Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भाजप देशातील सर्वात श्रीमंत राष्ट्रीय पक्ष
vasudeo kulkarni
Wednesday, April 11, 2018 AT 11:20 AM (IST)
Tags: na2
वार्षिक उत्पन्न एक हजार कोटी; काँग्रेस दुसर्‍या स्थानी
वार्षिक उत्पन्न एक हजार कोटी; काँग्रेस दुसर्‍या स्थानी
5नवी दिल्ली, दि. 10 (वृत्तसंस्था) : देशातील सात प्रमुख राष्ट्रीय पक्षांनी 2016-17 या आर्थिक वर्षातील आपल्या उत्पन्नाचे आकडे जाहीर केले असून जवळपास सर्वच पक्षांनी कोटींची उड्डाणे घेतली आहेत. मात्र, भाजप हा सर्वात श्रीमंत राष्ट्रीय पक्ष ठरला असून या पक्षाचे वार्षिक उत्पन्न एक हजार 34 कोटी 27 लाख रुपये आहे. याबाबतचा अहवाल दिल्लीस्थित असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या स्वयंसेवी संस्थेने मंगळवारी प्रसिद्ध केला.
2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर एकापाठोपाठ राज्ये काबीज करत निघालेल्या भाजपच्या वार्षिक उत्पन्नात भर पडत गेली आहे. 2016-17 मध्ये भाजपचे वार्षिक उत्पन्न सात राष्ट्रीय पक्षांच्या एकूण वार्षिक उत्पन्नाच्या 66.34 टक्के आहे. वार्षिक उत्पन्नात काँग्रेस दुसर्‍या स्थानावर असली तरी भाजप आणि देशातील प्रमुख विरोधी पक्षाच्या उत्पन्नात कमालीची तफावत आहे. काँग्रेसचे उत्पन्न गेल्या काही वर्षांत घटल्याचे समोर आले आहे. 2016-17 मध्ये काँग्रेसचे वार्षिक उत्पन्न 225.36 कोटी रुपये असून ते सात पक्षांच्या एकूण उत्पन्नाच्या 14.45 टक्के आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वार्षिक उत्पन्न सर्वात कमी आहे. या पक्षाचे वार्षिक उत्पन्न अवघे 2.08 कोटी रुपये आहे, असे ‘एडीआर’च्या अहवालात म्हटले आहे.
भाजप, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, तृणमूल काँग्रेस या सर्व पक्षांचे मिळून वार्षिक उत्पन्न 2016-17 मध्ये एक हजार 557 कोटी रुपये तर खर्च एक हजार 228 कोटी रुपये    असल्याचे ‘एडीआर’च्या अहवालात म्हटले आहे. राजकीय पक्षांचे उत्पन्न म्हणजे त्यांना मिळणारा निधी आणि देणग्या आहेत. या पक्षांनी निवडणूक आयोगाला पक्षांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. 2015-16 च्या तुलनेत 2016-17 या आर्थिक वर्षात भाजपचे उत्पन्न तब्बल 81.18 टक्क्यांनी म्हणजेच 463.41 कोटी रुपयांनी वाढले आहे. 2015-16 मध्ये भाजपचे उत्पन्न 570.86 कोटी रुपये होते. काँग्रेसच्या उत्पन्नात मात्र घट झाली आहे. काँग्रेसचे उत्पन्न 2015-16 मध्ये 261.56 कोटी होते. ते आता 225.36 कोटी झाले आहे. भाजपने निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार 2016-17 या वर्षात 710.57 कोटी रुपये खर्च झाले तर काँग्रेसचे 321.66 कोटी रुपये खर्च झाले. म्हणजेच काँग्रेसच्या उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण जास्त होते.
राजकीय पक्षांना मिळणार्‍या एकूण देणग्यांपैकी 74.98 टक्के देणग्या ऐच्छिक होत्या तर 128.60 कोटी रुपये पक्षांना बँकांमध्ये ठेवलेल्या रकमेवरील व्याजातून मिळाले आहेत. राजकीय पक्षांनी 30 ऑक्टोबरपर्यंत लेखापरीक्षण अहवाल सादर करणे बंधनकारक असते. मात्र, भाजपने गेल्या वर्षीचा लेखापरीक्षण अहवाल या वर्षी 8 फेब्रुवारीला तर काँग्रेसने 19 मार्च रोजी सादर केला. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष हे गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने लेखापरीक्षण अहवाल विलंबाने सादर करत असल्याचे ‘एडीआर’च्या अहवालात म्हटले आहे. बहुजन समाज पक्षाच्या वार्षिक उत्पन्नातील 70 टक्के रक्कम खर्चच झालेली नाही तर भाजप आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा खर्च उत्पन्नाच्या 31 टक्के तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा खर्च उत्पन्नाच्या केवळ सहा टक्केच आहे. बसपचे वार्षिक उत्पन्न 2016-17 मध्ये 173.58 कोटी रुपये तर खर्च 51.83 कोटी रुपये दाखवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 2016-17 मधील वार्षिक उत्पन्न 17.235 कोटी रुपये आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: