Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘जलयुक्त शिवार’मधील प्रत्येक गावाचे ऑडिट करा : पालकमंत्र्यांची सूचना
ऐक्य समूह
Saturday, April 14, 2018 AT 11:11 AM (IST)
Tags: lo5
खरीप हंगामासाठी खते आणि बियाण्यांचा पुरेसा साठा
5सातारा, दि. 13 : सातारा जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलसंधारणाची चांगली कामे झाली, मात्र त्या कामांमुळे त्या गावातील कृषिक्षेत्रात काय परिवर्तन झाले, पीक पद्धती बदलली का, उत्पादनात वाढ झाली का, पाण्याची पातळी किती वाढली या सर्व बाबींचा गाव पातळीवर अभ्यास करून हे ऑडिट पुढच्या बैठकीत सादर करा, असे आदेश पालकमंत्री विजय शिवतारे यांनी शुक्रवारी दिले. या खरीप हंगामात जिल्ह्याला खते आणि बियाण्यांची पुरेशी उपलब्धता असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आयोजित केलेल्या खरीप हंगाम पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा परिषद कृषी सभापती मनोज पवार, कोल्हापूर विभागाचे विभागीय सह संचालक महावीर जुंगटे, जिल्हा अधीक्षक कृषी सुनील बोरकर, जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे सभापती, सर्व तालुक्यांचे कृषी अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात यावर्षी रब्बीतील 54,850 मेट्रिक टन एवढा साठा शिल्लक असून आता यावर्षीच्या खरिपासाठी एकूण 1 लाख 19 हजार मेट्रिक टन एवढ्या खताला मान्यता प्राप्त झाली आहे तर बी बियाणे 47 हजार 225 मेट्रिक टन मागणी निश्‍चित केली असून हे जिल्ह्यासाठी पुरेसे असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. मात्र मागच्या हंगामात खताचा साठा का शिल्लक राहिला याचाही कृषी विभागाकडून अभ्यास व्हावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. आता शेती करताना माती परीक्षण हे अतिशय आवश्यक झाले असून शेतीचे आरोग्य कळाल्याशिवाय शेतीचे नियोजन होणे नाही याची जाणीव आता शेतकर्‍यांना होत आहे. यावर्षी जिल्ह्यातील तीन लाख 29 हजार शेतकर्‍यांच्या शेतीच्या आरोग्यपत्रिका करून देण्यात आल्याचे सांगून सूक्ष्म सिंचनाचे 4325 लोकांना 11 कोटीपेक्षा अधिकचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. दिवसेंदिवस सूक्ष्मसिंचनाचे महत्त्व वाढत चालले आहे, हे अधिक चांगले असल्याच्याही भावना पालकमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखविल्या. सातारा जिल्ह्यात 1472 हेक्टर एवढे क्षेत्र हळदीच्या लागवडीखाली आले आहे. या उत्पादक शेतकर्‍यांचे गट तयार करून यावर प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी काम व्हावे यासाठी 4 कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करून देण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
आ. शशिकांत शिंदे,  आ. बाळासाहेब पाटील, कृषी सभापती मनोज पवार यांनी कृषी विकासासाठी येणार्‍या अडचणी मांडल्या. जिल्हा कृषी अधीक्षक  सुनील बोरकर यांनीही खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा आपल्या प्रास्ताविकात सांगितला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: