Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शिक्षक बँकेच्या माजी अध्यक्ष, उपाध्यक्षांसह 30 जणांवर गुन्हा दाखल
ऐक्य समूह
Friday, April 13, 2018 AT 11:01 AM (IST)
Tags: lo1
नोकर भरती, जागा खरेदीसह अनेक गैरप्रकारांची प्रकरणे भोवली
5सातारा, दि. 12 :  नोकर भरतीमध्ये गैरप्रकार, पदोन्नती, कोअर बँकिंग प्रणाली बसवण्याची प्रक्रिया, महाबळेश्‍वर शाखेच्या जागेच्या खरेदीमध्ये गैरप्रकार व अपहार करुन बँकेचे नुकसान केल्याच्या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार प्राथमिक शिक्षक बँकेच्या माजी अध्यक्ष व उपाध्यक्षांसह 30 जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांची तत्कालीन अध्यक्ष विठ्ठल अंकुशराव माने, तत्कालीन उपाध्यक्ष विजय बापूसाहेब जाधव, संचालक रवींद्र बाबूराव भंडारी, मोहन राजाराम सातपुते,हेमंतकुमार मारुतराव जाधव, रणजित अंकुश गुरव, सुलभा तानाजी सस्ते, कामिनी महेंद्र शिलवंत, वनिता हणमंतराव भोईटे, अरुण तुकाराम पाटील, मनोहर किसन कदम, सुरेश विठोबा दुदुस्कर, संजय हरिबा ओंबळे, नारायण महादेव शिंदे, संतोष जगन्नाथ शिंदे, मच्छिंद्र विश्‍वासराव ढमाळ, सोमनाथ बाजीराव लोखंडे, हणमंत किसनराव जगताप, रामचंद्र तुकाराम कदम, रामराव पांडुरंग बर्गे, विश्‍वंभर कृष्णराव रणवरे, शशिकांत शंकर बागल, जयप्रकाश वसंतराव साबळे, हणमंत संभाजी जगदाळे, लक्ष्मण दिगंबर काळे, कृष्णराव दत्ताजीराव जाधव, दिलीप हणमंत चौधरी, प्रमोद सदाशिव परामणे, दत्तात्रय भिकू भिलारे तसेच बँकेची भरती प्रक्रिया राबवणार्‍या कंपनीचे के. एम. चिटणीस अशी नावे आहेत.
बँकेचे विद्यमान अध्यक्ष बलवंत संभाजी पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली असून  न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार हा न्यायालयीन (एम) गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, 2013-14 मध्ये संगणकीकरणामुळे   बँकेच्या कर्मचार्‍यांची संख्या आवश्यकतेपेक्षा जास्त झाली होती. त्यामुळे बँकेने सेवानिवृत्ती योजना जाहीर केल्यानंतर त्यामध्ये 15 ते 20 कर्मचारी निवृत्त झाले. बँकेच्या संचालक मंडळाने तीन वेळा नवीन नोकरभरती न करण्याचा ठराव केला होता. मात्र तत्कालीन संचालक मंडळाने बेकायदेशीरपणे नोकरभरती केली. या भरतीच्या प्रक्रियेसाठी चिटणीस यांच्या कंपनीला नियुक्त केले होते. या कंपनीला हाताला धरून तत्कालीन संचालक व कर्मचार्‍यांच्या नातेवाइकांना उत्तीर्ण झाल्याचे खोटे व बेकायदेशीर गुण दाखवून 37 जणांची भरती केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
ही प्रक्रिया राबवताना सहकार खात्याने दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन झाले आहे. बॅकलॉग नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे बँकेवर आर्थिक बोजा पडला. हा गैरव्यवहार व अफरातफर कायदेशीर दाखवण्यासाठी आवश्यकता नसताना बँकेच्या 11 पैकी 7  शाखांमध्ये शिफ्ट पध्दत अवलंबली. तसेच निकष डावलून 2010 ते 2015 या कालावधीत बेकायदेशीर बढत्या दिल्या. बँक व कर्मचारी संघटनांमध्ये झालेल्या कराराचे पालन झाले नाही. कोअर बँकिंग प्रणाली सुरू करताना नवीन सॉफ्टवेअर खरेदी व त्याबाबतच्या सेवा-सुविधेचा करार बेकायदेशीर पध्दतीने झाला. त्यामुळे बँकेला खरेदीसाठी 29 लाख व देखभालीसाठी महिना साडेबारा हजार रुपयांचा प्रति शाखा भुर्दंड बसला. एसटीएम मशिनसाठी चार लाख रुपये देण्यात आले. मात्र, अद्यापही ती सुविधा सुरू झालेली नाही. याशिवाय बँकेच्या महाबळेश्‍वर शाखेसाठी जागेच्या खरेदीमध्येही गैरप्रकार करून 42 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत लेखापरीक्षण अहवालमध्ये आक्षेप घेण्यात आलेले आहेत, असेही फिर्यादित म्हटले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: