Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दरोडेखोरांच्या टोळीतील फरारी संशयित गजाआड
ऐक्य समूह
Thursday, April 12, 2018 AT 11:32 AM (IST)
Tags: re3
5कराड, दि.11: येथे बालाजी मंदिरा-समोर पेंढारकर यांच्या अर्धपुतळ्याजवळ पाच जणांची टोळी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने हत्यारासह दि.16 फेब्रुवारीच्या रात्री आली असता कराड शहर पोलिसांनी त्या टोळीतील चौघांना अटक केली होती. मात्र दोघे जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले होते.
त्यातील एक सचिन उर्फ सच्या डांगणे यास गांधीनगर, जि. कोल्हापूर येथे सापळा रचून कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले. त्याच्यावर सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात 25 पेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दि.16 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास बालाजी चौक येथील बालाजी मंदिरासमोर नीलेश गणपती पांडव (वय 19), रा. मुरशिंघे, ता. करवीर जि. कोल्हापूर, किशन उर्फ किशोर उमाशंकर कुंभार (वय 20), सीताराम राजू भोसले (वय 30) दोघेही रा.रेल्वे स्टेशनजवळ, गांधीनगर, ता. करवीर, जि.कोल्हापूर, सचिन उर्फ सच्या डांगणे, रा.चिंचवड, गांधीनगर, ता.करवीर,जि.कोल्हापूर, महादेव उर्फ महाद्या कापले, रा.गडमुडशिंगी, ता. करवीर, जि. कोल्हाूपर हे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने हत्यारासह आले होते. त्यावेळी पोलिसांची चाहूल लागताच सचिन डांगणे व महादेव कापले दोघे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले होते. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गांधीनगर, जि.कोल्हापूर पोलिसांच्या मदतीने गांधीनगर येथे सापळा रचून सचिन डांगणे यास अटक करून पुढील कारवाईसाठी सपोनि. जौंजाळ यांच्या ताब्यात दिले. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, पोलीस निरीक्षक राजेंद्र राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड,  हवालदार सतीश जाधव, संजय जाधव, सचिन गुरव यांच्या पथकाने केली. सपोनि. डी.टी.जौंजाळ तपास करत आहेत.

            
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: