Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

चिमण्यांचा जलदूत
vasudeo kulkarni
Friday, April 13, 2018 AT 11:18 AM (IST)
Tags: lolak1
शहरी भागात वाढलेले सिमेंट काँक्रीटचे जंगल, बेसुमार वृक्षतोड, पर्यावरणाचा र्‍हास यामुळे नागरी जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या चिमण्यांच्या अधिवास संपत गेला. चिमण्यांना घरटी बांधायला सुरक्षित जागा राहिली नाही. हळूहळू शहरी भागातून बाल जीवनापासून परिचयाची असलेली चिऊताई दिसेनाशी झाली. चिमण्यांची संख्या कमी होत गेली. चिऊताईच दिसेनाशी झाल्याने काही पक्षीमित्रांनी चिमण्यांना वाचवायची, त्यांना पुन्हा घराच्या परिसरात घरट्यांची सोय उपलब्ध करायची मोहीम सुरू केली. काही पक्षीमित्रांनी शहरी भागात चिमण्यांसाठी सुरक्षित घरटी बांधून झाडांना टांगायचा उपक्रम सुरू केला. गेल्या काही वर्षात जागतिक चिमणी दिवसही साजरा केला जातो. मानवी जीवनाचे वैभव असलेल्या चिमण्यांना पुन्हा संरक्षण मिळावे, त्यांची संख्या वाढावी, यासाठीच ही मोहीम आणि पक्षीमित्रांची सारी खटपट!
चिमण्यांचा पारंपरिक सुरक्षिततेचा अधिवास संपल्यामुळेच नव्हे, तर दरवर्षीच्या रणरणत्या उन्हात चारा-पाणी  मिळत नसल्यानेही दरवर्षी हजारो चिमण्यांचे बळी जातात. अतिउष्णतेच्या लाटा आल्या म्हणजे चिमण्यांची होरपळ होते. उष्माघाताने चिमण्यांवर मरण ओढवते. रखरखत्या उन्हात चिमण्या आणि अन्य पाखरे दुपारच्या वेळी झाडांच्या पानाआड सावलीत आश्रय घेतात. पण, तरीही उन्हाचा तडाखा त्यांना बसतोच आणि कासावीस झालेल्या चिमण्या झाडावरून खाली कोसळतात. तडफडून मरतात.
20 वर्षापूर्वी मध्यप्रदेशातल्या खांडवा जिल्ह्यातल्या शहाजापूर जवळच्या छोट्याशा गावात, उन्हाळ्यात दोन चिमण्या भर दुपारी झाडावरून उष्माघाताने खाली कोसळ-ल्याचे एका शेतकर्‍याने पाहिले. तो धावत त्या चिमण्यांजवळ गेला. त्याने त्या घायाळ चिमण्यांना पाणी पाजले. पण, काही उपयोग झाला नाही. या चिमुकल्यांचे प्राणपाखरू उडून गेले होते. या घटनेने हृदय पिळवटून गेलेल्या त्या माणसाने उन्हाळ्यात चिमण्यांना पाण्याची उपलब्धता व्हावी यासाठी मोहीम सुरू करायचा निर्धार केला. त्यासाठी मातीचे पाण्याने भरलेले परळ गावात आणि रानात ठेवायचे त्याने ठरवले. पण, परळ विकत घ्यायच्यासाठी त्याच्याकडे पैसेही नव्हते. घरातली थोडीफार पुंजी जमवून त्याने गावातल्या कुंभाराकडून प्रत्येक एक रुपयाप्रमाणे 500 परळ विकत घेतले आणि पाण्याने भरून ते गावात, रानात ठेवले. दररोज या परळात तो पाणी भरून ठेवत असे. लोकांनी त्याला प्रारंभीच्या काळात वेड्यात काढले. पण, तो थांबला नाही. त्याने चिमण्यांसाठी पाण्याची सोय करायचे व्रतही सोडले नाही. दरवर्षी खांडवा जिल्ह्यातल्या गावागावात चिमण्यांसाठी मातीचे परळ मोफत द्यायचे त्याचे सत्र सुरूच राहिले. शेतकरी आणि लोकांनाही त्याने सुरू केलेल्या या पक्षीदयेच्या मोहिमेचे महत्त्व हळूहळू पटायला लागले आणि लोकही त्याला आर्थिक मदत करायला लागले. सामाजिक संस्थाही या कामासाठी पुढे आल्या.
आता दरवर्षी हा चिऊचा मित्र पाच हजाराच्या वर मातीचे परळ चिमण्या-पक्ष्यां-साठी उन्हाळ्यात  गावोगाव जाऊन वाटतो. लोक पाण्याने भरलेले परळ घराच्या अंगणात, रानात ठेवतात. चिमण्या, पक्षी हे पाणी पितात. आनंदाने त्यात डुंबतात. ज्या निसर्गोपासक शंखपुष्पी महाराज दरियाव सिंह या शेतकर्‍याने हा उपक्रम सुरू केला, त्याला आता लोक चिडियाँबाबा या नावाने ओळखतात. चिडियाँबाबाच्या या उपक्रमाचे लोण आता मध्यप्रदेशातल्या हजारो गावात पोहोचले आहे. लोक स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन उन्हाळ्यात चिमण्या आणि पक्ष्यांसाठी पाण्याची, चार्‍या-चीही सोय करीत आहेत. अनेक व्यापार्‍यांनीही या पक्षीदयेच्या उपक्रमाची प्रशंसा करीत सहाय्य केले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: