Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  स्तंभ लेख  >>  बातम्या

पुन्हा अवकाळी-भरपाईचे दुष्टचक्र
ऐक्य समूह
Wednesday, April 18, 2018 AT 11:18 AM (IST)
Tags: st1
 राज्याच्या विविध भागात नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हातातोंडाशी आलेेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. गेल्या वर्षीही अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांना असाच आर्थिक फटका सहन करावा लागला होता. अलीकडे नैसर्गिक संकटांचे वाढते प्रमाण लक्षात घेता नुकसानभरपाई संदर्भात पीकविम्याचा पर्याय महत्त्वाचा ठरत आहे. याच्या जोडीला पशुधन विम्यावर भर देणेही गरजेचे आहे
संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाच्या हमीभावावरून सुरू असलेली आंदोलने, काही पिकांचे पडलेले दर या पार्श्‍वभूमीवर राज्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी  पुन्हा चिंताग्रस्त झाले आहेत. राज्यात विविध ठिकाणी झालेला अवकाळी पाऊस, गारपीट आणि वार्‍याचा तडाखा यामुळे काही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषत: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात ठिकठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. जोराचे वारे, गारांचा वर्षाव आणि ढगांच्या गडगडाटासह कोसळणार्‍या पावसाच्या जोरदार सरींमुळे शेतातील उभी पिके जमीनदोस्त झाली. पावसाच्या या तडाख्यात गहू, कांदा, मका, भाजीपाला तसेच पेरू, सीताफळ, आंबा, डाळिंब, केळी, द्राक्ष, कलिंगड, खरबूज, संत्रा, चिंच या फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक ठिकाणी गारांचा खच पडल्याचे पहायला मिळाले. पावसाच्या तडाख्यात वीज कोसळण्याच्या घटनाही घडल्या आणि त्यात काहीजणांना जीव गमवावा लागला. विशेषत: रब्बी हंगामातील काढणीला आलेला गहू, रब्बी ज्वारी तसेच आंब्याचे झालेले नुकसान हा उत्पादकांसाठी मोठा धक्का आहे.
फळबागांचे नुकसान
राजस्थानपासून आसामपर्यंत निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा, पश्‍चिम बंगालच्या परिसरात निर्माण झालेली वार्‍याची चक्राकार स्थिती यामुळे देशात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले. त्याच्या जोडीला अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरावरून होणारा बाष्पाचा पुरवठा यामुळे पावसाची तीव्रता वाढली. ठिकठिकाणी वादळी वारे, जोरदार पाऊस आणि गारांचा वर्षाव असे चित्र पहायला मिळाले. या अवकाळी पावसामुळे शेतात काढून ठेवलेले पीक वाचवण्यासाठी शेतकर्‍यांची चांगलीच तारांबळ उडाली. या नैसर्गिक संकटात फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. यंदा आंब्याचे उत्पादन साधारण राहील, असे अनुमान व्यक्त करण्यात आले होते. त्यामुळे आंब्याला चांगला भाव मिळेल, अशी आशा शेतकर्‍यांना होती. अक्षय्यतृतीया जवळ आल्याने आंब्याची मागणी वाढत होती. असे असताना आताच्या वादळी पावसाने आंब्याचे  मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे आंब्याच्या विक्रीतून मिळणार्‍या हमखास उत्पन्नावर शेतकर्‍यांना पाणी सोडावे लागणार आहे. यावेळी कलिंगड तसेच टरबुजाचे उत्पादन अधिक झाले असून बाजारात या दोन्हींची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. परिणामी, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कलिंगड आणि टरबुजाला ऐन हंगामात कमी भाव मिळत आहे. असे असले, तरी जे काही थोडंबहुत उत्पन्न मिळणार होते ती आशाही या अवकाळी पावसात झालेल्या कलिंगड आणि टरबुजाच्या नुकसानीमुळे फोल ठरणार आहे.  
अलीकडच्या काळात हवामान बदलामुळे नैसर्गिक संकटांमध्ये वाढ झाली आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी पाऊस, गारपीट, सोसाट्याचे वारे अशा संकटांमुळे पिकांचे सातत्याने नुकसान होत आहे. परिणामी, शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत. हे लक्षात घेऊन हवामानातील बदलाचा अधिकाधिक अचूक अंदाज काही दिवस अगोदर वर्तवणे आणि त्या संदर्भातील माहिती  शेतकर्‍यांपयर्ंंत पोहोचवणे यावर भर दिला जायला हवा. त्यामुळे शेतकर्‍यांना पिकाच्या संरक्षणासाठी उपाययोजना करता येतील आणि नैसर्गिक संकटातून पिकांची हानी कमी करता किंवा टाळता येईल. आताच्या अवकाळी पावसाबाबत हवामान खात्याने अंदाज वर्तवला होता, असे सांगितले जाते. परंतु तो किती तास आधी वर्तवण्यात आला, त्याची माहिती तातडीने सर्व शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यात आली का, हा विचार करण्याजोगा भाग आहे. सर्वसाधारणपणे अशा नैसर्गिक संकटाची सूचना मिळाल्यानंतर पिकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने काही उपाय करता येण्यासारखे आहेत. एक म्हणजे काढणीला आलेली पिके तातडीने काढून घेता येतात. कापसासारख्या नाजूक पिकाची योग्य प्रकारे साठवणूक करणे वा साठवणूक केलेला कापूस तातडीने विक्रीसाठी नेणे तसेच शिल्लक कापूस लवकरात लवकर काढून घेणे अशा उपाययोजना करता येतात.
पीक विम्यातील त्रुटी
शेतीला उत्तम जोड व्यवसाय म्हणून पशुपालनाकडे पाहिले जाते. त्या दृष्टीने अवकाळी पाऊस, गारपीट, विजा पडणे अशा संकटांपासून जनावरांचे संरक्षण करणेही तितकेच गरजेचे ठरते. कारण अशा संकटांमध्ये जनावरे दगावल्याची अनेक उदाहरणे आहेत. अगोदरच अलीकडच्या काळात जनावरांच्या किंमती वाढत आहेत. त्यांच्या पालनपोषणावरील खर्चही वाढत चालला आहे. त्यामुळे जनावरांची विशेष देखभाल घ्यावी लागते. त्या दृष्टीने जनावरांसाठी स्वतंत्र गोठ्याची बांधणी करणे महत्त्वाचे आहे. जनावरांसाठी चांगला, टिकाऊ गोठा असेल तर अवकाळी पाऊस वा अन्य नैसर्गिक संकटांपासून त्यांचे संरक्षण होऊ शकते. अवकाळी पाऊस वा गारपिटीमुळे कांदा तसेच द्राक्षांचे अधिक नुकसान होते. त्या दृष्टीने कांद्याच्या सुरक्षित साठवणुकीवर भर देणे तसेच द्राक्षाचे नुकसान टाळण्यासाठी वा कमी करण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने आधीच काही उपाय करता येण्यासारखे आहेत.
अशा नैसर्गिक संकटांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळण्याच्या दृष्टीने शेतकर्‍यांना पीक विमा योजनेचा आधार महत्त्वाचा ठरतो. परंतु आजवर या योजनेबाबत शेतकर्‍यांचा अनुभव फारसा चांगला नाही. शिवाय या योजनेबाबत शेतकर्‍यांच्या मनात काही प्रश्‍न कायम आहेत. त्यामुळे पीक विमा योजनेला शेतकर्‍यांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. खरे म्हणजे ही योजना प्रभावीपणे राबवली तसेच शेतकर्‍यांच्या मनातील गैरसमज दूर होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्यास नैसर्गिक संकटात शेतकर्‍यांसाठी महत्त्वाचा दिलासा ठरणार आहे. इथे आणखीही एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा. तो म्हणजे गारांचा तडाखा, वीज कोसळणे यामुळे जनावरे जायबंदी होणे, जनावरांचे प्राण जाणे अशा अनेक घटना समोर येतात. या शिवाय विषबाधा, आग तसंच रस्त्यांवरील अपघात यामुळे जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. आताच्या गारपिटीच्या तडाख्यातही वीज कोसळून काही जनावरांचा मृत्यू ओढवला. अशा परिस्थितीत अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या शेतकर्‍यांना नव्याने जनावरांची खरेदी करणे शक्य नसते. त्यामुळे शेतीची कामे खोळंबतातच शिवाय दुभतीजनावरे दगावली तर त्यांच्यापासून मिळणार्‍या उत्पन्नालाही मुकावे लागते. अशा परिस्थितीत पशुधन विम्याचा आधार महत्त्वाचा ठरतो.
 पशुधन विमा योजना हवी
खरे तर 2006-2007 पासून पशुधन विमा योजना राबवली जात आहे. 2016 मध्ये या योजना विस्तारही करण्यात आला. जनावरांच्या जीवितहानीमुळे होणार्‍या आर्थिक नुकसानीप्रसंगी तत्काळ भरपाई मिळवून देणं तसंच जनावरांच्या उत्पादनामध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा घडवून आणणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहेत. परंतु या योजनेबाबतही फार आशादायी चित्र समोर येत नाही. मुख्यत्वे पीक विमा योजनेप्रमाणे पशुधन विमा योजनेबाबतही शेतकर्‍यांचा अनुभव फारसा चांगला नाही. गेल्या आर्थिक वर्षात तर या योजनेचे काम जवळपास ठप्पच झाले आहे की काय, असा प्रश्‍न पडण्याजोगी परिस्थिती  आहे. थोडक्यात, या योेजनेची अंंमलबजावणी रखडली आहे. खरे तर पीक विमा योजनेप्रमाणे पशुधन विमा योजनेलाही गती देणे ही काळाची गरज आहे. कारण जागतिक तापमानवाढ, त्यातून हवामानात होत असलेले बदल आणि या बदलातून निर्माण होणारी नैसर्गिक संकटे हे चक्र यापुढे कायम राहणार आहे. एवढेच नाही, तर नैसर्गिक संकटांच्या घटनांमध्ये वाढ होण्याचे संकेत तज्ज्ञांकडून दिले जात आहे. त्यामुळे या संकटांपासून पिकांचे संरक्षण, नुकसानग्रस्त पिकांबाबत शेतकर्‍यांना दिलासा याबाबतचे प्रयत्न गरजेचे ठरणार आहेत. त्यात बदलत्या हवामानाला समर्थपणे तोंड देऊ शकतील अशा पिकांच्या प्रगत वाणांच्या निर्मितीवर भर देणे तसेच पीक विमा, पशुधन विमा या योजना व्यापक प्रमाणात राबवणे यांचा प्रामुख्याने समावेश असायला हवा. तरच नैसर्गिक संकटातील नुकसानीबाबत शेतकर्‍यांना दिलासा मिळू शकेल.
     - डॉ. मुकुंद गायकवाड
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: