Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाचगणी परिसरात बिबट्याचे दर्शन
ऐक्य समूह
Saturday, April 14, 2018 AT 11:07 AM (IST)
Tags: re4
5पाचगणी, दि. 13 ः येथील तायघाट व जयभवानी सोसायटी परिसरात बिबट्याच्या दर्शनाने परिसरात खळबळ उडाली आहे. सुदैवाने बिबट्याने कोणावरही हल्ला केला नाही. या परिसरात बिबट्या कोठून आला याचीच चर्चा पाचगणी परिसरात सुरू होती. बिबट्या एकच आहे की आणखी आहेत याची उत्सुकता परिसरात निर्माण झाली आहे.
पाचगणीपासून सुमारे 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असणार्‍या तायघाट गावाच्या परिसरात रात्री साडेदहाच्या सुमारास घराच्या बाहेर आलेल्या गवताच्या गंजीच्या शेजारी बिबट्या उभा असल्याचे संजय बेलोशे यांच्या मुलाने पाहिला. घाबरलेल्या अवस्थेत परंतु प्रसंगावधान राखून मुलाने वडिलांना बिबट्याबाबत सांगितले.   
त्यानंतर संजय बेलोशे यांनी तायघाट व पाचगणी येथील ग्रामस्थांना माहिती दिली. बिबट्या आल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्याची माहिती मिळताच महाबळेश्‍वर वनविभागाचे वनक्षेत्रपाल रणजित गायकवाड, वनपाल सुनील लांडगे, वनरक्षक सहदेव भिसे-मेटगुताड, संजय येवले-गुरेघर, पोलीस हवालदार भरत जाधव, जितेंद्र कांबळे, शिवाजी पामरे, एस. ओ. एस. ग्रुपचे अजय बोरा, निहाल बागवान, सूर्यकांत कासुर्डे, मन्सूर काझी, राजू बोरा, विशाल गायकवाड यांनी संजय बेलोशे यांची भेट घेऊन बिबट्या दिसलेल्या ठिकाणाची पाहणी करून खातरजमा केली. ग्रामस्थांसमवेत संपूर्ण परिसर पिंजून काढला. बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी फटाक्यांचाही वापर करण्यात आला. वन विभागानेही बिबट्या दिसून आल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. पाचगणी परिसरात बिबट्याचे दर्शन झाले असले तरी बिबट्याने कोणत्याही प्राण्यावर हल्ला केला नाही. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: