Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
झाले मोकळे आकाश....!
ऐक्य समूह
Friday, May 11, 2018 AT 11:05 AM (IST)
Tags: mn2
रुग्णालयातून सुटका झाल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया
तब्येत सुधारल्यानंतरच राजकारणात सक्रिय होणार
5मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) : मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात रहावे लागलेले माजी मंत्री छगन भुजबळ आज घरी परतले. पडत्या काळात आधार देणार्‍या शिवसेनेसह सर्वांचे आभार मानताना, प्रकृतीमुळे पुढील काही दिवस राजकारणापासून दूर राहावे लागण्याचे संकेत भुजबळ यांनी दिले. सव्वादोन वर्षांनंतर घरी परतलेल्या भुजबळ यांनी ‘झाले मोकळे आकाश’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या सुंदर वास्तूचा सर्व जण लाभ घेताहेत; पण ‘महाराष्ट्र सदन सुंदर व ‘बनानेवाला अंदर’, अशी मार्मिक टिप्पणीही भुजबळ यांनी केली.
बेहिशोबी मालमत्ता आणि महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी सव्वादोन वर्षे तुरुंगावासात असलेल्या छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने मागच्या आठवड्यात जामिनावर मुक्तता केली. जामिनावर मुक्तता होण्यापूर्वीच स्वादु-पिंडाच्या आजारामुळे भुजबळांना मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज डॉक्टरांनी काही दिवसांसाठी त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. तूर्त पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला त्यांना डॉक्टरांनी दिला असून काही दिवसांनी एका शस्त्रक्रियेसाठी पुन्हा रुग्णालयात दाखल व्हावे लागणार आहे. रुग्णालयातून सुटका झाल्यानंतर भुजबळ सांताक्रुझमधील त्यांच्या घरी रवाना झाले. घरी पोहोचल्यानंतर आपल्या कुटुंबातील व्यक्तींसोबत काही वेळ घालवल्यानंतर तब्बल दोन वर्षांनंतर प्रथमच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
जामीन मिळाल्यानंतर शरद पवार यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा झाली. जामीन मिळाल्यावर सर्वप्रथम त्यांचाच फोन आल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. आपल्या आरोग्याची तक्रार अजूनही संपलेली नाही. पुढील काही दिवस विश्रांती घ्यावी लागेल. आजार पूर्णपणे बरा होत नाही तोवर नेहमीप्रमाणे सक्रिय राहणार नाही, या अटीवर मला डिस्चार्ज देण्यात आला आहे, असे भुजबळांनी सांगितले. पुढील काही दिवस त्यांच्या देखरेखीखाली राहायचे आहे. एक-दोन शस्त्रक्रिया कराव्या लागणार असून त्यासाठी पुन्हा एकदा रुग्णालयात भरती व्हावे लागणार आहे. जे काही असेल ते डॉक्टरांच्या सल्ल्याने करू. तब्येत सुधारल्यानंतर पुन्हा राजकारणात सक्रिय होईन,  असे भुजबळ यांनी सांगितले. ज्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या नावाखाली मला तुरुंगात टाकले, त्या महाराष्ट्र सदनाचा सर्वच जण लाभ घेत आहेत. त्याचा मला आनंदच आहे. भाजपच्या खासदारानेही ‘महाराष्ट्र सदन सुंदर और बनानेवाला अंदर’, अशी प्रतिक्रिया देऊन कामाला दाद दिली होती, अशी मार्मिक टिप्पणीही त्यांनी केली. आपल्या तुरूंगातील दिवसांबद्दल बोलताना ‘जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळे’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तुरुंगात असताना वर्तमानपत्रे वाचत होतो. प्रत्येक जण आपापल्या परीने हत्ती कसा आहे, ते सांगत होता. यथावकाश सर्व सत्य बाहेर येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसेनेशी 25 वषार्र्ंचा ऋणानुबंध
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या सहानुभूतीबद्दल छगन भुजबळ यांनी कृतज्ञता व्यक्त केली. पडत्या काळात शिवसेनाही माझ्याबद्दल चांगली बोलली. त्यामुळे पंकज मातोश्रीवर आभार मानण्यासाठी गेले होते. उद्धव ठाकरेंनी तब्येतीची काळजी घ्यायला सांगितले आहे. शेवटी शिवसेनेचा आणि माझा 25 वर्षांचा घरोबा होता. त्यामुळे ऋणानुबंध आहेतच, असे भुजबळ म्हणाले.
केईएमच्या डॉक्टरांचे आभार
छगन भुजबळ यांच्यावर केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या उपचारांमुळे त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. त्यामुळे भुजबळ यांचे पुत्र आ. पंकज यांनी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचार्‍यांचे विशेष आभार मानले. माझे वडील दोन महिन्यांपासून स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त आहेत. आधी त्यांना जे. जे. रुग्णालयात आणि नंतर केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केईएम रुग्णालयाचे डीन डॉ. सुपे, डॉ. कंथारिया, डॉ. नाडकर, डॉ. भाटिया, डॉ. पटवर्धन, डॉ. प्रभू, डॉ. शर्वरी पुजारी इत्यादी निष्णात मंडळींनी त्यांच्या आजारांवर मेहनतीने उपचार केले. त्यामुळे त्यांच्या आजारावर काही प्रमाणात उतार पडला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने काही दिवसात त्यांना पुन्हा इस्पितळात दाखल करून पुढील उपचार केले जातील, असेही पंकज भुजबळ म्हणाले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: