Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
लष्करामध्ये भरती करण्याचे आमिष दाखवून बोरजाईवाडीतील पिता-पुत्रांची फसवणूक
ऐक्य समूह
Saturday, April 14, 2018 AT 11:00 AM (IST)
Tags: re1
5कोरेगाव, दि. 13 : भारतीय लष्करामध्ये भरती करण्याचे आमिष दाखवून बोरजाईवाडीतील पिता-पुत्रांची चार लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी राजकुमार बजरंग काटकर, रा. कुकुडवाड व नीता डोंबे, रा. शिरसवडी, ता. खटाव यांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राजेंद्र हरिश्‍चंद्र कदम यांनी तक्रार दाखल केली आहे. काटकर हा दहिवडीत महारुद्र करिअर अ‍ॅकॅडमी चालवत असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे.
बोरजाईवाडी येथील किशोर रामचंद्र कदम यांची राजकुमार काटकर याच्याशी ओळख झाली. त्यातून त्याने स्वत: दहिवडीत महारुद्र करिअर अ‍ॅकॅडमी चालवत असून भारतीय लष्करामध्ये भरती करण्याचे काम  करत असल्याचे सांगितले. त्याच्यावर विश्‍वास ठेवून कदम यांनी स्वत:चे चुलत बंधू राजेंद्र हरिश्‍चंद्र कदम यांना काटकर याची ओळख सांगितली. घरात चर्चा झाल्यानंतर मुलगा निरंजन याला भारतीय लष्करात भरती करण्यासाठी काटकर याच्यामार्फत प्रयत्न करायचे ठरले.
दि. 3 नोव्हेंबर 2016 रोजी राजकुमार काटकर हा नीता डोंबे हिला बरोबर घेऊन बोरजाईवाडीत आला. चार लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगत अ‍ॅडव्हान्स म्हणून दोन लाख रुपये आणि कॉल लेटर आल्यानंतर दोन लाख रुपये मागितले. राजेंद्र कदम यांनी काटकर याच्याकडे दोन लाख रुपये दिले.  त्यानंतर काटकर याने वारंवार पैशांसाठी तगादा लावला, मात्र कॉल लेटर आल्याशिवाय पैसे देणार नसल्याचे कदम यांनी सांगताच दि. 14 सप्टेंबर 2017 रोजी काटकर व डोंबे हे राजेंद्र कदम व निरंजन कदम यांना तेलंगणा राज्यातील सिकंदराबाद येथील एम. सी. ई. एम. इ. येथील ट्रेनिंग सेंटरमध्ये घेऊन गेले. तेथे अण्णा नावाच्या व्यक्तीशी ओळख करून दिली. त्याने 15 दिवसात कॉल लेटर येईल, असे सांगितले. त्यानंतर दि. 15 ऑक्टोबर 2017 च्या दरम्यान काटकर याने बोरजाईवाडीत येऊन निरंजन याला ट्रेनिंगला पाठवायचे आहे, असे सांगत राजेंद्र कदम यांच्याकडून दोन लाख रुपये घेतले.  त्यानंतर काटकर हा परत आलाच नाही. त्याने दिलेल्या मोबाईल नंबरवर वेळोवेळी संपर्क साधून विचारणा केल्यावर तुमचे काम लवकरच होणार आहे, असे तो सांगत होता. त्यानंतर त्याने मोबाईल उचललाच नाही. वडूज पोलीस ठाण्यात राजकुमार काटकर व नीता डोंबे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समजल्यानंतर राजेंद्र कदम यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार शंकरराव गायकवाड तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: