Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

मृत्यूचे वळण
vasudeo kulkarni
Wednesday, April 11, 2018 AT 11:26 AM (IST)
Tags: ag1
बंगळुरू-कोल्हापूर-पुणे या नव्या राष्ट्रीय महामार्गाचे                चौपदरीकरण झाल्यावर, सातत्याने वाहनांच्या अपघातांची संख्या  वाढत असल्याने हा महामार्ग मृत्यूचा झाला आहे. मंगळवारी सकाळी खंबाटकी घाटाचा बोगदा ओलांडल्यावर मृत्यूचा सापळा ठरलेल्या नागमोडी-एस वळणावर मजुरांना घेऊन जाणारा टेंपो कठडा तोडून कोसळल्याने झालेल्या  भीषण अपघातात 18 मजूर ठार आणि 20 जण गंभीर जखमी झाल्याच्या भयंकर अपघाताने, पुन्हा एकदा या वळणावर आणि राष्ट्रीय महामार्गावर होणार्‍या अपघातांच्या कारणांची चर्चा सुरू झाली आहे. विजापूर जिल्ह्यातल्या तिकोटा भागातील मदभावी तांड्यात राहणारे हे गरीब मजूर शिरवळच्या औद्योगिक वसाहतीतल्या  बांधकामाच्या मजुरीसाठी छोट्या टेंपोतून जात होते. या मजुरांना कामासाठी नेणार्‍या ठेकेदाराने त्यांना अक्षरश:  जनावरासारखे या टेंपोत कोंबले तर होतेच, पण याच टेंपोत बांधकामाचे अवजड साहित्यही होते. पुण्याकडे जाणारा खंबाटकी घाटातला बोगदा ओलांडताच हा टेंपो कठडा तोडून कोसळला आणि त्याचा अक्षरश: चक्काचूर झाला. काही क्षणातच मृत्यूने घाला घातलेल्या या मजुरांना वाचवायसाठी टाहोही फोडता आला नाही. या  भीषण अपघातात ठार झालेल्या मजुरांच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे झाले. टेंपोतले 35 पैकी 18 मजूर  जागच्या जागी ठार झाले तर उरलेले 20 जण गंभीर जखमी झाले. याच टेंपोमागून येणार्‍या ठेकेदाराच्या मोटारसायकलस्वारानी खंडाळा पोलीस ठाण्याला अपघाताची माहिती दिल्यावर तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुष्काळी विजापूर जिल्ह्यातले मजूर पोटाची खळगी भरायसाठी मिळेल त्या कामावर कुटुंबासह जातात. कामाच्या ठिकाणीच पाल ठोकून राहातात आणि मजुरी करतात. या अपघातग्रस्त टेंपोत मजुरांच्या बरोबरच त्यांची मुले आणि कुटुंबेही होती. 4 महिलांसह एका मुलाचाही मृत्यू या अपघातात झाला आहे. टेंपो-ट्रकमधून प्रवाशांची वाहतूक करायला कायदेशीर  बंदी असली तरी सर्रास टेंपो, ट्रकमधून श्रमिक मजुरांची वाहतूक होते. टेंपो-ट्रकमध्ये किती माणसे कोंबावीत यालाही काही मर्यादा नसते. ठेकेदार टेंपो, ट्रकमध्ये मजुरांना कोंबतो आणि कामाच्या ठिकाणी पोहोचते करतो. या कुटुंबांच्याबरोबर त्यांचे तात्पुरते संसाराचे साहित्यही असते. आपल्यावर मृत्यूचा घाला येईल, असे या निरपराध श्रमिक मजुरांना स्वप्नातही वाटले नसेल. बोगदा ओलांडल्यावर अर्ध्या पाऊण तासातच हा टेंपो शिरवळच्या औद्योगिक वसाहतीत पोहोचलाही असता. पण तसे घडले नाही.  भरधाव वेगाने टेंपो चालवणार्‍या ड्रायव्हरचे वाहनावर नियंत्रण राहिले नाही आणि कठडा तोडून तो कोसळला. 18 जीवांचा हकनाक बळी गेला. त्यांचे संसारही उद्ध्वस्त झाले. हा बोगदा ओलांडून पुण्याच्या दिशेने जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर लगेचच वळणे आहेत.  बोगद्यातला अंधार आणि 90 अंशातली रस्त्याची तीव्र वळणे यामुळे वाहन चालकाला रस्त्याचा अंदाज येत नाही. परिणामी याच वळणावर वारंवार वाहनांचे अपघात होतात. अनेक वाहन चालक मृत्युमुखी पडतात. अनेक जण जखमी होतात. या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यावर या अपघाती वळणाने घेतलेले हे सर्वाधिक बळी आहेत.

अपघातांचा चक्रव्यूह
  कोल्हापूर-पुणे दरम्यानच्या जुन्या राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटातूनच पूर्वी वाहनांची ये-जा होत असे. हा घाट धोकादायक वळणांचा तर होताच. पण, अरुंदही होता. 20 वर्षांपूर्वी याच घाटात एस. टी. बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 25 प्रवाशांचे मृत्यू झाले होते. ती अपघातग्रस्त बस सातार्‍याहून पुण्याच्या दिशेने जात असताना घाट सुरू होताच, वळणावरून ती दरीत कोसळली होती. त्या अपघातानंतर एस. टी. खात्याने खंबाटकी घाट सुरू व्हायच्या आधीच्या वळणावर सुरक्षिततेसाठी पुण्याकडे जाणार्‍या सर्व एस. टी. गाड्यांना थांबवून त्यांची तपासणी करायसाठी नाकाही सुरू केला होता. जुन्या महामार्गाचे रुंदीकरण करताना पूर्वीची बहुतांश वळणे काढून टाकली गेली. पण, खंबाटकी घाटात पुण्याकडे जाणार्‍या मार्गावर मात्र बोगदा काढल्यावर, नागमोडी आणि अत्यंत धोकादायक वळणांचा नवा रस्ता बांधला गेला. बोगदा ओलांडल्यावर घाट संपेपर्यंतचा हा रस्ता संपूर्ण उताराचा असल्याने भरधाव वेगाने वाहने चालवणार्‍या वाहनधारकांना या धोकादायक अपघाती वळणांची कल्पना येत नाही. परिणामी या नागमोडी वळणावर वारंवार वाहने उलटतात. कठडा तोडून कोसळतात. अपघात होतात. बोगद्यानंतरचा हा रस्ता भीषण अपघातांना कारणीभूत ठरेल, असा गंभीर इशारा वाहतूक तज्ञांनी दिला असतानाही महाराष्ट्र राज्य रस्ते बांधणी महामंडळाने त्याची गंभीर दखल गेल्या पंधरा वर्षात घेतली नाही. बोगद्यासाठी कंत्राटदाराने खर्च केलेल्या पैशाची वसुली झाल्यावर खंडाळ्याच्या अलीकडे टोल वसुलीसाठी सुरू असलेला टोल नाका बंंद झाला. बोगद्याची डागडुजी आणि देखभालही बंद झाली. हा संपूर्ण परिसर पूर्णपणे निर्जन असल्यामुळे अपघात झाल्यास पोलीस किंवा परिसरातल्या गावातल्या लोकांची मदतही अपघातग्रस्तांना मिळू शकत नाही. बोगद्यानंतरची सर्व धोकादायक वळणे पूर्णपणे काढून टाकावीत आणि हा अपघाती रस्ता सुरक्षित करायसाठी सरळ करावा,  नवा बांधावा, ही मागणी केंद्र आणि राज्य सरकारने मान्य केली नसल्यानेच, ही वळणे म्हणजे अपघात आणि मृत्यूचे सापळे ठरली आहेत. पुणे ते कोल्हापूर या टप्प्यातल्या राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या बांधकामाचे रेंगाळलेले काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. बहुतांश ठिकाणचे पूल अर्धवटच राहिल्याने आणि याच महामार्गावर अनेक टप्प्यातले कठडे बेपत्ता झाल्याने, ठिकठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात तर खंबाटकी घाटाचा बोगदा ओलांडल्यावर तीव्र वळणाच्या या नागमोडी रस्त्यावर वाहने वारंवार घसरतात. उलटतात. रस्त्याचा अंदाज वाहन चालकांना येत नाही. रस्त्याच्या रुंदीकरणाने आणि रस्ते नवे झाल्याने हा राष्ट्रीय महामार्ग वाहन चालकांसाठी अधिक सुरक्षित झाल्याचा सरकारचा दावा केव्हाच खोटा ठरला. उलट रुंदीकरणानंतरही वाहनांच्या अपघातांची संख्या सातत्याने वाढतेच आहे. रस्ता पूर्णपणे सुरक्षित आणि बांधकामही पूर्ण झालेले नसताना सरकार मात्र वाहनधारकांच्याकडून सक्तीने टोलची वसुली मात्र करते आहे. याच महामार्गावर दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा टोल वसूल केला जातो आणि दरवर्षी वाहनांच्या अपघातात कोल्हापूर ते पुणे या टप्प्यात किमान दीडशे प्रवाशांचे बळी जातात. सरकार आणि महाराष्ट्र राज्य रस्ते बांधकाम महामंडळाने आता झालेल्या गंभीर अपघाताची आणि निरपराध्यांच्या मृत्यूची दखल घ्यायला हवी. खंबाटकी घाट ओलांडल्यावर रस्त्यावरची वळणे पूर्ण काढून टाकायला हवीत आणि त्यासाठी नव्या सरळ रस्त्याचे बांधकाम तातडीने सुरू करायला हवे. याच बोगद्याच्या शेजारी खंबाटकी घाटातील सातार्‍याच्या दिशेने येणार्‍या वाहनांना धोकादायक वळणावरूनच यावे लागते. तो धोका संपवायसाठी सध्याच्या बोगद्याशेजारीच पुण्याहून सातार्‍याकडे येणार्‍या वाहनांसाठी नवा बोगदा आणि मार्ग लवकरात लवकर पूर्ण करायला हवा! हाच या भीषण अपघाताचा धडा आहे.               
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: