हिना सिद्धूचा सुवर्णनेम, पॅरालिफ्टर सचिनला कांस्य
ऐक्य समूह
Wednesday, April 11, 2018 AT 11:21 AM (IST)
5गोल्ड कोस्ट, दि. 10 (वृत्तसंस्था) : राष्ट्रकुल स्पर्धेचा सहावा दिवस भारतासाठी संमिश्र ठरला. 10 मीटर पिस्तूल प्रकारात हुकलेले सुवर्णपदक नेमबाज हिना सिद्धूने 25 मीटर पिस्तूल प्रकारात पटकावले. पॅरा-पॉवरलिफ्टर सचिन चौधरीने कांस्यपदक मिळवून भारताच्या पदकसंख्येत एकाची भर घातली. मात्र, या व्यतिरिक्त भारताला एकही पदक मिळवता आले नाही. भारताच्या मुष्टियोद्ध्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे आणखी सहा पदके निश्चित झाली आहेत. भारताची एकूण पदकसंख्या 20 झाली असून त्यात 11 सुवर्ण, चार रौप्य व पाच कांस्यपदकांचा समावेश आहे.
हिना सिद्धूने बेलमाँट शुटिंग सेंटरवर 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. तिने स्पर्धा विक्रम नोंदवताना अंतिम फेरीत 38 गुण मिळवले. हिनाचे हे या स्पर्धेतील दुसरे पदक आहे. या आधी तिने 10 मीटर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक पटकावले होते. या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी एकूण 8 पटके मिळवली.
भारताला दिवसातील दुसरे पदक पॅराअॅथलीट सचिन चौधरीने मिळवून दिले. पॅरा-पॉवरलिफ्टर सचिनने एकूण 181 किलो वजन उचलून कांस्यपदक मिळवले. मात्र, भारताचे नेमबाज गगन नारंग आणि चैन सिंह यांनी सकाळच्या सत्रात रायफल प्रोन प्रकारात निराशा केली. मात्र, हिनाच्या सुवर्णपदकाने ही निराशा काहीशी कमी झाली. भारतीय मुष्टियोद्ध्यांनी मात्र आज धडाकेबाज कामगिरी करत सहा पदके निश्चित केली आहेत. अमित फांगल, नमन तवंर, मोहम्मद हसीमुद्दीन, मनोज कुमार आणि सतीश कुमार यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. महिला बॉक्सिंगमध्येही मेरी कोमचे पदक निश्चित झाले आहे.
भारताच्या पुरुष आणि महिला हॉकी संघांनीही आज अप्रतिम कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतीय पुरुषांनी मलेशियावर 2-1 ने तर महिलांनी दक्षिण आफ्रिकेवर 1-0 अशी मात केली. पुरुषांच्या संघाला सलामीच्या लढतीत पाकविरुद्ध 2-2 बरोबरीत समाधान मानावे लागले होते. मात्र, भारताने वेल्सपाठोपाठ मलेशियाचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली आहे.
भारताकडून हरमनप्रीतने दोन्ही गोल केले. भारताचा गटसाखळीत एक सामना अजून बाकी आहे. भारतीय महिलांच्या दक्षिण आफ्रिकेवरील विजयात राणी रामपॉलने मोलाचा वाटा उचलला. या सामन्यातील एकमेव गोल तिने चौथ्या सत्रात केला.
गोलरक्षक सविता पुनियाने दक्षिण आफ्रिकेचे सर्व प्रयत्न विफल ठरवले. या व्यतिरिक्त महिलांच्या 400 मीटर शर्यतीत भारताची हिमा दास अंतिम फेरीत दाखल झाली आहे. स्न्वॉशमध्ये महिला दुहेरीत जोश्ना चिन्नाप्पा व दीपिका पल्लेकल कार्तिक या जोडीने पाकच्या जोडीचा पराभव करुन पदकाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
मिश्र दुहेरीत दीपिकाने सौरव घोषालच्या साथीत तर जोश्नो हरिंदरपाल संधूच्या साथीत आगेकूच केली.