Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला ऐतिहासिक सुवर्ण
ऐक्य समूह
Tuesday, April 10, 2018 AT 11:26 AM (IST)
Tags: sp1
टेबल टेनिस, नेमबाजीतही सुवर्ण कामगिरी
5गोल्ड कोस्ट, दि. 9 (वृत्तसंस्था) : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची पदकांची लयलूट सुरूच असून पाचव्या दिवशी भारताच्या बॅडमिंटनपटूंनी मिश्र सांघिक स्पर्धेत प्रथमच सुवर्णपदकावर नाव कोरले. सायना नेहवाल व किदम्बी श्रीकांत हे या ऐतिहासिक कामगिरीचे शिल्पकार ठरले. महिलांपाठोपाठ पुरुषांच्या टेबल टेनिस संघानेही सुवर्ण कामगिरी केली. नेमबाज जितू रायने ग्लासगो स्पर्धेनंतर येथेही सुवर्णवेध करताना भारताला दिवसातील तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले. आता भारताची एकूण पदकसंख्या 19 वर गेली असून त्यात दहा सुवर्ण, चार रौप्य आणि पाच कांस्यपदके आहेत.
भारताचा अनुभवी नेमबाज जितू रायने पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. जितूने अंतिम सामन्यात 235.1 गुण मिळवून नवीन स्पर्धा विक्रम प्रस्थापित केला तर भारताच्याच ओम मिथरवालने कांस्यपदक पटकावले. त्याने 214.3 गुणांची कमाई केली. भारतीय महिला नेमबाजांनी या यशाचा आनंद द्विगुणित केला. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल गटात मेहुली घोषने रौप्य तर अपूर्वीने कांस्यपदक पटकावले. भारतीय वेटलिफ्टर्सनी नेत्रदीपक कामगिरी सुरुच ठेवली आहे. प्रदीपसिंगने 105 किलोग्रॅम वजनी गटात रौप्यपदक पटकावले.
भारतीय महिला संघापाठोपाठ पुरुषांच्या संघाने टेबल टेनिसच्या अंतिम लढतीत नायजेरियाला 3-0 ने पराभूत करून सुवर्णपदक जिंकले. बॅडमिंटनच्या मिश्र सांघिक प्रकारात भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत प्रथमच सुवर्णपदक पटकावले. भारताने मलेशियावर 3-1 अशी मात केली. सायना नेहवाल व किदम्बी श्रीकांत हे या सुवर्णमयी कामगिरीचे शिल्पकार ठरले. जागतिक क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या श्रीकांतने ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या ली चोंग वेईचा सरळ गेम्समध्ये पराभव केला. पाच लढतींमध्ये किदम्बीने वेईवर केवळ दुसर्‍यांदा मात केली आहे. तत्पूर्वी, अश्‍विनी पोनप्पा आणि सात्विक रंकीरेड्डी यांनी पेंग सून चॅन व लिउ योंग गोह यांना तीन गेम्समध्ये नमवून छान सुरुवात करून दिली.
मात्र, पुरुष दुहेरीत सात्विक रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी लिउ योंग गोह आणि वी कियाँग टॅन यांच्याकडून सरळ गेम्समध्ये पराभव पत्करला. मात्र, सायना नेहवालने सोनिया चीस सू या हिच्यावर तीन गेम्सच्या झुंजीनंतर मात करून भारताच्या सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: