Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

बालविवाहाची समस्या कायम
vasudeo kulkarni
Wednesday, April 18, 2018 AT 11:19 AM (IST)
Tags: lolak1
 भारतीय धार्मिक परंपरेनुसार वर्षातल्या साडे तीन मुहूर्तातला महत्त्वाचा असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अद्यापही राजस्थान, बिहार, गुजरात, ओरिसा या राज्यात हजारोंच्या संख्येने बालविवाह होतात. कायद्याने बालविवाहाला बंदी आणि असा झालेला विवाह बेकायदा असला, तरीही रूढी परंपरेच्या नावाखाली असे विवाह सर्रास होतात. राजस्थान, बिहारमधल्या ग्रामीण भागात तर सामूहिक बालविवाहांचे सोहळेच साजरे होतात. गेली दहा वर्षे असे बालविवाह आणि सोहळे रोखायसाठी सरकार, प्रशासनाने प्रबोधन-जनजागरणाच्या मोहिमा राबवून ही अनिष्ट प्रथा काही पूर्णपणे बंद झालेली नाही. कायद्यानुसार अठरा वर्षांच्या आतल्या मुला-मुलींचा विवाह करणे बेकायदा तर आहेच, पण असे विवाह करणार्‍या वधूवरांच्या आई-वडिलांनाही शिक्षेची तरतूद आहे. पण हा कायदा राहिला तो कायद्याच्या पुस्तकात! प्रशासन असे विवाह रोखू शकत नाही, अशी स्थिती आहे.
मोगल आणि मुस्लीम राजवटीच्या काळात हिंदू धर्मीय मुलींना पळवून न्यायच्या आणि त्यांच्याशी जबरदस्तीने ‘निकाह’ करायच्या घटना सातत्याने होत असल्याने, बालवयातच आपल्या मुलामुलींचे विवाह करायची रूढी सुरू झाली आणि वाढली. काही समाजात तर पाळण्यातच विवाह करायची रूढी होती. त्या काळातल्या सामाजिक स्थितीमुळे असे बालविवाह होत आणि त्यांना सामाजिक मान्यताही होती. ब्रिटिश राजवटीत राजा मोहन राय आणि समाज सुधारकांच्या प्रबोधनाने बालविवाहाच्या विरोधात प्रबोधन झाले. पण त्या काळात निरक्षरतेचे प्रमाण प्रचंड होते आणि सामाजिक-धार्मिक परंपरात हस्तक्षेप करून सामाजिक असंतोष निर्माण करायचे ब्रिटिश सरकार टाळत असे. परिणामी स्वातंत्र्यपूर्व काळातही बालविवाहाची पद्धत सुरूच राहिली.
स्वातंत्र्यानंतर सामाजिक हिताचा आणि मुलींच्या भवितव्याचा गंभीर विचार करून बालविवाह प्रतिबंधक कायदा केंद्र सरकारने अंमलात आणला. गेल्या दहा वर्षात बालविवाह होऊ नयेत, यासाठी असे विवाह प्रचलित असलेल्या राज्यातल्या प्रशासनानेही सामाजिक जनजागरण घडवले. परिणामी अशा विवाहांची संख्या कमी झाली असली, तरी ती पूर्णपणे थांबलेली नाही. जगात अद्यापही नायजेरिया, मध्य आफ्रिकेतले देश, बांगला देश आणि भारतात दरवर्षी कोट्यवधीच्या संख्येने बालविवाह होतात. नायजेरियात 76 टक्के अल्पवयीन मुलामुलींचे विवाह होतात तर भारतात हे प्रमाण 27 टक्क्यांचे आहे. भारतात होणार्‍या विवाहात 49 टक्के मुलींचे वय 18 पेक्षा कमी असते. बिहारमध्ये सर्वाधिक म्हणजे 66 टक्के तर साक्षरतेचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या केरळ राज्यात अशा विवाहांचे प्रमाण कमी आहे. कायद्यानुसार मुलाचे वय 21 आणि मुलीचे वय 18 असे ठरवले गेले, ते माता आणि शिशूंच्या आरोग्याचा विचार करून. अल्पवयीन मातांची मुले अशक्त आणि विविध विकारांनी ग्रासलेली असतात. आदिवासी भागात बालविवाह होतात आणि अशा अल्पवयीन आदिवासी मातांच्या शिशूंचे अपमृत्यू, कुपोषणानंतर मृत्यू होण्याचे प्रमाण खूपच आहे. आर्थिक स्थिती, रूढी परंपरा आणि मुलीच्या विवाहासाठी खर्च करायची ऐपत नसणे, अशा विविध कारणांमुळे या अनिष्ट प्रथेचे मूळ अद्यापही पूर्णपणे उपटले गेलेले नाही. अल्पवयीन-बालविवाहाच्या प्रथेत त्या मुलामुलींच्या भवितव्याचा विचार केला जात नाही. जबरदस्तीने त्यांचे आईवडीलच करतात. बालविवाह ही देशासमोरची मोठी सामाजिक समस्या असली, तरी ती अद्यापही सुटली नसल्याने, अनेक नव्या सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: