वाईत इलेक्ट्रॉनिक साहित्य दुरुस्तीचे दुकान आगीत खाक
ऐक्य समूह
Thursday, April 12, 2018 AT 11:36 AM (IST)
5वाई, दि. 11 ः वाई सराफ बाजारपेठेतील मुळे कापड दुकानासमोरील महावीर चौकातील राजेंद्र हिरवे यांच्या इलेक्ट्रॉनिक साहित्य दुरुस्ती दुकानाला मध्यरात्री आग लागली. आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या दुकानाच्या आगीची झळ लगतच्या दुकानांनाही बसली. या आगीत सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.
वाई पालिकेचा अग्निशामक विभाग, शहरातील अडीचशे युवक, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक चरण गायकवाड, भारत खामकर, दीपक ओसवाल, संजय लोळे, विवेक भोसले, विजय ढेकाणे, पालिका कर्मचारी आदींनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी पोलीस निरीक्षक विनायक वेताळ व कर्मचारीही उपस्थित होते. सुरुवातीची आगीची तीव्रता लक्षात घेऊन पाचगणी पालिका व किसनवीर साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. मंगलसिंग परदेशी व शेख यांच्या टँकरने बंबाला सतत पाणी पुरवठा केल्याने व शहरातील संघटित युवकांच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले. अन्यथा मध्य वस्तीतील बाजारपेठेत मोठी दुर्घटना घडली असती.