Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
खंडाळ्याजवळ भीषण अपघातात 18 ठार, 17 गंभीर
ऐक्य समूह
Wednesday, April 11, 2018 AT 11:01 AM (IST)
Tags: mn1
खंबाटकी बोगद्याच्या पुढे ‘एस’ वळणावर टेम्पो उलटला; कर्नाटकातील मजुरांवर काळाचा घाला
5खंडाळा, दि. 10 : कर्नाटक राज्यातून भोर येथे बांधकामासाठी मजूर घेवून निघालेल्या भरधाव वेगातील आयशर टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी बोगद्याच्या पुढे असलेल्या एस वळणावर तो उलटून झालेल्या अपघातात 18 जण जागीच ठार झाले तर 17 जण गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडला. अपघात झालेल्या ठिकाणचे दृष्य हृदय पिळवटून टाकणारे होते. मजुरांचे साहित्य इतरत्र विखुरले होते. मजुरांचे मृतदेह देखील परिसरात पडले होते.
याबाबत खंडाळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवार, दि. 9 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील तिकोटा येथून खोदकामासाठी भोर येथे कामगार निघाले होते. माल वाहतूक करणार्‍या या टेम्पोत (क्र. केए 37/6037) 35 पेक्षाही जास्त कामगार दाटीवाटीने बसले होते. त्यांच्यासमवेत दोन दुचाकीवरून चार जण निघाले होते. मंगळवार, दि. 10 रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास टेम्पो खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले. गाडीवर नियंत्रण मिळविता न आल्याने तो एस कॉर्नरवर उलटला व रस्त्याच्या कडेला बांधलेल्या सहा फुटी कठड्यावरून तो महामार्गाच्या बाहेर फेकला गेला. यामध्ये विजापूर तालुक्यातील माधवी अनिल राठोड (वय 45), रा. नागठाणे, रेखू शंकर चव्हाण (वय 55), रा. हडगली, संतोष काशिनाथ नायक (वय 32), रा. हडगली, मंगलबाई चंदू नायक (वय 42), रा. हडगली, कृष्णा सोनू पवार (वय 60), रा. राजनाळतांडा, किरण विठ्ठल राठोड (वय 15), रा. मदभाईतांडा, देवाबाई मोहन राठोड (वय 27), रा. मदभाईतांडा, संगीता किरण राठोड (वय 26), रा. मदभाईतांडा, देवानंद नारायण राठोड (वय 35), रा. हिटनळीतांडा, प्रियंका कल्लु राठोड (वय 18), रा. मदभाई तांडा, तन्वीर किरण राठोड (दीड वर्ष), रा. मदभाईतांडा, विठ्ठल खिरू राठोड (वय 40), रा. मदभाईतांडा, अर्जुन रमेश चव्हाण (वय 30), रा. कुडगीतांडा, श्रीकांत बसू राठोड (वय 38), रा. कुडगीतांडा, सिनू बासू राठोड (वय 30), रा. कुडगीतांडा, मेहबूब राजासाब आतार (चालक वय 55), रा. खादी ग्रामोद्योग पाठीमागे, माजीद मेहबूब आतार (वय 25), रा. खादी ग्रामोद्योग पाठीमागे, आलीका रोजा विजापूर व कल्लुभाई विठ्ठल राठोड (वय 35) हे अठरा जण जागीच ठार झाले. तर सुनील विठ्ठल राठोड (वय 05), सुनील कल्लू राठोड (वय 20), चंदू गंगू नायक (वय 60), विनोद कृष्णा पवार (वय 22), जम्मीबाई राठोड (वय 60), रा. सर्व विजापूर, वनिता पट्टू राठोड (वय 15), रा.एल.टी.नं. 1, रंबिता देवानंद राठोड (वय 30), रा. हिटनळीतांडा, ता. विजापूर, काजल अनिल राठोड (वय 5), रा. नागठाण, ता. विजापूर, रोहित देवानंद राठोड (वय 18), रा. हिटनळीतांडा, ता. विजापूर, पूजा कित्तू राठोड (वय 6),  रा. उडातांडा, ता. विजापूर, एकनाथ चंदू राठोड (वय 11), रा. हडगलीतांडा, ता. विजापूर, शांताबाई रूपसिंग पवार (वय 60), रा. हडगलीतांडा, ता. विजापूर, सचिन फत्तू राठोड (वय 18), रा. मदभाईतांडा, ता. विजापूर, निकिता श्रीकांत राठोड (वय 22), रा. कुडगीतांडा, ता. विजापूर, शांताबाई रेखू चव्हाण (वय 24), रा. हडगलीतांडा, ता. विजापूर, विद्या श्रीकांत राठोड (दीड वर्ष), रा. कुडगीतांडा, ता. विजापूर, अनिल रेखू चव्हाण (वय 24), रा. हडगलीतांडा, ता. विजापूर हे गंभीर जखमी झाले. दरम्यान, टेम्पोत असलेल्या बांधकामाच्या अवजड साहित्याचा कामगारांना फटका बसला. यामध्ये सात महिला अन् एक मुलगा यांच्यासह 10 पुरुषांचा समावेश आहे. मृतांमध्ये टेम्पो चालकाचाही समावेश आहे. टेम्पोचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातानंतर घटनास्थळी एकच आक्रोश सुरू झाला होता. दरम्यान, याच टेम्पोच्या पाठीमागून येणार्‍या त्यांच्याच टोळीतील दोघा दुचाकीस्वारांनी तत्काळ ही घटना खंडाळ्याला येऊन पोलिसांना सांगितली. खंडाळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज हांडे अन् त्यांच्या सहकार्‍यांना कळविल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना खंडाळ्याच्या ग्रामीण रुग्णालयात व शिरवळच्या खाजगी रुग्णालयात पाठविले. स्थानिक ग्रामस्थ, खंडाळा रेस्क्यू टीम व पोलिसांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे पाठविले. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. अपघात घडल्यानंतर काही वेळातच पोलीस अधीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस उपअधीक्षक विजय पवार, उपविभागीय अधिकारी अस्मिता मोरे, तहसीलदार विवेक जाधव यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तर शिरवळचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, लोणंदचे सपोनि. सोमनाथ लांडे यांच्यासह कर्मचार्‍यांनी वाहतूक सुरळीत करून परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेची फिर्याद चंद्रकांत रुपसिंग पवार यांनी दिली असून सपोनि. युवराज हांडे तपास करत आहेत.
जखमींचा व नातेवाइकांचा जिल्हा रुग्णालयात आक्रोश
सातारा, खंबाटकी घाटातील जखमींना उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात मंगळवारी सकाळी आणण्यात आले. त्यानंतर दिवसभर जखमी आणि त्यांच्या नातेवाइकांचा रुग्णालयात आक्रोश सुरु होता. विविध मान्यवरांनी भेटी देवून जखमींची विचारपसू केली. जिल्हा रुग्णालयानेही गतीने हालचाली करत जखमींना सुविधा पुरवल्या.
अपघातातील सहा जखमींची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना आयसीयुमध्ये ठेवण्यात आले. दोन लहान मुलांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने रक्त देण्यात आले.  जखमी कर्नाटक राज्यातील आहेत. त्यांना मराठी बोलता येत नव्हते. जखमी कन्नड भाषेतूनच बोलत होते. या जखमींचे काही नातेवाईक हे लक्ष्मी टेकडी, सातारा येथील आहेत. त्यामुळे ते नातेवाईक जिल्हा रुग्णालयात आले होते. कर्नाटक येथून कामानिमित्त हे सर्वजण विजापूरमधून बाहेर पडले होते. टोळ्यांच्या माध्यमातून जिथे कामे मिळतील तेथे हे तीन ते चार महिने थांबतात व पुन्हा गावाकडे जातात.
धोकादायक वळणे काढा : उदयनराजे
सातारा : खंडाळा येथील बोगद्यातून पुढे गेल्यावर अत्यंत धोकादायक अशी तीव्र उताराची वळणे आहेत. या वळणांवर व या ठिकाणी असलेल्या  एस आकाराच्या वळणावर अनेक अपघात घडून अनेकांचा नाहक जीव गेला आहे. त्याकरिता ही वळणे काढून टाकण्यासाठी आणि पुण्यावरून सातारला येताना आणखी एक बोगदा करण्याबाबत आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. बोगद्याचे काम मंजूर करण्यात आले असून, निविदा देखील काढण्यात आल्या आहेत. पुढील कार्यवाही युद्धपातळीवर जलदगतीने पूर्ण झाली पाहिजे अशी अपेक्षा आहे, असा उद्विग्न प्रतिक्रिया खा. श्री. छ.  उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिद्धीपत्रकाव्दारे व्यक्त केली आहे.
याच ठिकाणी आमचे उमदे सहकारी अविनाश धायगुडे हे देखील बळी पडले गेले आहेत याची तीव्र आठवण होत आहे, असे नमूद करून आज झालेल्या आयशर टेंपोच्या एस वळणावरील अपघातात 19 व्यक्ती दगावल्याने खा. उदयनराजे यांचे मन विषण्ण झाले.  एक लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही या दुर्दैवी कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत.
या ठिकाणच्या अपघातास कारणीभूत होणारी अपघातप्रवण वळणे हटवण्याबाबत यापूर्वी अनेक वेळा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सात-आठ वर्षापासून मागणी करण्यात आली आहे. तत्कालीन मंत्री सी. पी.जोशी, ना. ऑस्कर फर्नांडिस व विद्यमान मंत्री ना.नितीन गडकरी आदीना समक्ष भेटून, पत्र-निवेदने आदींच्या माध्यमातून संबंधितांना  वस्तुस्थिती पटवून देण्यात आली आहे. त्यानुसार नवीन बोगदा व धोकादायक वळणे हटवण्याच्या कामांना मंजुरी देखील मिळवण्यात आली असून, बोगद्याच्या कामाची तर निविदा प्रक्रिया देखील राबविण्यात आली आहे. भूसंपादनाची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे येथून पुढे अपघात होवू नये म्हणून सदरचे काम जलदगतीने पूर्ण करून घेण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. सदरची धोकादायक वळणे शक्य तितक्या लवकर वाहतुकीस सुयोग्य झाली पाहिजेत हीच अपेक्षा आहे, असेही खा. उदयनराजे भोसले यांनी नमूद केले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: