Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पंकज भुजबळांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
ऐक्य समूह
Thursday, May 10, 2018 AT 11:14 AM (IST)
Tags: mn2
चर्चेला उधाण; सदिच्छा भेट असल्याचा शिवसेनेचा दावा
5मुंबई, दि. 9 (प्रतिनिधी) : तब्बल दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे चिरंजीव आ. पंकज भुजबळ यांनी आज अचानक ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे स्वाभाविकच राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. मात्र, ही केवळ सदिच्छा भेट होती, असे शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी  स्पष्ट केले.
महाराष्ट्र सदन घोटाळा व बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने छगन भुजबळ यांना दोन वर्षांपूर्वी अटक केली होती. तेव्हापासून ते जेलमध्येच होते. अथक प्रयत्न व प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर प्रकृती व वय लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली आहे. जामीन मिळण्यापूर्वीपासून केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलेले भुजबळ जामीन मिळूनही अद्याप घरी परतलेले नाहीत. तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते राजकारणात केव्हा सक्रिय होणार याबद्दल कुतूहल असताना त्यांचे पुत्र  आ. पंकज भुजबळ यांनी आज अचानक मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. भुजबळ यांच्या सुटकेनंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून त्यांची पाठराखण केली गेली होती. या पार्श्‍वभूमीमुळे आजच्या भेटीला अधिकच महत्त्व आले होते; परंतु शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही केवळ सदिच्छा भेट होती, असे स्पष्ट केले. उद्धव ठाकरे आणि पंकज भुजबळ यांची सुमारे 15 मिनिटे भेट झाली. यावेळी मिलिंद नार्वेकर हेसुद्धा उपस्थित होते. छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्याने पंकज भुजबळ यांनी उद्धव ठाकरेंना पेढे देऊन अडचणीच्या काळात पाठीशी उभे राहिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तर उद्धव ठाकरे यांनी छगन भुजबळ यांच्या तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला पंकज भुजबळ यांना दिला. या भेटीबद्दल बोलताना संजय राऊत यांनी शिवसेनेने व ‘सामना’ने भुजबळांची नव्हे तर सत्याची बाजू घेतल्याचे सांगितले. अंमलबजावणी महासंचालनालयाने अटक केलेल्या कार्ती चिदम्बरम यांना आठवडाभरात जामीन मिळतो आणि भुजबळांना दोन वर्षे तुरुंगात का राहावे लागते, असा प्रश्‍न त्यांनी केला.
10 जूनला भुजबळ राजकीय मैदानात
10 जून रोजी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचा समारोप पुण्यात होणार आहे. या समारोपाच्या कार्यक्रमाला छगन भुजबळ उपस्थित राहणार असून तेथे त्यांचे भाषण होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांनी दिली. त्यावेळी भुजबळ काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: