Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शेती पंपाच्या विजेसाठी शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न
ऐक्य समूह
Thursday, April 12, 2018 AT 11:33 AM (IST)
Tags: re4
5ओगलेवाडी, दि. 11 : शेतीला मिळणार्‍या अपुर्‍या वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांनी बुधवारी ओगलेवाडी येथील वीज कंपनी कार्यालयाचे दरवाजे बंद करून अधिकार्‍यांना कोंडले. यावेळी करवडी येथील अमित डुबल यांनी वीज कंपनी कार्यालयाच्या इमारतीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामुळे तणाव निर्माण झाला. या आंदोलनात करवडी, वाघेरी, बोरजाई मळा, मेरवेवाडी येथील शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी शेतकर्‍यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. गेल्या तीन महिन्यांपासून या भागात वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. रात्री केवळ एक ते दीड तास  वीज पुरवठा केला जातो. तोही वारंवार खंडित केला जातो. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून हा संताप बुधवारी व्यक्त करण्यात आला. या घटनेनंतर अधिकार्‍यांनी पोलिसांना पाचारण केले.
दरम्यान वीज कंपनीच्या अनागोंदी कारभाराबद्दल संतप्त झालेल्या करवडीसह अन्य चार गावातील ग्रामस्थांनी खंडित वीज पुरवठा होत असल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा पूर्वीप्रमाणे करावा, अशा मागणीचे निवेदन कार्यकारी अभियंता यांना दिले आहे. करवडीसह वाघेरी, वडोली निळेश्‍वर, मेरवेवाडी या ठिकाणी वीज कंपनीतर्फे करण्यात येणारा वीज पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे या पिकांना पाणी पाजता येत नाही. त्यामुळे परिसरातील पिके करपू लागली आहेत. सध्या करण्यात येणार्‍या वीज पुरवठ्यात सुधारणा करून सकाळी 8.30 ते 4.30 व रात्री 10.30 ते 8.30 असा पूर्वी होता तसा वीज पुरवठा करण्यात यावा, जेणे करून शेतकर्‍यांना शेतीला पाणी देणे शक्य होईल, असे निवेदनात म्हटले आहे. कार्यकारी अभियंता देण्यात आलेल्या या निवेदनावर करवडी, वाघेरी, वडोली निळेश्‍वर, मेरवेवाडी येथील शेतकरी व ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍या आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: