Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
माण तालुक्यातील विवाहितेचा छळ; तिघांवर गुन्हा
ऐक्य समूह
Friday, April 13, 2018 AT 11:03 AM (IST)
Tags: re1
मांत्रिकासोबत विवस्त्र आंघोळ करण्याची मागणी
5म्हसवड, दि. 12 : कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आण, नाही तर घटस्फोट दे, अशी मागणी करत सासरच्या लोकांनी शिवीगाळ, मारहाण दमदाटी केली. माहेरहून पैसे आणण्याच्या कारणावरुन आणि मांत्रिकासोबत आंघोळ करत नाही म्हणून नवरा, दीर व सासू यांनी सतत मारहाण केल्याची फिर्याद माण तालुक्यातील 32 वर्षीय विवाहितेने म्हसवड पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, माण तालुक्यातील या पीडित विवाहितेचा विवाह 24 मे 2006 रोजी म्हसवडच्या सिद्धनाथ मंदिरात त्याच तालुक्यातील युवकाबरोबर झाला होता. विवाहानंतर सासरच्या लोकांनी सुरुवातीचे पाच महिने तिला चांगल्या पद्धतीने नांदवले. मात्र, पतीवर झालेल्या कर्जाचा बोजा वाढत गेल्याने पतीने सातत्याने मारहाण व शिवीगाळ केली. त्याला सासू प्रोत्साहन देत होती. त्यानंतर एक देवऋषी पीडित विवाहितेच्या घरी आला होता. तुम्ही गावाकडे गेल्याने पुन्हा आडचणी वाढल्या आहेत.  
आपल्याला आता वेगळ्या पध्दतीचा विधी करावा लागेल, असे त्याने घरातील लोकांना सांगितले. त्यासाठी पीडितेला त्याच्या रुमवर जाऊन विवस्त्र आंघोळ करावी लागेल, असेही त्याने सांगितले. ही गोष्ट करण्यास विवाहितेने नकार दिला. मात्र, देवऋषाबरोबर विवस्त्र आंघोळ केल्याने तुला काय फरक पडतो? आंघोळ केल्याने तुझ्या मागच्या अडचणी संपतील आणि आपले कर्ज भरण्यासाठी पैसेही मिळतील, असा तगादा पती व सासू यांनी लावला होता. मात्र, पीडित विवाहितेने या गोष्टींसाठी तयारी न दाखवल्याने पती व सासू तिच्याशी सतत वाद व भांडणे करत होते. या वादातून सासरच्यांनी 20 मार्च 2018 रोजी विवाहितेला आणि तिच्या दोन्ही मुलांना घरातून हाकलून दिल्याने ती माहेरी गेली. तिने आईला सगळा प्रकार सांगितल्यानंतर म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. सासरच्या मंडळींनी 2006 पासून 2018 पर्यंत सातत्याने मारहाण, दमदाटी आणि शिवीगाळ करुन मानसिक छळ केल्याचे या फिर्यादित म्हटले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: