीमाभागावर महाराष्ट्राच्याच असलेल्या कायदेशीर हक्कांच्या बाबतच्या कागदपत्रांची पूर्तता राजाभाऊंनी केली. महाराष्ट्र सरकारच्या या खटल्याच्या तज्ञ समितीचे ते सदस्य आहेत. भाषिक हक्काच्या रक्षणासाठी सीमा भागात कानडी सक्तीच्या विरोधात आंदोलन करून त्यांनी अल्पसंख्याक आयोगाकडे दाद मागितली. 1986 मध्ये सीमा आंदोलनात त्यांनी कारावासही सोसला आहे. राष्ट्रवीरचे संपादक असलेल्या राजाभाऊंची लढाऊ पत्रकारिता हे त्यांचे जीवनध्येय आहे. कोणतेही मानधन न घेता, त्यांनी ध्येयनिष्ठ पत्रकारितेचा मानदंड निर्माण केला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: