Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जिल्ह्यातील तलाठ्यांकडून कौतुकाची प्रमाणपत्रे परत
ऐक्य समूह
Friday, May 11, 2018 AT 11:01 AM (IST)
Tags: re2
5कराड, दि. 10 : सातबारा संगणकीकृत करण्यात उत्कृष्ट काम करणार्‍या जिल्ह्यातील सुमारे 120 तलाठ्यांना जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या हस्ते गौरविण्यात आले. मात्र तलाठ्यांच्या कामाबाबत अपशब्द वापरण्यात आल्याने नाराज झालेल्या तलाठ्यांनी आपली प्रमाणपत्रे तहसीलदारांकडे सुपूर्द केली आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन डिजिटल स्वाक्षरी सातबारा योजनेचा प्रारंभ नुकताच झाला. त्या अंतर्गत राज्यातील 34 जिल्ह्यातील सुमारे 36 कोटी सातबारांच्या संगणकीय नोंदी पूर्ण करण्यात आल्या आहेत. लवकरच सातबारा फेरफारही ऑनलाइन करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे.
दरम्यान संगणकीकरणाचे काम चांगले केल्याबद्दल नुकतेच जिल्हाधिकारी सिंघल यांच्या हस्ते जिल्ह्यातील 120 तलाठ्यांना प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले. मात्र, तलाठ्यांच्या कामकाज  पद्धतीबाबत अपशब्द वापरण्यात आल्याने त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. परिणामी संबंधित तलाठ्यांनी त्यांना देण्यात आलेली प्रमाणपत्रे तहसीलदारांना परत केली. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
प्रमाणपत्र मागे घेणार नाही : पारवे
दरम्यान, सातबारा संगणकीकरणात सातबारा संगणकीकरण प्रकल्पाचे राज्य समन्वयक उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांच्यामुळे सातबारा ऑनलाइन करण्याचे काम पूर्ण होत आहे. जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारावकर यांनी या महिनाअखेर तलाठ्यांना लॅपटॉप देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे चांगले काम होईल. मात्र, तलाठ्यांनी शासनाला परत केलेली चांगल्या कामाची प्रमाणपत्रे आम्ही मागे घेणार नाही, असे तलाठी संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पारवे यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: