Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पंचायत राज समितीचा अधिकारी, कर्मचार्‍यांना दणका
ऐक्य समूह
Friday, April 13, 2018 AT 11:08 AM (IST)
Tags: lo2
दंड, वेतनवाढ रोखण्याचे आदेश : आरोग्य व शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार उघड
5सातारा, दि. 12 : पंचायत राज समितीने गेल्या दोन दिवसात अनेक अधिकारी व कर्मचार्‍यांना दणका दिला आहे. काही जणांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला असून काही जणांची एक वेतनवाढ रोखली आहे. दरम्यान, पंचायत राज समितीने तपासणीसाठी पाच पथके तयार केली आहेत. त्यापैकी एका पथकाने  गुरुवारी सातारापंचायत समितीची तपासणी केली. या तपासणीमध्ये आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. दोन्ही विभागांनी मोघम आकडेवारी सादर करुन समितीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढण्यात आले.
गेले दोन दिवस पंचायत राज समितीने तपासण्या आणि विचारणा करुन अधिकारी व कर्मचार्‍यांना हैराण करुन टाकले आहे. तपासण्या करताना विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देताना अधिकारी व कर्मचार्‍यांची बोबडीच वळत आहे.  जिल्हा परिषदेत बुधवारी तीच अवस्था होती. गुरुवारी सातारा पंचायत समितीतही तेच चित्र पहायला मिळाले. पंचायत समिती तपासणी करणार्‍या गटामध्ये गटप्रमुख अ‍ॅड. दिलीप सोपल, भारत भालके, राहुल बोंद्रे, तुकाराम कोते, अव्वर सचिव प्रकाशचंद्र खेंदले, उपसचिव ए. बी. रिंगणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, जावेद शेख,  संजय सोनावणे यांचा समावेश होता. ही समिती प्रारंभी कोरेगावला गेली होती. कोरेगाववरुन दुपारी समिती पंचायत समितीत आली. पंचायत समितीत आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, सभापती मिलिंद कदम, उपसभापती जितेंद्र सावंत, गटविकास अधिकारी श्रीमती अमिता गावढे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर सभागृहात  पंचायत राज समितीच्या सदस्यांनी आरोग्य आणि शिक्षण विभागाची शाळाच घेतली. प्रत्येकाला प्रश्‍न विचारुन त्यांनी हैराण करुन सोडले. प्रारंभीच त्यांनी खरे बोला, जी त्रुटी असेल ती सांगा नाहीतर पुन्हा खैर नाही, असा इशारा दिला. त्यानंतर मुख्य लेखा परीक्षकांमार्फत पंचायत समितीची तपासणी केली आहे का, असा प्रश्‍न सदस्यांनी विचारला. त्यावर तपासणी केली असून त्यांनी सूचना केल्यानुसार मार्गदर्शन मागवले आहे, असे सांगण्यात आले. आपल्या उत्पन्नातून योजना हाती घेतल्या आहेत का या प्रश्‍नावर 7 योजना व 12 विकास कामे केल्याचे उत्तर देण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रांना किती वेळा भेटी दिल्या या प्रश्‍नावर पाच वेळा भेटी दिल्याचे सांगितले. त्यावर किती उपकेंद्र, असा प्रश्‍न त्यांनी केला. त्यावर 8 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 45 उपकेंद्र असून त्यांना भेटी दिल्याचे सांगितले. शाळांची संख्या जास्त आहे. किती मुलं आजारी आढळली या प्रश्‍नावर 260 हा आकडा सांगताच आकडेवारी फुगवल्यासारखी वाटते, असा सवाल त्यांनी केला. हिमोग्लोबिनचे प्रमाण जास्त कसे, असा प्रश्‍न विचारल्यानंतर  कण्हेर आणि नागठाणे आरोग्य केंद्राच्या हद्दीत 99 टक्के मुलींचे प्रमाण असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. हजार मुलांच्या तपासणीत 250 मुले गैरहजर कशी?, 36 मुलांमध्ये दोष आढळून आला आहे, त्यावर उपचार का नाही झाला, ही मुले शाळेत आहेत का?, काय परिस्थिती आहे? एका मुलीचा मृत्यू झाला, त्याला जबाबदार कोण? अशा प्रश्‍नांची सरबत्तीच सदस्यांनी केली. त्यानंतर शिक्षण विभागाचा आढावा झाला. त्यामध्ये 2013-14 मध्ये किती शाळांना विस्तार अधिकारी यांनी भेटी दिल्या, असा प्रश्‍न विचारला. कागदपत्रामध्ये दिलेल्या आकडेवारीत घोळ आहे, असा प्रश्‍न त्यांनी केला. आकडे कसेही भरले आहेत. रेकॉर्ड न तपासता मोघम आकडे भरुन आमची दिशाभूल करता काय, अशा शब्दात अधिकार्‍यांना झापण्यात आले. सकाळी दहा वाजता जिल्हा परिषदेत भेटा आणि योग्य आकड्यांसह रेकॉर्ड सादर करा, अशा शब्दात त्यांनी अधिकार्‍यांना उलटे केले.
दोन दिवसात पंचायत राज समितीला रेकॉर्ड आणि कामामध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. त्यावरुन त्यांनी अनेक अधिकारी व कर्मचार्‍यांवर दंडाची कारवाई केली आहे. काही जणांची वेतनवाढ रोखण्याचे आणि रद्द करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. मात्र एकूण आकडेवारी समजू शकलेली नाही.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: