Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कठुआ बलात्काराची सुप्रीम कोर्टाकडून दखल
ऐक्य समूह
Saturday, April 14, 2018 AT 10:57 AM (IST)
Tags: mn1
उन्नाव प्रकरणी आमदाराला अटक; मोदींनी मौन सोडले
5नवी दिल्ली, दि. 13 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथील 8 वर्षांच्या कोवळ्या मुलीवरील सामूहिक बलात्कार व निर्घृण खून आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील बलात्कार या प्रकरणांमुळे संपूर्ण देशातून संताप व्यक्त होत आहे. आता कठुआ बलात्कार व खून प्रकरणाची  सर्वोच्च न्यायालयानेही दखल घेतली आहे. उन्नाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप असलेला भाजप आमदार कुलदीपसिंग सेंगरला अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर अखेर सीबीआयने अटक केली आहे. दरम्यान, या बलात्कार प्रकरणांविषयी पंतप्रधानांच्या मौनाबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले असतानाच मोदींनी शुक्रवारी या घटनांचा तीव्र निषेध केला. देशाच्या कन्यांना न्याय मिळेल, कोणत्याही दोषींना सोडले जाणार नाही, अशी ग्वाही मोदींनी दिली.
कठुआ बलात्कार व खून प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत हे प्रकरण तपासण्याचा निर्णय घेतला आहे. या भयावह घटनेची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घ्यावी, अशी आग्रही मागणी दिल्लीतील असंख्य वकिलांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. धनंजय चंद्रचूड व न्या. ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठासमोर केली. त्यानंतर न्यायालयाने स्वत:हून या प्रकरणाची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर जम्मू येथे उच्च न्यायालयात आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्या-पासून पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न झाल्याच्या प्रकाराचीही सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे.  
जम्मू हायकोर्ट बार असोसिएशन आणि कठुआ जिल्हा बार असोसिएशनने बलात्कार प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यास विरोध केला आणि पीडितेच्या कुटुंबीयांचे प्रतिनिधित्व करणार्‍या वकिलाच्या मार्गात अडथळे आणल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीरच्या बार कौन्सिलला नोटीस बजावून 19 एप्रिलपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. काश्मीरमध्ये सोमवारी एका समाजाच्या वकिलांनी या बलात्कार प्रकरणातील सात आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यापासून जम्मू-काश्मीर पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, कठुआ येथील बलात्कार प्रकरणात जम्मू-काश्मीर पोलिसांनी केलेल्या तपासाच्या आणि सात जणांच्या अटकेच्या निषेधार्थ हिंदू एकता मंचाने केलेल्या निदर्शनांमध्ये भाग घेतलेले जम्मू-काश्मीर मंत्रिमंडळातील भाजपचे मंत्री चौधरी लाल सिंग आणि चंदर प्रकाश गंगा यांनी आपल्या मंत्रिपदांचे राजीनामे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडे सोपवले आहेत. या मंत्र्यांवर राजीनाम्यासाठी दबाव होता. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी पीडीपी-भाजप युती फुटण्याची शक्यता निर्माण झाली होती.
अखेर भाजप आमदाराला अटक
दरम्यान, उन्नाव जिल्ह्यातील 17 वषींय अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणी भाजपचा आमदार कुलदीपसिंग सेंगर याला सीबीआयने शुक्रवारी रात्री अटक केली. कठुआ व उन्नाव बलात्कार प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी मध्यरात्री 12 वाजता दिल्लीतील इंडिया गेट येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी कॅँडल मार्च काढला होता. त्यावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका केली होती. त्यानंतर पहाटे 4.30 च्या सुमारास सीबीआयने सेंगरला ताब्यात घेतले. त्याची दिवसभर चौकशी सुरू होती. मात्र, सेंगरला फक्त ताब्यात घेऊ नका तर अटक करा, असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मोदींचे मौन अस्वीकारार्ह
कठुआ व उन्नाव येथील बलात्कार प्रकरणावरून काँग्रेसने भाजपला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पंतप्रधान मोदी, तुमचे मौन अस्वीकारार्ह आहे, असे सांगत राहुल गांधींनी त्यांच्यावर ट्विटरद्वारे टीका केली. त्यानंतर आज शुक्रवारी त्यांनी थेट मोदींना प्रश्‍न विचारले आहेत.  महिला आणि लहान मुलांविरोधात हिंसाचार वाढत आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? बलात्कारी आणि खुनाच्या आरोपींचा राज्य सरकारे का बचाव करत आहेत, या प्रश्‍नांची उत्तरे हवी आहेत. मोदी तुम्ही कधी बोलणार, देश वाट पाहत आहे, असे ट्विट राहुल यांनी केले.
कठुआ व उन्नाव बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ गुरुवारी मध्यरात्री 12 वाजता राहुल गांधी, प्रियांका गांधी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी इंडिया गेटवर कँडल मार्च काढला होता. त्यावेळीही राहुल गांधींनी मोदी आणि भाजपवर टीका केली होती. हा राजकीय मुद्दा नसून राष्ट्रीय मुद्दा आहे. भारतातील महिलांना आज भीती वाटत आहे. निवडणुकीत मोदी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अशा आकर्षक घोषणा देत होते. मात्र, ज्यावेळी त्यांच्यावर बलात्कार आणि खून होतो, त्यावेळी मोदी नेहमीप्रमाणे सोयीस्कररीत्या मौनात जातात. तुम्हाला बोलते करण्यासाठी आणखी किती अत्याचार हवे आहेत, असा प्रश्‍न राहुल यांनी केला होता. मात्र, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. याच राहुल गांधींनी कधी काळी उत्तर प्रदेशातील बलात्कारी मंत्री गायत्रीप्रसाद प्रजापतीचे समर्थन केले होते, याची आठवण इराणींनी करुन दिली.
अखेर मोदींनी मौन सोडले
अखेर या बलात्कार प्रकरणांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले मौन शुक्रवारी सोडले. नवी दिल्लीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मोदींनी या घटनांचा निषेध केला. गेल्या दोन दिवसांपासून ज्या घटनांची चर्चा सुरू आहे, त्या सुसंस्कृत समाजाच्या भाग नाहीत. देश आणि समाज म्हणून या घटनांबद्दल आम्हाला शरम वाटत आहे. मी देशाला हमी देतो की, या प्रकरणी देशाच्या कन्यांना निश्‍चितच न्याय मिळेल. दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे ते म्हणाले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: