Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राहुल गांधींकडून माफीनाम्याची मागणी
ऐक्य समूह
Thursday, April 12, 2018 AT 11:35 AM (IST)
Tags: mn2
साईभक्तांचा अपमान केल्याचा शिर्डी संस्थानचा आरोप
5मुंबई, दि. 11 (वृत्तसंस्था) : केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि त्यांच्या पत्नीच्या आर्थिक घोटाळ्याबाबत ‘शिर्डीचा चमत्कार’ असे ट्विट करून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जगभरातील साईभक्तांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागावी, अशी मागणी शिर्डीच्या श्री. साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी केली आहे.
रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि त्यांच्या कुटुंबाचा कथित आर्थिक गैरव्यवहारातील सहभागावरून टीका करताना राहुल गांधी यांनी बुधवारी ट्विट केले होते. ‘मित्रांनो, शिर्डीच्या चमत्कारांना कोणत्याही मर्यादा नाहीत’, असे उपहासात्मक वक्तव्य राहुल गांधींनी या ट्विटमध्ये केले होते. त्यामुळे जगभरातील साईभक्तांचा अपमान झाल्याची टीका शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी केली. आपल्या राजकीय लाभांसाठी साईबाबांचे नाव ओढणे चुकीचे आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये शिर्डीचे नाव ओढणे अत्यंत दुर्दैवी आहे. या ट्विटमुळे जगभरातील साईभक्तांचा अपमान झाला आहे. आम्ही या ट्विटचा साईभक्तांच्यावतीने निषेध करतो. राहुल गांधींनी साईभक्तांची माफी मागावी, असे ट्विट डॉ. हावरे यांनी केले.
केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याशी संबंधित शिर्डी इंडस्ट्रीजच्या आर्थिक गैरव्यवहारावरून काँग्रेस नेते पवन खेरा यांनी मंगळवारी आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. पियुष गोयल 25 एप्रिल 2008 ते 1 जुलै 2010 दरम्यान शिर्डी इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि पूर्ण वेळ संचालक होते. या कालावधीत कंपनीने युनियन बँकेच्या अधिपत्याखाली असलेल्या बँकेकडून 258.62 कोटींचे कर्ज घेतले होते. गोयल यांनी नंतर कंपनीचा राजीनामा दिला होता. मात्र, मोदी सरकार केंद्रात आल्यानंतर या कंपनीच्या 651.87 कोटी रुपये थकीत कर्जापैकी 65 टक्के कर्ज माफ करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजकारणातील सचोटीच्या गप्पा मारतात. मात्र, गोयल यांच्या कुटुंबीयांच्या गुंतवणुकीबाबत गप्प आहेत. गोयल यांच्या पत्नीने ही कंपनी अवघ्या एक लाख रुपये भांडवलावर सुरू केली. मात्र, गेल्या दहा वर्षांत या कंपनीने तब्बल 30 हजार कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. हे गुंतवणुकीचे ‘जय शहा मॉडेल’ आहे. मोदी सरकारच्या काळात अशा कंपन्यांच्या उलाढालीत कोट्यवधींची वाढ झाली आहे, अशी टीका खेरा यांनी केली होती.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: