Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नीरव मोदीच्या अटकेचा निर्णय हाँगकाँगच्या हाती
ऐक्य समूह
Tuesday, April 10, 2018 AT 11:07 AM (IST)
Tags: na1
भारताच्या विनंतीबाबत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण
5बीजिंग, दि. 9 (वृत्तसंस्था) : पंजाब नॅशनल बँकेला तब्बल साडेबारा हजार कोटी रुपयांना गंडा घालून भारतातून पळालेला नीरव मोदी हाँगकाँगमध्ये असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याच्या अटकेसाठी भारताने विनंती केली असून त्याबाबत चीनच्या अधिपत्याखालील हाँगकाँगच्या विशेष प्रशासकीय प्रदेशाचे सरकार निर्णय घेऊन भारताला मदत करू शकते, असे स्पष्टीकरण चीनने दिले आहे.
भारत आणि हाँगकाँग यांच्यातील न्यायाबाबतचे संबंध आणि करारांचा विचार करता पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या अधिपत्याखालील हाँगकाँग विशेष प्रशासकीय प्रदेशाचे सरकार भारताची विनंती मान्य करून नीरव मोदीच्या अटकेसाठी भारताला सहाय्य करू शकते, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी मागील आठवड्यात संसदेत बोलताना, नीरव मोदीच्या अटकेसाठी सहकार्य करण्याची विनंती चीनच्या अधिपत्याखालील हाँगकाँगच्या विशेष प्रशासकीय प्रदेशाच्या सरकारला केल्याची माहिती दिली होती. भारताने केलेल्या विनंतीनंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनीही हाँगकाँग सरकार भारताला मदत करण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट केले. हाँगकाँग विशेष प्रशासकीय प्रदेशाच्या   सरकारच्या नियमानुसार दोन्ही देशांमध्ये आपसात कायदेशीर प्रकरणात एकमेकांना मदत करण्याची तरतूद आहे. त्यानुसार नीरव मोदी प्रकरणात हाँगकाँग भारताला सहकार्य करण्यास तयार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे, असे शुआंग म्हणाले.
या प्रकरणातील नव्या माहितीनुसार, भारताने हाँगकाँगच्या पोलीस अधिकार्‍यांना पीएनबी घोटाळ्यामधील आरोपी नीरव मोदीला अटक करण्याचे आवाहन केले. नीरव मोदी हाँगकाँगमध्ये लपल्याची शक्यता आहे. त्याने अलाहाबाद बँकेच्या हाँगकाँग शाखेतून पैसे काढल्याची नोंद झाली आहे. नीरव मोदीची हाँगकाँग व बीजिंग येथेही दुकाने आहेत.
दरम्यान, पंजाब नॅशनल बँकेला गंडा घालणार्‍या नीरव मोदीवर सीबीआयकडून पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर आठवडाभरातच नीरवने बेल्जिअमच्या अँटवर्प शहरातील एका भारतीय सरकारी बँकेच्या
शाखेतून मोठी रक्कम काढल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी तो बेल्जियममध्ये असल्याचे सांगण्यात येत होते. आता मात्र तो हाँगकाँगमध्ये लपल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: