Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भारतीय खेळाडूंचे कौतुक, फिट इंडियाबाबतही सकारात्मक
ऐक्य समूह
Monday, April 30, 2018 AT 11:44 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 29 (वृत्तसंस्था) : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पटकावलेली 66 पदके आणि मिळवलेले तिसरे स्थान खर्‍या अर्थाने कौतुकास्पद आहे. भारतीय खेळाडूंची ही कामगिरी वाखाणण्यासारखी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगितले. मन की बात मध्ये मोदी यांनी कुस्ती, शूटिंग, बॅडमिंटन, टेबल-टेनिस या खेळांचा विशेष उल्लेख करत महिला खेळाडूंचे खास कौतुक केले.
43 व्या ‘मन की बात’ कार्यक्रमात देशवासीयांना संबोधित करताना ते बोलत होते. दूरदर्शन आणि रेडिओवरुन दर रविवारी प्रसारित होणारा हा कार्यक्रम पंतप्रधान कार्यालयाच्या यू-ट्यूब चॅनेलवरही प्रसारित होतो. याबरोबरच आपण आधीच्या ‘मन की बात’मध्ये फिट इंडिया कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले होते आणि त्याला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत याबाबत आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमातील योगदानाबद्दल त्यांनी अभिनेता अक्षय कुमारचे कौतुकही केले. तसेच 21 जून रोजी असणार्‍या योगा दिवसाची तयारी सर्वांनी सुरू केली असेल अशी आशा व्यक्त केली.
सध्या परीक्षा संपून उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. या काळात काही तरुण समर इंटर्नशिप करतात. अशाप्रकारे इंटर्नशिप करू इच्छिणार्‍या तरुणांना त्यांनी आमंत्रण दिले आणि सरकारने त्यांच्यासाठी विशेष इंटर्नशिप कार्यक्रमांची आखणी केल्याचे जाहीर केले. या इंटर्नशिपचे नाव स्वच्छ भारत असून यामध्ये सहभागी होणारे तरुण देशाच्या विकासामध्ये हातभार लावू शकतील. यामध्ये चांगले काम करणारे तरुण आणि संस्था यांना पुरस्कार तसेच प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येईल, असेही मोदी यांनी सांगितले. काही दिवसांवर येणार्‍या रमझानच्या निमित्ताने शुभेच्छा देत या पवित्र महिन्याविषयीची माहिती दिली. याचबरोबर बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देत भारतात बौद्ध पर्यटनाला चालना मिळायला हवी असे मत त्यांनी यावेळी नोंदवले. पाण्याचे संरक्षण करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे असे सांगत ही प्रत्येक व्यक्तीची सामाजिक जबाबदारी आहे असे ते म्हणाले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: