Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महाभियोगासंदर्भातील आव्हान याचिका काँग्रेसकडून मागे
ऐक्य समूह
Wednesday, May 09, 2018 AT 11:40 AM (IST)
Tags: na1
5 नवी दिल्ली, दि. 8 (वृत्तसंस्था) : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळल्याविरोधात काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली आव्हान याचिका आज अचानक मागे घेतली. या याचिकेची सुनावणी पाच न्यायाधीशांचे घटनापीठ करणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, याबाबतच्या प्रशासकीय आदेशाची प्रत वकील कपिल सिब्बल यांनी मागितली होती. त्यास घटनापीठाने नकार दिल्याने सिब्बल यांनी ही याचिका मागे घेत असल्याचे सांगितले.
काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रतापसिंह बाज्वा आणि अमी याज्ञिक यांनी ही याचिका दाखल केली होती. न्या. चेलमेेश्‍वर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होणार असल्याचे सोमवारपर्यंत सांगण्यात येत होते. मात्र, हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवण्यात आले. त्यानंतर आज याबाबत सुनावणी सुरु होताच काँग्रेसच्या खासदारांचे वकील कपिल सिब्बल यांनी घटनापीठाऐवजी इतर न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडे यावर सुनावणी व्हावी, अशी मागणी केली. त्याला घटनापीठाने नकार दिला. 
याचिकाकर्त्यांनी केवळ याचिकेतील मुद्द्यांबाबत बोलावे, असे न्यायालयाने सांगितले. ही याचिका घटनापीठाकडे वर्ग करण्याच्या प्रशासकीय आदेशाची प्रत मिळावी, ही आपली मागणी फेटाळली गेल्याने सिब्बल यांनी ही याचिका मागे घेत असल्याचे सांगितले. न्यायालयाच्या नकारामुळे या याचिकेवर आपल्या बाजूने निकाल येण्याची शक्यता धूसर असल्याचे पाहता, हा मुद्दा पुढे आणखी ताणण्यात येऊ नये म्हणून काँग्रेसने याचिका मागे घेतली असावी, असे सांगण्यात येत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: