Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पंचायत राज समितीच्या तपासणीत 111 प्रकरणात अपहार आढळला
ऐक्य समूह
Saturday, April 14, 2018 AT 11:05 AM (IST)
Tags: lo3
आरोग्य आणि शिक्षण विभागाचे काम चांगले असल्याचा शेरा : पायलेट प्रोजेक्टचेही कौतुक
5सातारा, दि. 13 : जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षण विभागाचे काम चांगले आहे. पायलेट प्रोजेक्ट राबवले जातात. आमच्या तपासणीमध्ये 111 प्रकरणात अपहार आढळून आले आहेत. त्या अपहाराची रक्कम तीन महिन्यात वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेत घेतलेल्या साक्षीचा अहवाल विधानसभेपुढे मांडण्यात येणार आहे, अशी माहिती पंचायत राज समितीचे प्रमुख सुधीर पारवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  
पारवे पुढे म्हणाले, पंचायत राज समितीच्या  22 सदस्यांनी सातारा जिल्ह्यात भेटी दिल्या. सातारा जिल्हा हा यशवंतरावांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात कल्याणकारी योजना राबवल्या जातात. माण-खटावसारखे दुष्काळी तालुके या जिल्ह्यात आहेत. महाबळेश्‍वर, जावली, पाटण यासारखे डोंगराळ तालुके आहेत. जिल्ह्याचे  काम चांगले झाले आहे. जिल्हा परिषदेची साक्ष घेतली आहे. विविध विषय मांडले आहेत.  त्यावर समाधानकारक उत्तरे मिळाली आहेत. शासनाच्या कल्याणकारी योजना राबवल्या जात असून त्या राबवत असताना अनेक ठिकाणी अपहाराच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत. 2012-13 पासून 111 प्रकरणे आहेत. या प्रकरणात केवळ ग्रामसेवकच जबाबदार नाहीत तर वरिष्ठ अधिकारीही आहेत. त्यांचीही सखोल चौकशी होणार आहे. दोषी आढळल्यावर त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना  अफरातफरीची वसुली तीन महिन्यात करण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास सुरू आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी काम सुरू असताना गावांचा एकोपा आम्हाला आढळून आला. लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ यांचा सहभाग आढळून आला.
पंचायत राज समितीचा दौरा निश्‍चित झाल्यापासून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सूक्ष्म नियोजन केले.     
त्यांनी बैठका बोलवून तयारी करून घेतली. स्वतः अभ्यास करून प्रत्येक प्रश्‍नाला उत्तरे देत जिल्हा परिषदेची पडती बाजू त्यांनी अनेक ठिकाणी सावरून घेतली. साक्ष देतानाही प्रत्येक विभागाला त्यांनी खंबीरपणे पाठबळ दिले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी उपक्रमशील आहेत. शाळेच्या भेटीदरम्यान डिजिटल शाळा करण्यात येणार असल्याची माहिती समजली. जिल्हा नियोजनमधून 5 कोटी तर लोकसहभागातून 5 कोटी निधी उभा करून सर्व शाळा डिजिटल करण्याचा मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचा मानस आहे. मंदिरासाठी लोकवर्गणी गोळा केली जाते. त्याच धर्तीवर ज्ञानमंदिरासाठीही लोकवर्गणी गोळा केल्यास महत्त्वाचे ठरेल.  आरोग्य विभागाबाबत काही ठिकाणी अनियमितता आढळून आली आहे. त्याची चौकशी लवकरच होईल. कामचुकार अधिकारी आणि कर्मचारी यांची साक्ष लावून पडताळणी केली. आरोग्य विभाग चांगले काम करतो आहे. अनेक पायलट प्रोजेक्टसाठी जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. जलयुक्त शिवारची कामे चांगली झाली आहेत. त्यामुळे जिल्हा टँकर मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. ज्या त्रुटी आढळून आल्या आहेत त्या त्रुटीवर अहवाल मागवून सभागृहात मांडण्यात येणार आहे. कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही. 
 पंचायत राज समितीत सुधीर पारवे, बाबूराव पाचर्णे, चरण वाघमारे, रणधीर सावरकर, आर. टी.देशमुख, डॉ. देवराव होळी, सुरेश खाडे, सुधाकर कोहळे, भरतशेठ गोगावले, किशोर पाटील, राजेश क्षीरसागर, तुकाराम काते, राहुल बोंद्रे, भारत भालके, प्रा. विरेंद्र जगताप, दिलीप सोपल, राहुल मोटे, दीपक चव्हाण, विक्रम काळे, अमरनाथ राजूरकर, श्रीकांत देशपांडे, दत्तात्रय सावंत यांचा सहभाग होता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: