Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
माण तालुक्यात तलाठ्याच्या दुचाकीवर ट्रक घालून जीवे मारण्याचा प्रयत्न
ऐक्य समूह
Friday, May 11, 2018 AT 11:00 AM (IST)
Tags: re1
सांगलीतील वाळू व्यावसायिकांवर गुन्हा
5म्हसवड/पळशी, दि.10 : सांगली जिल्ह्यातील वाळू माफियांनी म्हसवडनजीक वीरकरवाडी चौकात धुळदेवचे तलाठी यू. व्ही. परदेशी यांच्या अंगावर ट्रक घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी म्हसवडचे मंडलाधिकारी राजेंद्र मारुती जगताप यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दरम्यान, या घटनेने महसूल विभागात कमालीची दहशत पसरली आहे. गेल्या पाच महिन्यात महसूलच्या अधिकारी व कर्मचार्‍यांवर हल्ला करण्याचा हा तिसरा प्रयत्न आहे. सांगली जिल्ह्यातील वाळूमाफियांची माण तालुक्यातील मुजोरी कोणाच्या पाठबळावर वाढली आहे, असा प्रश्‍न यानिमित्त उपस्थित होत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या तोंडी आणि तहसीलदार सुरेखा माने यांच्या लेखी आदेशाने धुळदेवचे तलाठी यू. व्ही. परदेशी, शिरतावचे तलाठी ए. बी. सूर्यवंशी, शिंदी बुद्रुकचे तलाठी एस. बी. बदडे यांचे पथक दि. 4 मे रोजी सायंकाळी माणगंगा नदीपात्रातील अवैध वाळू  उत्खनन व वाहतुकीस आळा बसावा यासाठी खाजगी दुचाकीने गस्त घालत होते. त्यावेळी म्हसवड हद्दीत माणगंगा नदीपात्रात जठरे वस्तीजवळ लाल रंगाच्या ट्रकमध्ये (एमएच-10-एडब्ल्यू- 4089) नदीपात्रातील वाळू चोरून भरली जात असल्याचे दिसले. महसूल विभागाच्या पथकाची चाहुल लागताच ट्रकजवळचे चार ते पाच जण जवळच्या झाडाआड लपून बसले. पथकातील कर्मचार्‍यांनी त्यांना बोलावले असता अमित कुंभार व सचिन कुंभार (शिरढोण, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) हे दोघे ट्रकजवळ आले. त्यांच्याकडे वाळू उत्खनन व वाळू वाहतूक परवान्याबाबत विचारणा केली असता त्यांनी परवाना नसल्याचे सांगितले. परवाना नसल्याने तलाठ्यांनी ट्रक म्हसवड पोलीस स्थानकाकडे घेण्यास सांगितले. मंडलाधिकारी जगताप व तलाठी सूर्यवंशी हे ट्रकमध्ये बसले. अमित कुंभार हा ट्रक चालवण्यास बसला तर सचिन कुंभार हा शेजारी बसला. तलाठी परदेशी व बदडे हे मोटारसायकलवरून ट्रकच्या पुढे निघाले होते. अमितने ट्रक नदीपात्रातून वीरकरवाडीपर्यंत व्यवस्थित आणला. ट्रक वीरकरवाडी चौकात आल्यानंतर अमित कुंभारने ट्रक म्हसवडकडे न नेता सांगलीच्या दिशेने नेण्यासाठी वरकुटे मलवडीच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला तलाठी व मंडलाधिकार्‍यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अमितने ट्रक परदेशी व बदडे यांच्या मोटासायकलवर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, जगताप व सूर्यवंशी यांच्याशी झालेल्या झटापटीत ट्रक खड्ड्यात गेल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, अमित व सचिन कुंभार हे ट्रकमधून उड्या मारून चारचाकी वाहनातून पळून गेले. ट्रकमधील मंडलाधिकारी जगताप हे किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात मंडलाधिकारी राजेंद्र मारुती जगताप (मूळ रा. विलासपूर, गोडोली, सातारा) यांनी तक्रार दाखल केली आहे. बुधवारी (दि. 9) रात्री 10 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून धनंजय बर्गे तपास करत आहेत.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: