Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

काश्मीरमध्ये पाणी टंचाईचे संकट
vasudeo kulkarni
Wednesday, April 18, 2018 AT 11:18 AM (IST)
Tags: vi1
 हिमालयाच्या कुशीत वसलेल्या आणि दरवर्षी बर्फवृष्टी-तुफानी पाऊस पडणार्‍या जम्मू-काश्मीर राज्याला यावर्षी पाणी टंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागते आहे. राज्यातल्या शेकडो खेड्यात या वर्षीच्या उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने सरकारने, पाणी टंचाईच्या भीतीने यावर्षी खरिपाच्या हंगामात शेतकर्‍यांनी भाताची लागवड करू नये, त्याऐवजी अन्य पिके घ्यावीत, असे आवाहन केले आहे. येत्या काही महिन्यात पाणी टंचाईची समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याचे जाणवल्यामुळे राज्य सरकारने सरकारी यंत्रणेमार्फत शेतकर्‍यांनी भात पिकाची लागवड करू नये, यासाठी जागरण मोहीमही सुरू केली आहे.
दरवर्षी या राज्यातल्या अडीच लाख हेक्टर क्षेत्रातल्या भाताच्या पिकाला जलसिंचन विभागातर्फे पाण्याचा पुरवठा केला जातो. पण पुरेसे पाणी उपलब्ध झाले नाही तर भाताच्या पिकाला पाणी देता येणे शक्य नसल्याने, नुकसान टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी भाताची लागवडच करू नये, असा सरकारचा सल्ला आहे. बारामुल्ला, कुपवाडा, बडगाम, पुलवामा, यासह सहा जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यातच भाताची पेरणी आणि लागवड केली जाते. या पिकांना पाणी देणे सरकारच्या जलसिंचन खात्याला शक्य झाले नाही, तर संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलने करतील आणि कायदा-सुव्यवस्थेची गंभीर स्थिती निर्माण होईल, अशी भीती सरकारला वाटते आहे. राज्याची वरदायिनी असलेल्या झेलम नदीच्या पाण्याची पातळी यावर्षीच्या उन्हाळ्यात अवघी 1 मीटर इतकी असल्याने आणि ती पुन्हा कमी होण्याची शक्यता असल्याने, पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याची समस्याही निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी राज्यात 500 मिलीमीटर पाऊस झाला होता. परंतु काश्मीर खोर्‍यात पाणी अडवण्याच्या योजना झालेल्या नसल्याने, नद्याच्या पाण्यावरच या राज्यातल्या जनता आणि शेतकर्‍यांना अवलंबून रहावे लागते. यापूर्वी 1957 आणि 2000 मध्ये काश्मीरला दुष्काळाचा सामना करावा लागला होता आणि शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले होते. ते होऊ नये, यासाठीच सरकारने ही खबरदारीची उपाययोजना अंमलात आणायचे ठरवले आहे. काश्मीर खोर्‍यात दीड लाख हेक्टर क्षेत्रात 88 लाख क्विंटल भाताचे उत्पादन होते. चारशे ते पाचशे कोटी रुपयांचे उत्पन्न या पिकाद्वारे मिळते. पण पाऊसच कमी पडल्यास हे सर्व पीक हातचे जाण्याची शक्यता असल्याने शेतकर्‍यांनी भाताच्या ऐवजी नाचणी, वरी आणि अन्य पिके घ्यावीत, असा शेती खात्याचा सल्ला आहे. या राज्यात पिकणार्‍या झेलम, शालिमार, मुश्कबुदजी कमाद आणि झाग या भाताच्या जातींना देशभरातून चांगली मागणी असते आणि या तांदळाला दरही चांगला मिळतो. हमखास बर्फवृष्टी आणि पाऊस पडणार्‍या काश्मीर खोर्‍यावर पाणी टंचाईचे हे संकट निर्माण झाले, ते ऋतुचक्रातला बदल आणि पर्यावरणाचा र्‍हास झाल्यामुळेच!
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: