Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री फितूर
ऐक्य समूह
Friday, April 13, 2018 AT 10:59 AM (IST)
Tags: mn2
प्रकल्प होऊ देणार नाही : उद्धव ठाकरे
5मुंबई, दि. 12 (प्रतिनिधी) : नाणार प्रकल्प लादणार नाही, असे आश्‍वासन देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फितूर झाले असले तरी स्थानिकांचा विरोध असेल तर हा प्रकल्प कदापिही कोकणच्या भूमीत येणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले.
शिवसेना आणि स्थानिक जनतेचा विरोध असतानाही कोकणातील प्रस्तावित नाणार प्रकल्पाबाबत परदेशी कंपन्यांसोबत दिल्लीत स्वाक्षर्‍या करण्यात आल्या आहेत. सौदी अरेबियातील ‘अरामको’ ही मोठी कंपनी नाणार रिफायनरी प्रकल्पात 50 टक्के गुंतवणूक करणार आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले. स्थानिकांचा विरोध असेल तर हा प्रकल्प होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देऊनही हा प्रकल्प लादला गेला. हा विश्‍वासघात आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला दिल्लीत किंमत नाही. विकासाच्या नावाखाली कोकणचे वैभव मारू नका. या प्रकल्पामुळे तेथील आंबा, बांबूची वने नष्ट होण्याचा धोका आहे.    
निसर्ग मारून कोकणची राखरांगोळी करू नका. मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा झाली, तेव्हा त्यांनी हे आक्षेप मान्य केले होते. कोकणातील जनतेवर अन्याय करणारा प्रकल्प नको, असे त्यांनी दिल्लीतील लोकांना ठणकावून सांगायला हवे होते; परंतु मुख्यमंत्री फितूर झाले आहेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प शिवसेना होऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: