Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
खटल्यांच्या वाटपाचा अधिकार सरन्यायाधीशांचाच
ऐक्य समूह
Thursday, April 12, 2018 AT 11:12 AM (IST)
Tags: mn1
सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा; याचिका फेटाळली
5नवी दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांचे वाटप आणि खंडपीठे गठीत करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त सरन्यायाधीशांचा असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. दिल्लीतील वकील अशोक पांडे यांनी दाखल केलेली याचिकाही न्यायालयाने फेटाळली.
सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठांची नियुक्ती आणि खटल्यांच्या वाटपात पारदर्शकता आणण्यासाठी नियमावली करावी, खटल्यांचे वाटप करताना सरन्यायाधीशांनी दोन सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशांशी सल्लामसलत करावी, अशी मागणी करणारी याचिका वकील अशोक पांडे यांनी दाखल केली होती. रजिस्ट्रारला विशेष नियमावली तयार करण्याबाबत निर्देश द्यावेत. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठात सरन्यायाधीशांनंतर सर्वात वरिष्ठ असलेल्या दोन न्यायाधीशांचा समावेश असावा. घटनापीठात सरन्यायाधीशांसह सर्वात वरिष्ठ पाच न्यायाधीशांचा समावेश असावा किंवा सर्वात वरिष्ठ तीन न्यायाधीश आणि दोन कनिष्ठ न्यायाधीशांसा समावेश असावा, अशी नियमावली करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.
ही याचिका सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने बुधवारी फेटाळून लावली. या खंडपीठात सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याबरोबर न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांचा समावेश होता. खंडपीठाच्यावतीने न्या. चंद्रचूड यांनी निकालपत्र लिहिले. सर्वोच्च न्यायालयात सर्व न्यायाधीश समान असले तरी त्यात सरन्यायाधीशांचे स्थान वरचे आहे. त्यामुळे खटल्यांचे वाटप आणि खंडपीठे गठीत करण्याचा अधिकार सर्वस्वी त्यांचा आहे. सरन्यायाधीश हे न्यायसंस्थेचे प्रमुख असल्याने ते पार पाडत असलेल्या जबाबदार्‍यांबाबत अविश्‍वास दाखवता येणार नाही. सरन्यायाधीशांचे पद संविधानिक आहे. केवळ शंकेच्या आधारावर सरन्यायाधीशांच्या अधिकारांवर प्रश्‍न उपस्थित करता येणार नाही, असे न्यायालयाने निकालपत्रात स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाचे चार वरिष्ठ न्यायाधीश जस्ती चेलमेश्‍वर, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन बी. लोकूर व न्या. कुरियन जोसेफ यांनी 12 जानेवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सर्वोच्च न्यायालयाच्या आणि सरन्यायाधीशांच्या कामकाजावर प्रश्‍न उपस्थित केले होते. सरन्यायाधीश महत्त्वपूर्ण खटले आपल्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या न्यायाधीशांकडे वर्ग करत आहेत, असे गार्‍हाणे या न्यायाधीशांनी जाहीरपणे मांडले होते. सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणाचा खटला चालवणारे सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण आपल्यापेक्षा कनिष्ठ न्यायाधीशांकडे सोपवण्यात आल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती. या संदर्भात ही जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: