Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘ऑपरेशन ऑल आउट’!
ऐक्य समूह
Monday, May 07, 2018 AT 11:32 AM (IST)
Tags: na1
काश्मिरमध्ये 5 दहशतवाद्यांचा खात्मा; बुरहान वानी गँग संपुष्टात
5श्रीनगर, दि. 6 (वृत्तसंस्था) : काश्मीर खोर्‍यात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन ऑल आउट’मध्ये भारतीय जवानांना मोठे यश आले आहे. भारतीय जवानांनी शोपियांमध्ये झालेल्या चकमकीत पाच खतरनाक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या चकमकीत हिजबुलचा दहशतवादी सद्दाम पाडरही ठार झाल्याने दहशतवादी बुरहान वानीची गँग संपुष्टात आली आहे. मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये एका प्राध्यापकाचाही समावेश आहे.
आज सकाळपासूनच शोपियांमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये धुमश्‍चक्री सुरू होती. दोन्ही बाजूंनी प्रचंड गोळीबार सुरू असल्याने संपूर्ण काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण होते.   
सुरक्षा दलाने अत्यंत नेटाने किल्ला लढवत एक-एक करत दुपार होण्याच्या आत 5 दहशतावाद्यांना कंठस्नान घातले. या चकमकीत एका नागरिकाचा मृत्यू झाला असून दोन जवान जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका पोलिसाचा समावेश आहे. आज झालेल्या चकमकीत सद्दाम पाडरसह डॉक्टर मुहम्मद रफी भट्ट, बिलाल मौलवी आणि आदिल मलिकचा समावेश आहे. रफी भट्ट हा काश्मीर विद्यापीठाचा प्राध्यापक आहे. चकमक सुरू झाली तेव्हा भट्टने शरणागती पत्कारावी म्हणून त्याच्या कुटुंबीयांना घटनास्थळी बोलावण्यात आले होते. मात्र त्याने कुणाचेच ऐकले नाही. त्याच्यासह इतर दहशतवाद्यांनाही जवानांनी शरणागती पत्करण्यास सांगितले होते. मात्र त्यांनीही ऐकले नाही. त्यामुळे जवानांनी या पाचही जणांना टिपले. दरम्यान, आता चकमक थांबली असून पाचही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. लष्कर, सीआरपीएफ आणि राज्य पोलिसांनी चांगली कामगिरी केल्याचे जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी सांगितले. सद्दाम हा हिजबुलचा टॉपचा कमांडर होता. तो बुरहान वानीच्या ब्रिगेडमधील एकमेव जिवंत कमांडर होता. त्याला ठार केल्याने वानीची ब्रिगेडही संपुष्टात आली आहे. दरम्यान, ‘ऑपरेशन ऑल आउट’द्वारे लष्कराने यावर्षी एकूण 59 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: