Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

वेटलिफ्टर संजिताने मिळवले भारताचे दुसरे सुवर्णपदक
ऐक्य समूह
Saturday, April 07, 2018 AT 11:23 AM (IST)
Tags: sp1
युवा दीपक लाथेरचे पदार्पणातच कांस्यपदक
5गोल्ड कोस्ट, दि. 6 (वृत्तसंस्था) : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टर संजिता चानूने आज भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. संजिताने महिलांच्या 53 किलो वजनी गटात ही कामगिरी केली. तिच्याबरोबर दीपक लाथेर या 18 वर्षीय युवा वेटलिफ्टरने पदार्पणातच कांस्यपदकाची कमाई केली. लाथेरने पुरुषांच्या 69 किलो वजनी गटात ही कामगिरी करतानाच भारताचा सर्वात युवा पदकविजेत्याचा बहुमानही पटकावला. या दोघांच्या कामगिरीमुळे भारताच्या खात्यात एकूण चार पदके झाली आहेत.
दरम्यान, मिश्र सांघिक बॅडमिंटन, महिला हॉकी आणि स्न्वॉशमध्ये भारताला यश लाभले. भारतीय पुरुष हॉकी संघ राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकाच्या मोहिमेला शनिवारी सुरुवात करणार आहे. भारताचा पहिला सामना पारंपरिक व कट्टर प्रतिस्पर्धी पाकविरुद्ध होणार आहे.
महिलांच्या वेटलिफ्टिंगमध्ये 53 किलो वजनी गटात संजिताने स्नॅचमध्ये पहिल्या प्रयत्नात 84 किलो वजन उचलले. त्यानंतर क्लीन अँड जर्क प्रकारात 108 किलो वजन उचलून 192 किलो वजन उचलण्याचा विक्रम केला. पापुआ न्यू गिनीच्या लोआ टुआने एकूण 182 वजन उचलून रौप्यपदक मिळवले. कॅनडाच्या रॅचेल बेझिनेटला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तिने 181 किलो वजन उचलले.
दीपक लाथेरचा असाही विक्रम
वेटलिफ्टर दीपक लाथेरने भारताला चौथे पदक मिळवून दिले. दीपकने राष्ट्रकुल स्पर्धेतील पदार्पणातच पुरुषांच्या 69 किलो वजनी गटात कांस्यपदकाची कमाई केली. त्याने स्नॅचमध्ये पहिल्या प्रयत्नात 136 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 159 किलो वजन उचलून पदकाला गवसणी घातली. 18 वर्षीय दीपक लाथेर हा हरियाणातील शादीपूरचा रहिवासी असून त्याचे वडील शेतकरी आहेत. दीपकने स्नॅचच्या पहिल्या प्रयत्नात 132 किलो आणि दुसर्‍या प्रयत्नात 136 किलो वजन उचलले.
तिसर्‍या प्रयत्नात तो 138 किलो वजन उचलण्यात अपयशी ठरल्याने पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडला होता. क्लीन अँड जर्क प्रकारात त्याच्या पुढे सहा वेटलिफ्टर होते. या प्रकारात
त्याने 159 किलो वजन
उचलून सर्वोत्कृष्ट वैयक्तिक कामगिरी केली. पदकाची
आशा संपुष्टात आली असताना समोआचा वायपोव्हा अपयशी ठरल्याने दीपकचे पदक
निश्‍चित झाले. वेल्सच्या गॅरेथ इव्हान्सने सुवर्णपदक तर श्रीलंकेच्या इंडिका दिसानायकेने रौप्यपदक पटकावले.
भारतासाठी आजचा दिवस बराचसा फलदायी ठरला. महिला हॉकीमध्ये काल वेल्सकडून पराभूत झालेल्या भारतीय संघाने आज मलेशियाला 4-1 ने नमवले. मिश्र सांघिक बॅडमिंटनमध्ये आपली आगेकूच सुरू ठेवताना भारताने स्कॉटलंडविरुद्धचे पाचही सामने जिंकले. महिलांच्या स्न्वॉशमध्ये जोश्‍ना चिनाप्पाने उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिने ऑस्ट्रेलियाच्या टॅमिका सॅक्सबीला सलग चार गेममध्ये नमवले. मात्र, दीपिका पल्लेकलला इंग्लंडच्या अ‍ॅलिसन वॉटर्सने पराभूत केले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: