Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

साधूंच्या नियुक्तीचा वाद न्यायालयात
ऐक्य समूह
Wednesday, April 11, 2018 AT 11:29 AM (IST)
Tags: vi1
मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पाच साधूंना राज्य सरकारने राज्य मंत्रि-पदाचा दर्जा दिल्याचा वाद आता इंदौर उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर गेला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नर्मदा जलशुद्धीकरण समितीत या पाच साधूंचा समावेश करून त्यांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा दिल्याचे गेल्या आठवड्यात जाहीर केल्यापासून हा वाद रंगला आहे. आता रामबहाद्दूर वर्मा यांनी आपल्या वकिलामार्फत इंदौर उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या नियुक्त्या रद्द कराव्यात, अशी मागणी केली आहे. न्यायालयाने ही याचिका दाखल करून कोणत्या निकषावर आणि कोणत्या आधारे या साधूंना राज्य मंत्रिपदाचा दर्जा दिला, याबाबतचे प्रतिज्ञापत्र  येत्या 10 दिवसात दाखल करायचे आदेश राज्य सरकारला दिला आहे.
नर्मदा जलशुद्धीकरणाच्या मोहिमेत नर्मदेच्या काठी सहा कोटी वृक्षारोपण केल्याचा दावा सरकारने केला होता. तेव्हा आता राज्य मंत्रिपदाचा दर्जा बहाल केलेल्या नर्मदानंद महाराज यांच्यासह पाचही साधूंनी या मोहिमेत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करीत सरकारच्या विरोधात नर्मदा भ्रष्टाचार निर्मूलन-नर्मदा घोटाळा यात्रेची घोषणा केली होती. दरम्यान चौहान यांनी या पाचही साधूंना 31 मार्च रोजी भेटीसाठी राजधानी भोपाळमध्ये निमंत्रित करून त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर नर्मदा शुद्धीकरण मोहिमेच्या समितीत या साधूंचा समावेश केला. त्यांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा देत, मानधन, गाडी,  सचिव अशा सुविधाही जाहीर केल्या.
या साधूंना  पर्यावरण, जलशुद्धीकरण, वृक्षारोपण या कशाचीही माहिती नसताना त्यांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा देणार्‍या सरकारने मतांच्या राजकारणा-साठीच हा खटाटोप केला असल्याचा आरोप काँग्रेससह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला होता. वर्मा यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत या साधूंना राज्य मंत्रिपदाचा दर्जा देणे म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी असल्याचा आरोप केला आहे. राज्यावर 90 हजार कोटी रुपयांचे  कर्ज असताना साधूंसाठी दरमहा लाखो रुपयांची उधळपट्टी कशासाठी  असा सवालही त्यांनी केला आहे.
सरकारने नर्मदा शुद्धीकरण चळवळीत सहभागी असलेल्या                                   नित्यानंद आश्रमाचे नर्मदानंद महाराज, हरिहरानंद महाराज, इंदौरच्या  दिगंबर आखाड्याचे काँप्युटर बाबा आणि भैय्यू महाराज, योगेंद्र महाराज यांना राज्य मंत्रिपदाचा  दर्जा दिला आहे. जे साधू नर्मदा घोटाळा यात्रा काढणार होते,  तेच आता राज्य मंत्रिपदाचा दर्जा मिळाल्यावर सरकारच्याच नर्मदा शुद्धीकरण मोहिमेत मार्गदर्शन     करणार आहेत. या नेमणुकांच्या विरोधात राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना आता हे प्रकरण न्यायालयात     गेल्याने सरकारची कोंडी झाली आहे.                                                                     
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: