Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
हार्डवेअर बिघाडामुळे सरकारी वेबसाईटस् बंद
ऐक्य समूह
Saturday, April 07, 2018 AT 11:09 AM (IST)
Tags: na1
सायबर सुरक्षा प्रमुखांचे स्पष्टीकरण
5नवी दिल्ली, दि. 6 (वृत्तसंस्था) : भारत सरकारच्या विविध मंत्रालयांच्या वेबसाईटस् हॅक झाल्या नसून हार्डवेअर बिघाडामुळे त्या बंद असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयक गुलशन राय यांनी दिली. संरक्षण खात्याची वेबसाईट चिनी हॅकर्सनी हॅक केल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. 
शुक्रवारी संरक्षण खात्याची वेबसाईट सुरू करण्याचा प्रयत्न केला असता ती सुरू होत नव्हती. वेबसाईटच्या होमपेजवर एरर दाखवण्यात येत होती. त्याचबरोबर चिनी लिपीतील अक्षरांसारखी चिन्हे दिसत होती. त्यामुळे चिनी हॅकर्सनी ही वेबसाईट हॅक केली असावी, असा तर्क लढवण्यात येत होता. त्याचबरोबर संरक्षण खात्याची वेबसाईट हॅक झाल्याची कबुली संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनीही ट्विटरच्या माध्यमातून दिल्याने खळबळ उडाली. मात्र, केवळ संरक्षण खात्याची वेबसाईट नव्हे तर अन्य सरकारी मंत्रालयांच्या वेबसाईटही हार्डवेअरमधील बिघाडामुळे बंद असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयक गुलशन राय यांनी दिले. कोणतीही सरकारी वेबसाईट हॅक झाली नसल्याचा निर्वाळाही देतानाच हा तांत्रिक बिघाड लवकरच दुरूस्त करून या वेबसाईट पूर्ववत करण्यात येतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: