Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
एका ‘खिलाडी’ने घेतली दुसर्‍या ‘खिलाडी’ची भेट
ऐक्य समूह
Friday, April 13, 2018 AT 11:11 AM (IST)
Tags: re2
खा. उदयनराजेंच्या भेटीने अक्षयकुमार भारावला
5पिंपोडे बुद्रुक, दि. 12 : ‘केसरी’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पिंपोडे बुद्रुक परिसरात वास्तव्यास असलेला बॉलीवूडचा ‘खिलाडी’ अक्षयकुमार याची राजकारणातील ‘खिलाडी’ समजल्या जाणार्‍या खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी दुपारी अचानक भेट घेतली. या भेटीमुळे हिंदी सिनेसृष्टीतील हा सुपरस्टार भारावून गेला तर पिंपोडे पंचक्रोशीतील नागरिकांना सुखद धक्का बसला.
पिंपोडे बुद्रुक परिसरात सुरू असलेल्या जलयुक्त शिवार कामांच्या आणि वॉटर कप स्पर्धेच्या अनुषंगाने खा. उदयनराजे यांनी या भागाचा गुरुवारी दौरा केला. त्यावेळी बाजूलाच अक्षयकुमार याच्या ‘केसरी’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. हे समजताच खा. उदयनराजे यांनी आपला मोर्चा थेट चित्रीकरणस्थळी वळवला. उदयनराजेंच्या अचानक झालेल्या ‘एन्ट्री’मुळे चित्रपटाच्या सेटवर धावपळ उडाली. जो तो चित्रीकरण सोडून उदनराजेंबरोबर सेल्फी घेऊ लागला. दरम्यान, एका कर्मचार्‍याने उदयनराजे आल्याची वर्दी अभिनेता अक्षयकुमारला दिली. लागलीच अक्षय कुमार याने खा. उदयनराजे यांची घट्ट मिठी मारून भेट घेतली. यावेळी दोघांची वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. अक्षयकुमार म्हणाला, सातारा जिल्हा मला प्रथमपासूनच आवडतो. यापूर्वी माझ्या ‘खट्टा मिठा’ या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण फलटण येथे झाले होते. या जिल्ह्यातील विविध निसर्गरम्य स्थळांवर नेहमीच अनेक हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण  होते. येथील निसर्ग आणि भौगोलिक परिस्थिती चित्रीकरणासाठी अनुकूल आहे. इथून पुढेही माझ्या चित्रपटांच्या शूटिंगसाठी मी या जिल्ह्यासाठी आग्रही असेन. खा. उदयनराजे यांनीही अक्षयकुमारच्या सामाजिक कार्याचे तोंडभरून कौतुक केले. ‘भूमिपुत्र’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दिलेल्या रोजगाराबद्दलही त्याचे आभार मानले. खा. उदयनराजे भोसले यांनी अक्षयकुमारला जलमंदिर पॅलेस भेटीचे निमंत्रण दिले. हे निमंत्रण अक्षयने आनंदाने स्वीकारले. आज दिवसभर खा. उदयनराजे व अक्षयकुमार यांच्या भेटीचीच चर्चा सोशल मीडियावर पहायला मिळत होती.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: