Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अपघातातील जखमींना मदत करण्यासाठी कर्नाटकमधील पथक सातार्‍यात तळ ठोकून
ऐक्य समूह
Thursday, April 12, 2018 AT 11:15 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 11 : खंबाटकी बोगद्याजवळ झालेल्या अपघातातील जखमींना कर्नाटक सरकारची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी तेथील अधिकार्‍यांचे पथक सातार्‍यात दाखल झाले असून मदत देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, विजापूर परिसरातील विविध तांड्यातील 36 जण खासगी टेम्पोतून भोर येथे कामासाठी येत असताना खंबाटकी बोगद्या-जवळील एस वळणावर मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता झालेल्या अपघातात विजापूर येथील 18 जण मृत्युमुखी पडले होते आणि 19 जण जखमी झाले होते. या अपघाताची चौकशी करण्यासाठी आणि अपघातग्रस्तांची चौकशी करून त्यांना कर्नाटक सरकारची मदत मिळवून देण्यासाठी विजापूर पोलीस मुख्यालयाचे उपअधीक्षक, तहसीलदार कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांचे एक पथक बुधवारी सातार्‍यात दाखल झाले आहे. या पथकाने चौकशी करत जखमींना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठीची कार्यवाही तत्काळ सुरू केली आहे.
या अपघातात मृत पावलेल्यांचे शवविच्छेदन करून पोलीस आणि महसूल यंत्रणा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देत होते. हे मृतदेह गावी नेण्यासाठी आवश्यक असणारी सर्व ती मदत जिल्हा प्रशासनाने संबंधितांच्या नातेवाइकांना उपलब्ध करून दिली होती. अपघातात जखमी झालेल्या 19 जणांना नंतर उपचारासाठी जिल्हा  रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर विजापूरच्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांंनी सातारा जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधत माहिती घेतली. बुधवारी त्यांच्या सूचने-नुसार पोलीस उपअधीक्षक दर्जाचा एक अधिकारी आणि विजापूर तहसीलदार कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचार्‍यांचे एक पथक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. या पथकाने जखमींची चौकशी करत त्यांच्यावर  सुरू असणार्‍या उपचारांची माहिती घेतली. या अपघातातील जखमी जमीबाई राठोड आणि काजल राठोड यांना  बुधवारी विजापूर येथे, विनोद राठोड याला पुण्याला तर किरण राठोड आणि रोहित राठोड या दोघांना अधिक उपचारासाठी सातार्‍यातील खासगी रुग्णालयात दाखल
करण्यात आले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: