Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
स्कूल बस दरीत कोसळून 23 विद्यार्थी ठार
ऐक्य समूह
Tuesday, April 10, 2018 AT 10:57 AM (IST)
Tags: mn2
हिमाचल प्रदेशातील दुर्घटना
5धर्मशाला, दि. 9 (वृत्तसंस्था) : हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यातील नुरपूर परिसरात सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास स्कूल बस 100 मीटर खोल दरीत कोसळून 29 जण ठार झाले. त्यामध्ये 27 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दुर्घटनेनंतर मदत व बचावकार्यासाठी  एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले.
वजीर रामसिंग पठाणिया या खाजगी शाळेची 42 आसनी बस विद्यार्थ्यांना घरी सोडायला निघाली होती. ही बस 100 मीटर खोल दरीत कोसळून 23 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती हिमाचल प्रदेशचे शिक्षण मंत्री सुरेश भारद्वाज यांनी दिली. मात्र, बसमधील अन्य लोकही ठार झाल्याने मृतांचा आकडा 29 वर पोहोचल्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सांगितले. त्यांनी या अपघाताच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचेही त्यांनी जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
घटनास्थळी स्थानिक नागरिक, डॉक्टरांचे पथक, एनडीआरएफचे पथक दाखल झाले असून मदत व बचाव कार्य सुरू आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले, असे कांगडा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संतोष पटियाल यांनी सांगितले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: