Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

आजपासून आयपीएलचा थरार
ऐक्य समूह
Saturday, April 07, 2018 AT 11:24 AM (IST)
Tags: sp2
मुंबईची सलामीची लढत सीएसकेबरोबर
5मुंबई, दि. 6 (वृत्तसंस्था) : आयपीएलच्या 11 व्या आवृत्तीचा उद्या, दि. 7 पासून दिमाखात शुभारंभ होत असून सलामीच्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा मुकाबला महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्जशी होणार आहे. सीएसकेचा संघ दोन वर्षांच्या बंदीनंतर या स्पर्धेत पुन्हा सहभागी होत आहे.
हे दोन्ही संघ तीन वेळा फायनलमध्ये एकमेकांशी खेळले असून चेन्नई सुपरकिंग्जने आपले पहिले आयपीएल विजेतेपद 2010 मध्ये मुंबईला नमवूनच पटकावले होते. मात्र, मुंबईने दोन वेळा विजेतेपद पटकावून आयपीएलमध्ये सर्वाधिक यशस्वी संघ होण्याचा बहुमान सीएसकेकडून हिसकावून घेतला होता. आता हे दोन्ही संघ स्पर्धेच्या सलामीलाच आमनेसामने येत असून हा सामना वानखेडे स्टेडियमवर रात्री 8 वाजता सुरू होणार आहे. याच मैदानात धोनीने 2011 च्या विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रीलंकेविरुद्ध षटकार ठोकून भारताला जगज्जेतेपद मिळवून दिले होते. कपिलदेवनंतर विश्‍वचषक जिंकणारा तो पहिलाच भारतीय कर्णधार ठरला होता. मात्र, उद्याच्या सामन्यात त्याची बॅट अपयशी ठरावी, अशी मुंबईच्या चाहत्यांची अपेक्षा असेल. आयपीएलची 11 आवृत्ती मागील दोन आवृत्त्यांपेक्षा वेगळी ठरणार आहे. मागील दोन स्पर्धांमध्ये चेन्नई आणि राजस्थान रॉयल्स यांच्या मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे बंदी होती. आता ही बंदी उठली असून हे दोन संघ पुन्हा स्पधेंत आले आहेत. उद्या मुंबई इंडियन्स व सीएसके यांच्यातील सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा, एविन लुईस, मुस्तफिजूर रहमान, हरभजनसिंग, जसप्रीत बूमराह आणि सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो यांच्या कामगिरीवर चाहत्यांचे विशेष लक्ष राहील.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: