Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा डंका
ऐक्य समूह
Friday, April 13, 2018 AT 11:10 AM (IST)
Tags: sp1
कुस्तीगीर राहुल आवारेला सुवर्ण, सुशीलचाही विक्रम
5गोल्ड कोस्ट, दि. 12 (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट  येथे सुरू असलेल्या 21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आठवा दिवस  भारताच्या कुस्तीगीरांनी गाजवला. महाराष्ट्राच्या राहुल आवारेने पदार्पणातच कुस्तीत देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. अनुभवी कुस्तीगीर सुशीलकुमारनेही सुवर्णपदक पटकावताना सलग तिसर्‍या राष्ट्रकुल स्पर्धेत सोनेरी कामगिरी करण्याचा पराक्रम केला. भारताच्या कुस्तीगीरांनी आज एकूण चार पदकांची कमाई केली.
राहुलने 57 किलो वजनी गटात कॅनडाच्या स्टीव्हन ताकाहाशीवर 15-7 अशी मात करत भारताला आजच्या दिवसातील आणि कुस्तीतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. शेवटच्या फेरीत ताकाहाशीने लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र, महाराष्ट्राच्या मातीत कुस्तीचे धडे गिरवलेल्या राहुलने त्याचा डाव उलटवत सुवर्णपदकावर नाव कोरले. राहुलने सुवर्णपदक जिंकल्यानंतर पुण्यात त्याचे प्रशिक्षक काका पवार यांच्या तालमीत मल्लांनी जल्लोष केला. आपण पाहिलेले स्वप्न राहुलने पूर्ण केल्याबद्दल काका पवार यांनी समाधान व्यक्त केले. राहुलने इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या मल्लांवर मात करत उपांत्य फेरी गाठली होती. तेथे त्याने पाकिस्तानच्या मल्लाचा पराभव केला होता.
अनुभवी मल्ल सुशीलकुमारने भारताला आजच्या दिवसातील दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. त्याने 75 किलो (हेवीवेट) अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सन बोथावर अवघ्या 1 मिनिट आणि 20 सेकंदात 10-0 अशी मात करत सलग तिसर्‍या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाच्या कमाईचा विक्रम केला. त्यानंतर महिलांच्या 53 किलो वजनी गटात भारताची कुस्तीपटू बबिताकुमारी फोगटने रौप्यपदकाची कमाई केली. अंतिम फेरीत बबिताला कॅनेडियन प्रतिस्पर्ध्याकडून हार पत्करावी लागली. बबिताने ग्लासगो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. मात्र, त्या कामगिरीची पुनरावृत्ती तिला करता आली नाही. महिलांच्या 76 किलो हेवीवेट वजनी गटात भारताच्या किरणनेही कांस्यपदकाची कमाई केली. अ‍ॅथलेटिक्समध्येही भारताने आज पदकांचे खाते उघडले. थाळीफेक प्रकारात सीमा पुनिया आणि नवजीत कौर धिल्लन यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाची कमाई केली. त्या आधी महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंतने 50 मीटर रायफल प्रोन प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. नेमबाजीत भारताचे हे 12 वे पदक ठरले.
महावीर फोगट यांची पुन्हा निराशा
बबिताकुमारी फोगटने रौप्यपदकाची कमाई केली असली तरी आपल्या मुलीचा हा पराक्रम तिचे वडील महावीरसिंह फोगट यांना पाहता आला नाही. 
तिकीट न मिळाल्याने महावीर फोगट यांना मैदानात प्रवेश देण्यात आला नाही. या प्रसंगामुळे अनेकांना दंगल चित्रपटातल्या अखेरच्या प्रसंगाची आठवण झाली. वडील पहिल्यांदा परदेशात माझी लढत पाहायला आले होते. मात्र, त्यांना माझा सामना पाहता आला नाही, याचे मला खूप वाईट वाटले. प्रत्येक स्पर्धकाला त्याच्या जवळच्या व्यक्तींसाठी दोन तिकिटे देण्यात आली होती. बाबांना तिकीट मिळावे यासाठी मी केलेले प्रयत्न अपयशी ठरले. सर्वात दुःखदायक गोष्ट म्हणजे त्यांना माझा सामना टीव्हीवरही पाहता आला नाही, अशी नाराजी बबिता फोगटने व्यक्त केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: