Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

‘कास्टिंग काऊच’ पुन्हा चर्चेत
vasudeo kulkarni
Wednesday, April 11, 2018 AT 11:30 AM (IST)
Tags: lolak1
हिंदीसह मराठी,  मल्ल्याळम, तेलगू,                                    तमिळ, भोजपुरी या भाषक  हिंदी चित्रपट सृष्टीतले आणि उपग्रह वाहिन्यांसाठी मनोरंजन मालिकांची निर्मिती करणारे काही निर्माते आणि दिग्दर्शक अभिनेत्रींचे लैंगिक शोषण करीत असल्याचे आरोप यापूर्वी जाहीरपणे झाले होते. यावर  चित्रपटसृष्टीत उलटसुलट चर्चा आणि वादंगही झाले होते. आता चित्रपटात  काम द्यायच्या  बहाण्याने तेलुगू निर्माते आणि दिग्दर्शक अभिनेत्रींचे लैंगिक शोषण करतात, ज्या अभिनेत्री ही मागणी मान्य करीत नाहीत, त्यांना चित्रपट-मनोरंजन वाहिन्यात काम मिळू दिले जात नाही, असा आरोप करीत तेलुगू चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री श्री रेड्डी हिने हैदराबादमध्ये सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यावर आपल्या अंगावरील कपडे उतरून निर्वस्त्र होत, नोंदवलेल्या निषेधाच्या घटनेने देशभर खळबळ उडाली आहे.  तेलंगणाची राजधानी आणि तेलुगू चित्रपटसृष्टीचे मुख्य केंद्र असलेल्या हैदराबादच्या फिल्म चेंबर कार्यालयाच्या समोरच्या रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी श्री रेड्डीने कास्टिंग काऊचच्या काळ्या घटनेकडे चित्रपटसृष्टी, सरकार आणि जनतेचे लक्ष वेधायसाठी अचानक, निषेधाचा हा अनोखा मार्ग अंमलात आणला. अचानक ती रस्त्यावर उतरली आणि क्षणार्धातच तिने आपल्या अंगावरचे कपडे भर गर्दीत उतरवले. बघ्यांची हा प्रकार पाहायसाठी झुंबड उडाली. काहींनी हे दृश्य स्मार्टफोनवर चित्रित करून ते प्रसारितही केले. प्रादेशिक आणि हिंदी वृत्तवाहिन्यांनी या दृश्याचे प्रसारणही केले. वृत्तपत्रांनीही तिच्या या धाडसी आंदोलनाला ठळक प्रसिद्धी दिली आणि देशभर कास्टिंग काऊचची चर्चा पुन्हा सुरू झाली.
या घटनेची गांभीर्याने दखल घेत, तेलुगू फिल्म चेंबरने   तिला संस्थेचे सदस्यत्व द्यायचे नाही, असा ठरावही तडकाफडकी मंजूर करून, तिच्याबरोबर संस्थेच्या सदस्याला काम करता येणार नाही, असा आदेश काढत तेलुगू चित्रपटसृष्टी आणि मनोरंजन वाहिन्यातून तिची कायमची हकालपट्टी केली. आपल्याला या संस्थेने गेली पाच वर्षे सदस्यत्व दिलेले नाही आणि आता ते मिळणार नसले, तरी पैसा आणि चित्रपट-मनोरंजन मालिकात काम द्यायच्या नावाखाली या चित्रपटसृष्टीत येणार्‍या नव्या मुलींचे लैंगिक शोषण केले जाते, त्यांना ब्लॅकमेल केले जाते, हे जनतेसमोर आणण्यात आपल्याला यश मिळाल्याची प्रतिक्रिया श्री रेड्डीने दिली आहे. तेलुगू आणि दाक्षिणात्य चित्रपट  निर्माते,  दिग्दर्शक मुंबईतल्या मोठ्या हॉटेलात खोल्या घेतात आणि ‘स्क्रीन टेस्ट’च्या नावाखाली चित्रपटात येण्याची इच्छा असलेल्या तरुण युवतींना बोलावून घेतात. त्या किती धाडसी म्हणजेच  अंगप्रदर्शन करू शकतात, याची चाचणी हे काही निर्माते, दिग्दर्शक घेतात. त्यांची छायाचित्रे घेतली जातात. चित्रपटात काम आणि पैसा द्यायच्या  मोबदल्यात  या मुलींच्या-कडून लैंगिक संबंधांची मागणी केली जाते. काही मुली या सौद्याला मान्यता देतात आणि त्यांना काम मिळते, असा आरोप श्री रेड्डीने केला आहे. ज्या अभिनेत्री किंवा  मुली या सौद्याला नकार देतात त्यांना काम मिळू दिले जात नाही, तेलुगू चित्रपट व्यवसायातील ही काळी बाजू लोकांना माहिती नसते, आपल्याला असेच या व्यवसायातून बाजूला फेकले ते या सौदेबाजीला आपण नकार दिल्यानेच, असा तिचा दावा आहे.
या आधी हिंदी चित्रपटसृष्टीतल्या कंगना रानौत, राधिका आपटे, रिचा चढ्ढा, टिस्का चोपडा या अभिनेत्रींनीही कास्टिंग काऊचचे आरोप जाहीरपणे केले आहेत. विशेषत: बी आणि सी श्रेणीतल्या चित्रपटात काम करणार्‍या नव्या मुली दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या लैंगिक वासनेच्या बळी ठरतात, असे चित्रपटसृष्टीतल्या ज्येष्ठ निर्माते आणि दिग्दर्शकांचे म्हणणे आहे, तर कास्टिंग काऊचच्या या अशा घटनांना चित्रपट सृष्टी आणि मनोरंजन मालिकात भूमिका करायला उत्सुक असलेल्या युवती अशा  प्रकारांच्या बळी ठरतात आणि त्याला
त्यांचीच-इतकेच काय पण त्यांच्या आई वडिलांचीही मान्यता असल्याचा दावा काही अभिनेत्रींनीच केला आहे. चित्रपटसृष्टी आणि मनोरंजन मालिकांच्या सृष्टीतील अशी ही काळी बाजू आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: