Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सत्ताधार्‍यांच्या निषेधार्थ विरोधकांचा सभात्याग
ऐक्य समूह
Wednesday, April 11, 2018 AT 11:17 AM (IST)
Tags: lo3
सातारा विकास आघाडीकडून बहुमताने विषय मंजूर; विरोधकांचे बोंबाबोंब आंदोलन
5सातारा, दि. 10 : सातारा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेतील विषयांच्या टिपणीची वारंवार मागणी करुनही ती न दिल्याने नविआ आणि भाजपने सभात्याग केला. सभात्याग करण्यापूर्वी नविआने बहुमताच्या जोरावर विषय मंजूर करा. पण विरोधकांना लोकांनी निवडून दिलेले आहे. त्यामुळे कामे करणार आहात का नाही ते तरी सांगा, अशी मागणी करत नगराध्यक्षा नाकर्त्या असल्याचे सांगत सभात्याग केला.  त्यानंतर साविआने विरोधकांचे विषय तहकूब ठेवून इतर विषयांना मंजुरी दिली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम होत्या. दरम्यान, सभात्याग केल्यानंतर विरोधकांनी नगरपालिकेच्या बाहेर जावून बोंबाबोंब आंदोलन केले.
सातारा पालिकेच्या सभेत प्रारंभी नगरसेविका सौ. आशा पंडित यांनी डोंगरी विकास योजनेतील कामाचा विषय पूर्ण असताना गेल्या दीड वर्षापासून घेतला नाही. विरोधकांचे विषय घ्यायचे नसतील तर तसे सांगा, असे म्हणून सत्ताधार्‍यांवर टीका केली. त्यानंतर वसुली विभागातून वसुली प्रमुखांनी चुकीची माहिती दिल्याने ज्या भागातून पालिकेकडे कर भरला गेला, त्या भागाची खोटी आकडेवारी माध्यमांनी छापल्यामुळे बदनामी झाल्याचे विशाल जाधव यांनी सांगत खुलासा मागितला. त्यालाच अनुमोदन देत अण्णा लेवेंनी चुकीची आकडेवारी देणार्‍या वसुली विभाग प्रमुखाने खुलासा करण्याची मागणी करत संबंधितावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, वसुली विभागातील अधिकारी उपस्थित नसल्याचे सांगून नगराध्यक्षांनी खुलासा नंतर करण्यात येईल, असे सांगताच विरोधी पक्षनेते मोनेंनी गैरहजर अधिकार्‍यांची पाठराखण करणे म्हणजे नगराध्यक्षांचा प्रशासनावर वचक नसल्याचे सांगत हा नाकर्तेपणा असल्याचे सांगितले. त्यामुळे अध्यक्षांनी पदावर राहायचे का? असा प्रश्‍न उपस्थित केला. त्यावर अ‍ॅड. बनकर यांनी आक्षेप घेत वसुली विभागातील दोषी अधिकार्‍याला निलंबित करण्याची मागणी केली. मात्र, यावेळी बनकर राजेश काळेंना निलंबित करा, असे सांगत होते. त्यामुळे हा बुध्दिभेद कशासाठी, असा सवाल करण्यात आला. मार्च महिन्यातील त्या चुकीच्या आकडेवारीवरून आलेल्या बातमीचा दाखला देत कारवाई अपेक्षित आहे. त्यावेळी वसुली विभागाचे अरविंद दामले प्रमुख होते. नगराध्यक्षांनी विभाग प्रमुखावर कारवाईचे आदेश दिले असले तरी मागील सभेत आरोग्य विभागाच्या कायगुडेंवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे जर पुढील सभेपर्यंत कारवाई झाली नाही तर काय? असा सवाल लेवेंनी उपस्थित केला. त्यावर पुढील सभेपूर्वी वसुली विभाग प्रमुखावर कारवाई करून अहवाल सभागृहात सादर करण्याचे आदेश नगराध्यक्षांनी दिले.
 कात्रेवाडा टाकीचे लोकार्पण शासकीय होते का नव्हते, असा मुद्दा भाजपाच्या सिध्दी पवार आणि विजय काटवटे यांनी उपस्थित करून मुख्याधिकार्‍यांनी खुलासा करण्याची मागणी केली. त्यावर पाणी पुरवठा समितीचे सभापती  श्रीकांत आंबेकर यांनी कार्यक्रम शासकीय असल्याचे सांगितले. त्यावर गदारोळ झाला. खर्च कोणी केला आणि प्रोटोकॉल पाळला का? या मुद्याला उत्तर देताना कार्यक्रमात वाजवलेल्या फटाक्यांसह पै-पैचा हिशोब असल्याचे आंबेकरांनी सांगितले. मात्र मुख्याधिकार्‍यांनी खुलासा करावा, सभापती चुकीची माहिती देत असल्याचा आरोप काटवटे यांनी केला.  त्यावर मुख्याधिकारी शंकर गोरे म्हणाले, कात्रेवाडा टाकी लोकार्पण पालिकेने केलेले नाही. कार्यक्रम पत्रिका जिल्हा प्रशासनाकडून मंजूर करून घ्यावी लागते. त्यामुळे चिडलेल्या भाजपा सदस्यांनी दोषी अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी केली. तसेच जिल्हाधिकार्‍यांकडे प्रोटोकॉलचा अवमान झाल्याची तक्रार दाखल असून सभागृहात दिलेल्या चुकीच्या माहितीबाबत नव्याने तक्रार करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर विषय पत्रिकेवरील विषय वाचण्यास सुरुवात झाली. त्यावेळी नविआ आणि भाजपच्यावतीने सभा तहकूब करावी, अशी सूचना देण्यात आली. त्यावर बोलताना विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी तुमच्याकडे बहुमत असले तरी विषयपत्रिकेवरील विषयांवर चर्चा झाली पाहिजे. विषयांची टिपणी दिली जात नाही. साविआच्या या प्रकाराला दहशत, गुंडगिरी का गळचेपी यापैकी काय म्हणायचे असा सवाल करत सभात्याग केला.
विरोधकांच्या सभा त्यागानंतर विषय क्र. 3, 4 व 6 तहकूब करून क्र. 11 कामगार नियुक्ती प्रकरणी समितीचा अहवाल पुढील सभेत घेण्याचे ठरले. बाकी सर्व विषय बहुमताने मंजूर करण्यात आले. कामगारांच्या मुद्द्यावर चर्चा करा, असा मुद्दा अण्णा लेवेंनी मांडल्यावर अ‍ॅड. बनकर यांनी लेवेंच्या जवळ जात सारवासारव केली. यावेळी अध्यक्षही शांत बघत होत्या. कोणालाच काही कळत नसल्याने अखेर कामगारांचा मुद्दा पुढील बैठकीत घेण्याचे ठरले आणि सभा पार पडली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: