Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

अवघ्या दोन वर्षात सुवर्णपदक
vasudeo kulkarni
Friday, April 13, 2018 AT 11:18 AM (IST)
Tags: vi1
दोन वर्षांपूर्वी ज्या मुलीने पिस्तूल पाहिलेही नव्हते, त्याच मुलीने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दहा मीटर नेमबाजीच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून नवा विक्रम घडवला आहे. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी हे लखलखीत यश मिळवणार्‍या मनूचे लक्ष्य आता ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकायचे आहे.
हरियाणातल्या सज्जर गोरिया या गावातल्या शाळेत शिकणार्‍या मनूचे वडील राम किशन नौदलात अधिकारी होते. सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी या छोट्या गावात इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. याच शाळेत तिची आई सुविधा मुख्याध्यापिका आहे. हरियाणात अद्यापही जुन्या रूढी परंपरांचा पगडा समाजात असल्याने मनूच्या आईचा विवाह अल्पवयातच झाला. त्यांना शिकायची जिद्द होती. विवाहानंतर त्या बी. ए. आणि  बी.एड. आणि नंतर एम. एड. झाल्या. संस्कृत विषयाच्या पदवीधर असलेल्या सुविधांनी मनूच्या जन्मानंतरही शिक्षण सुरू ठेवले.  मनू बाळ असताना त्या वार्षिक परीक्षा देत होत्या. झाशीच्या राणीचे मूळचे माहेरचे नाव मनू असल्याने, सुविधाने आपल्या मुलीचे नावही मनूच ठेवले. गावातल्या शाळेत मनू शिकायला लागली. अभ्यासात हुशार असलेल्या मनूला  विविध खेळांची आवड बालपणापासूनच आहे आणि तिच्या शाळेत सर्व क्रीडा प्रकारांच्या प्रशिक्षणाची सोयही असल्याने मनूने पोहणे,  धावे, मार्शल आर्ट, ज्युडो,  बॉक्सिंग यासह विविध क्रीडा स्पर्धात भाग घेऊन शालेय जीवनात राज्यस्तरावरची पारितोषिकेही मिळवली आहेत. पोहण्यातही ती तरबेज आहे. मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेत असताना तिचा पाय दुखावला. ती जखमी झाली. त्यामुळे तायक्वांदोचे प्रशिक्षण  तिला सोडावे लागले. मॅट्रिक झाल्यावर डॉक्टर व्हायची मनूची इच्छा होती. पण, दोन वर्षांपूर्वी तिने नेमबाजीचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. या खेळाशी तिचा काही संबंध नव्हता आणि हा खेळ तिला आवडतही नव्हता. पण, तिने पिस्तूल नेमबाजीचे प्रशिक्षण शाळेतल्याच क्रीडा संकुलात सुरू केले आणि वर्षभरातच तिने त्यात प्रावीण्यही मिळवले. 2017 मध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धात मनूने दहा मीटर पिस्तूल नेमबाजीच्या स्पर्धेत ज्युनिअर गटात दहा पदके मिळवली, तेव्हा तिच्या नेमबाजीच्या आणि जिद्दीच्या खेळाची देशभरात प्रसिद्धी झाली. नेमबाजी बरोबरच मनू तिरंदाजीचे प्रशिक्षणही घेत आहे. बहुतांश शाळात क्रीडा प्रशिक्षणाची आणि विशेषत: नेमबाजीच्या प्रशिक्षणाची सुविधा नसते. पण, तिच्या वडिलांनीच सुरू केलेल्या या शाळेत मात्र सर्व क्रीडा प्रकारांच्या प्रशिक्षणाची सुविधा असल्यामुळे मनूला आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धात नवा विक्रम नोंदवता आला.                      
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: