Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाकच्या गोळीबारात दोन जवान शहीद
ऐक्य समूह
Wednesday, April 11, 2018 AT 11:02 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 10 (वृत्तसंस्था) : पाकिस्तानी सैन्याने जम्मू-काश्मीरमधील सुंदरबनी सेक्टर येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सोमवारी रात्रीपासून मंगळवारी पहाटेपर्यंत केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीदझाले, अशी माहिती लष्कराचे प्रवक्ते कर्नल नितीन जोशी यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाक सैनिकांनी सुंदरबनी सेक्टर येथे सोमवारी रात्रीपासून मंगळवारी पहाटेपर्यंत स्वयंचलित बंदुकांनी गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला. त्याला भारतीय लष्कराने तितक्याच तीव्रतेने प्रत्युत्तर दिले. पाक सैन्याच्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद झाल्याचे कर्नल नितीन जोशी यांनी सांगितले.
या वर्षाच्या सुरुवातीपासून नियंत्रण रेषेवरील परिस्थिती अत्यंत अस्थिर असून गेल्या दोन महिन्यातच पाकने 400 वेळा गोळीबार केला आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास नियंत्रण रेषेवर गेल्या 15 वर्षांत पाककडून  सर्वाधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी पाकने नियंत्रण रेषेवर 860 वेळा तर आंतरराष्ट्रीय सीमेवर 120 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. यंदाच्या वर्षात भारतीय सैन्याने 778 कि.मी.च्या नियंत्रण रेषेवर पाकच्या गोळीबाराला तोडीस तोड प्रत्युत्तर देतानाच गनिमी काव्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ले केले आहेत. गेल्या चार ते पाच महिन्यांमध्ये भारतीय लष्कराने तुफानी गोळीबार आणि तोफांचा भडिमार करून नियंत्रण रेषेवर बलनोई, मेंढर, कलाल, केरान, दोडा, सारला, लालिली आणि बनवट क्षेत्रातील पाक लष्कराच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त केल्या असल्या तरी पाकच्या कुरापती सुरूच आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: