Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
माझ्यासमोर उडवलेल्या कॉलर निवडणुका लागल्यावर सरळ होतात
ऐक्य समूह
Thursday, May 10, 2018 AT 11:09 AM (IST)
Tags: mn1
देशातील वातावरण बदलाला अनुकूल, कॉँग्रेसने उतावळेपणा टाळावा
5सातारा, दि. 9 : देशातील निवडणुकीचा ट्रेंड पाहिला तर तो आता बदलाला अनुकूल आहे. पण म्हणून लगेचच कोणाला किती जागा मिळतील या निष्कर्षाप्रत येणे म्हणजे ‘बाजारात तुरी आणि कोण कुणाला मारी’ अशा म्हणीसारखे होईल. देशातील काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. सर्व राज्यात तो विस्तारला असला तरी अनेक राज्यात प्रादेशिक पक्ष मोठे आहेत. माझ्या अनुभवाप्रमाणे देशातील वातावरण बदलाला अनुकूल आहे. मात्र काँग्रेसने उतावळेपणा टाळावा, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी मी पंतप्रधान व्हायला तयार आहे या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. दरम्यान,  मी असल्यावर सातार्‍यात सर्व ठीक होते. माझ्यासमोर उडवलेल्या कॉलर निवडणुका लागल्यावर सरळ होतात. 2019 मध्ये सर्व जण सरळ रेषेत येतील, अशा शब्दात खा. पवारसाहेबांनी मीच पॉवरफुल्ल असल्याचा संदेश दिला. यावेळी पत्रकारांसमोर पवारसाहेबांनी स्वत: कॉलर उडवून पुन्हा ती सरळही करून दाखवली.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यास आपण पंतप्रधान व्हायला तयार असल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी कर्नाटकात पत्रकारांशी बोलताना केले होते. त्याविषयी  खा. शरद पवार यांना सविस्तर प्रतिक्रिया दिली. देशात काँग्रेस पक्षाबरोबर अन्य कोणकोणते प्रादेशिक पक्ष इतर राज्यात महत्त्वाचे आहेत हे त्यांनी नावानिशी सांगितले. सर्व विरोधक एकत्र आले तर देशात बदल होईल. देशात सध्या बदलाला वातावरण अनुकूल आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मुद्दा असो, की धनगर आरक्षणाचा मुद्दा असो सरकारने लोकांची घोर फसवणूक केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती येथे आमचे सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाला आरक्षण दिले जाईल, अशी घोषणा केली. चार वर्षे झाली तरी त्यांनी काहीही केले नाही. केंद्र सरकारलाही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची इच्छा दिसत नाही.
राहुल गांधी यांनी अलीकडे भेट घेतली, त्यावेळी काय चर्चा झाली याविषयी विचारले असता ते म्हणाले, महाराष्ट्रात एकत्र काम करण्यासंदर्भात चर्चा झाली.    
सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे, समंजसपणा दाखवला पाहिजे, सर्व प्रश्‍नांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे या अनुषंगाने विचारविनिमय झाला. आमचे काही लोक वेगळे बोलत असतात. मात्र तुम्ही त्याकडे लक्ष देवू नका, असेही राहुल गांधी यांनी आवर्जून सांगितल्याचे ते म्हणाले. काँग्रेसमधील काही लोक कराड, सातार्‍यापुरते बोलत असतात. त्यांचे अधून-मधून मी ऐकत असतो. मात्र त्यांच्या बोलण्याला फार काही अर्थ नाही, अशा शब्दात खा. पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता त्यांना फटकारले. पृथ्वीराज चव्हाण यांच्याविषयी त्यांच्याच पक्षाचे आमदार खासगीत काय बोलतात हेही त्यांनी समजून घ्यावे, असेही खा. पवार म्हणाले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर येईल असे आता तरी दिसते, असे भाकित त्यांनी केले. पंतप्रधान ही एक ’इन्स्टिट्यूशन’ आहे. त्या पदाची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे. पण कुत्रा,  खेचर  अशी भाषा वापरली जात आहे. पदाच्या प्रतिष्ठेचे महत्त्व यांना दिसत नाही, असे सांगून खा. पवार पुढे म्हणाले, जगात जिथे जिथे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर होत होता, त्या त्या ठिकाणी त्यांनी इव्हीएम वापरणे बंद केले आहे. मशीनमुळे गडबड होते अशा लोकांच्या मनात शंका आहेत. लोकशाहीत त्या दूर करणे गरजेचे आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर यासंदर्भात भाजप सोडून अन्य पक्ष एकत्र येऊन निवडणूक आयोगाशी बोलू, असे त्यांनी सांगितले.
धनंजय मुंडेंची पाठराखण
विधानपरिषदेची लातूर- उस्मानाबाद बीड जागा लढवण्याचा निर्णय सामुदायिक होता. धनंजय मुंडे यांचा त्यात दोष नाही. आमची जागा परभणीची होती. पण तिथे केवळ एक जिल्हा होता. लातूर- उस्मानाबाद- बीड मतदारसंघाच्या निमित्ताने तीन जिल्ह्यात पक्षवाढीला चांगली संधी असल्याने ही जागा घेण्याचा निर्णय घेतला होता, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. सातारा जिल्ह्यात खासदार व आमदार यांच्यात पेच आहे. त्यावर काय उतारा काढणार का या प्रश्‍नावर पेचबिच काही नाही. मी असल्यावर सर्व ठीक होते. माझ्यासमोर उडवलेल्या कॉलर निवडणुका लागल्यावर सरळ होतात, असे त्यांनी सांगितले. 


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: